विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मूग- मुगाचें पीक इतर ठिकाणांपेक्षां धारवाड, विजापूर जिल्ह्यांत फार महत्त्वाचें आहे. अहमदाबाद, खानदेश, अहमदनगर आणि सातारा येथें विशेष पेरा होतो. देशावर व कर्नाटकांत याचें स्वतंत्र पीक शाळू व गव्हांपूर्वी घेण्याची बर्याच ठिकाणीं चाल आहे. मूग खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांत पेरतात. कुलाबा व कारवार जिल्ह्यांत हे पीक कार्तिकांत घेतात. भात कापून घेतल्यावर जमीन दोन वेळां नांगरून ती चार पांच दिवस तापल्यावर मूग हातानें फेंकून पेरितात नंतर नांगरानें बीं मिसळून त्यावर फळी फिरवितात. बिंयाचें दर एकरीं प्रमाणः- देशावर स्वतंत्र लागवडीस ६-८ पौंड; कोंकणांतील रब्बी पीक १५-२० पौंड व देशावर व कर्नाटकांत मिसळीचें पीक १ १ २- २ पौंड. खरीप पीक जून महिन्यांत पेरिल्यास तें आक्टोबरांत तयार होतें व रब्बी पीक आक्टोबरांत पेरून जानेवारी, फेब्रुवारींत तयार होतें.
उत्पन्न.- हें धान्य दर एकरीं ५००-६०० पौंड स्वतंत्र व १५०-२०० पौंड मिसळीचें आणि भूस (गुळीं) ३००-४०० पौंड होतें. मुगाच्या नुसत्या हिरव्या शेंगाहि खातात. मुगाची डाळ पथ्यकर समजतात. उडदांप्रमाणेंच त्याचें भूस गुरांनां घालतात.