विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुसुलमान- यांची जगांतील एकूण लोकसंख्या २२१८२५००० आणि हिंदुस्थानांतील एकंदर लोकसंख्या (१९२१) ६८७३५२३३ असून हिंदुस्थानांत त्यांची विशेष वस्ती, बंगाल (अडीच कोटी) व पंजाब (१ कोटी १५ लक्ष) या प्रांतांत आहे. यांचा धार्मिक इतिहास चवथ्या विभागांत १७ व्या प्रकरणांत व त्यांच्या हिंदुस्थानावरील राजकीय सत्तेचा इतिहास त्याच विभागांतील २१ व्या प्रकरणांत आलेला आहे. मुसुलमानी धर्मांतील निरनिराळया तत्त्वांवर व तीं शोधून काढणार्या तत्त्वज्ञांच्या नांवांवर या लोकांत १०० वर निरनिराळे पंथोपपंथ निघाले आहेत. त्यांचीं कांहीं नांवें पुढीलप्रमाणेः- अफताही, अजारीद, बैहासीद, बुनानी, घाली, हफसी, हाशीमी, इमामी, इस्मायली, जाहीझी, जारुदी, कामीलो, कर्रामी, खय्याती, मैमुनी, मझूली, मनसूरी, नावीसी, नझ्झामी, राफीदी, रशीदी, सबाई, शालीही, शौवनी, सुलेमानी ऊबैदी, वाशीली, यझीदी, झियादी इ. इ.
मुसुलमानी कांहीं कायद्यांची माहिती, कायद्यांतील निरनिराळया विषयांच्या (उदारणार्थ, वारसा, लग्न, अन्नवस्त्र इ. नांवाखालीं देण्यांत आली आहे. जगांतील मुसुलमानांच्या वस्तीचें कोष्टक चवथ्या देशावर दिलेलें आहे.
महाराष्ट्रांत यांच्या वेगवेगळ्या ११ जाती आढळतात. स्थायिक होण्याच्या कालावरून त्यांचे तीन वर्ग पडतातः एक मुसुलमानी सत्ता स्थापन झाल्यानंतरचा (७००-१२००), दुसरा ती सत्ता स्थापन झाल्यानंतरचा (१३००-१७२०) व तिसरा ती सत्ता ढासळल्यानंतरचा. पहिल्या वर्गांत कोंकणी मुसुलमान येतात; हे आठ, नऊ व दहा या शतकांत पश्चिम किनार्यावर व्यापार करणार्या अरबांचे व इराण्यांचे वंशज होत. दुसर्या वर्गांत महाराष्ट्रांतून येणारे (दक्षिणी) वप गुजराथेकडून येणारे हे (गुजराथी) आणि बरेचसे मूळचे हिंदु असून जुलमाने बाटविले गेलेले लोक येतात. तिसर्या वर्गांत बोहरी, खोजा, मेमन, जुलाहा या जाती येतात. दक्षिणी मुसुलमानांत, अतार, बागवान, धोबी, कसाई, मणियार, रंगरेझ, तांबोळी, सय्यद या जाती येतात. तर गुजराथी मुसुलमानांत, हजाम, शिपाई, बाझा या जाती येतात. या लोकांची भाषा अशुद्ध उर्दू असते, कोंकणी मुसुलमान मराठी बोलतात, जुलाहा हे भेसळ हिंदुस्थानी बोलतात.
साधारणपणें मुसुलमान हे कडवे, शिक्षणांत मागासलेले, धर्मवेडे व क्षुल्लक कारणावरून एकेरीवर येणारे असतात. हल्ली यांच्यांत शिक्षणाची वाढ बरीच होत चालली आहे. यांच्यांतील खोजे, मेमन, बोहरी हे वर्ग व्यापारी व श्रीमंत असून त्यांचीं घरेंदारें मोठमोठीं असतात. कामगारवर्गांतहि गरीब मुसुलमान बरेच आहेत. बहुतेक सर्व मुसुलमान लोक गोमांस खातात. मुसुलमानांचा पोषाक साधारणतः वेगवेगळया जातींत वेगवेगळा असतो. सय्यद, कोंकणी, दक्षिणी गुजराथी वगैरेंच्या पागोटयांची धाटणी विशिष्ट प्रकारची असते.
सुन्नी, शिया व वहाबी अशा मुसुलमानी धर्माच्या तीन प्रमुख शाखा आहेत. सुन्नींत शफी व हनफी आणि शियांत इस्मायी व मुस्ताली हे पोटभेद आहेत. शफीमध्यें कोंकणी व वाझा येतात आणि बाकीच्या ज्ञाती हनफीजध्यें येतात. इस्मायलींत बोहरी व मुस्तालीमध्यें खोजा, जुहाला हे येतात. कोंकणी, मेमन, दक्षिणी व सय्यद हे लोक धार्मिक नियम कडक रीतीनें पाळतात. कसाई, हजाम, धोबी, वगैरे कनिष्ठ जातींची धर्मश्रद्धा थोडीशी शिथिल असते. बोहरी व सुन्नीपंथी यांचा परस्पर द्वेष असतो, ते परस्परांच्या मशिदींत नमाज पढत नाहींत ('बोहरा' पहा.) खोजा व जुलाहा हे शिया शाखेचे मुस्ताली सांप्रदायिक व. ना. आगाखान यांचे अनुयायी आहेत ('खोजा' पहा.) वहाबी पंथाचा संस्थापक काश्मीरमधील वाहिबी मौलवी होय, त्याच्या शिष्यांत बरेच जुलाहा व ताय मुसुलमान येतात; त्यांच्या मशिदी वेगळया असतात.
महाराष्ट्रांतील मुसुलमानांच्या ११ जातींत परस्पर बेटीव्यवहार नाहीं. सामाजिक व धार्मिक स्वरूपाच्या गुन्ह्यांबद्दल ज्ञातीकडून चौकशी होते. कोंकणी, मेमन, हजाम, वाझा व शिपायी या जातींत मुकदम आढळून येत नाहीं. बाकींच्या सर्व जातींत तो असतो. एतद्देशीय मुसुलमानांत प्राय पांच धर्माधिकारी असतात. काजी याच्याकडे मुसुलमानी राज्यांत दिवाणी व फौजदारी न्यायाचें काम असे, सांप्रत फक्त विवाहनोंदणीचें काम असतें. याचा अधिकार वंशपरंपरेचा आह मुलजकडे मशिदीची व्यवस्था, तींत प्रार्थना चालविणें व और्ध्वदेहिक संस्कार करणें आणि कुराण पढविणें ही कामें असतात; मौलवी हा मुसुलमानी कायदा जाणणारा व उपदेशक असून, सामाजिक बाबींवर याचें मत निर्णयात्मक मानण्यांत येतें. खतीब हा दर शुक्रवारी व रमजान आणि बकरीईद या दिवशीं मशिदींत उपासना करतो. मुलावर हा कनिष्ठ दर्जाचा धर्माधिकारी असून मशिदीची व्यवस्था ठेवून भिक्षेवद निर्वाह करतो. मुसुलमानी फकिरांत बेशारा व बाशारा असे दोन वर्ग आहेत. प्रत्येकांत एक गुरु (सरगीरो), एक व्यवस्थापक (इझनी उर्फ नकीब) व एक खजिदार (भंडारी) असतो. शिकविण्याचें काम मुरशद नांवाचा पंतोजी करतो, विद्यार्थ्यांस खादीम अथवा बलाका म्हणतात. फकिरांचे अनेक आखाडे (पंथ) आहेत, त्यांत महाराष्ट्रांत काड्रिया व ख्रिस्त्या हे प्रमुख आहेत. मूल सहा महिन्यांचें झाल्यावर अकीका नांवाचा व पांचव्या वर्षी बिस्मिलज नांवाचा धार्मिक विधि करतात. बिस्मिलजनंतर सुंता होते. बोहरी, खोजा, जुलाहा व ताय यांच्याखेरीज बाकीच्या जाती काजीकडे विवाह नोंदवितात. लग्न सहा दिवस चालतें. जोडप्याला एका बिछान्यावर समोरासमोर बसवून मुलास मुलीच्या चेहर्याचें प्रतिबिंब आरशांत दाखविण्यांत येतें, नंतर दोघांच्यामध्यें कुराण ठेवून त्यांतील शांति हा भाग वाचण्यांत येतो. यांच्यांत प्रेतें पुरतात. व मरणोन्मुख माणसापुढें कुराण वाचतात. तिसर्या दिवशीं मृताचे आप्तेष्ट मशिदींत जाऊन कुराणांतील कांही भाग वाचतात; नंतर फुलें व एक सुंगंधी पाण्याचें भांडें प्रत्येकापुढें नेल्यावर प्रत्येकजण एक एक फूल भांडयांत टाकतो व सरतेशेवटीं ती सर्व फुलें व पाणी मृताच्या थडग्यावर टाकतात; या विधिचें नांव झैरात आहे.
सय्यद (महाराष्ट्रांतील) हे सय्यद अब्दुल कादीर गिलानी याच्या एका नातलगाचे वंशज आहेत. या नातलगानें ४०० वर्षांमागें दक्षिणेंत येऊन बरेच हिंदू बाटविलें. कोंकणी मुसुलमान हे शेख व पठाण यांच्या मिश्र जातीचे सुन्नीपंथाचे आहेत. यांचा धंदा तांदुळाचा व्यापार व सावकारी असून हे भरभराटलेले आहेत. गुजराथेंतील नैता व मलबारकिनार्यावरील नवायत या दोन ज्ञाती पूर्वी इराणी आखातांतून हज्जाझ बिन यूसम ७इ. स. ६९९) याच्या भयानें इकडे पळून येऊन, माहीम, बाणकोट व मलबारकिनार्यावर स्थायिक झाल्या. त्यांत नऊ ते सोळा या शतकांत अरबी व इराणी व्यापार्यांची भर पडली. बाटग्या हिंदूंचें मिश्रण यांच्यांत आहे असें त्यांच्या कांहीं आडनांवांवरून दिसतें. यांचा सांप्रतचा धंदा शेती, खोती व तांदुळ आणि इमारती लांकडे यांचा व्यापार होय. अतार हे अत्तरें व सुगंधी द्रव्यें विकतात (अतार पहा.) बागवान हे औरंगझेबानें बाटविलेले मराठी कुणबी होत. धोबीहि मूळचे हिंदु होत; यांनां मुसुलमानांत हलके समजतात. यांचीहि प्रवृत्ति बागवानांप्रमाणें हिंदुधर्माकडे विशेष दिसते. हेहि गोमांस खात नाहींत, गोषा पाळीत नाहींत व हिंदूंचे सण करतात. कसायांतील गुजराथी बक्करकसाई हे मुसुलमानी अंमलांत वसलेल्या अफगाणांचे वंशज आहेत. दक्षिणी बक्करांनां लाड सुलतानी असें नांव आहे. कारण हे मूळचे, लाडसंप्रदायी हिंदु खाटिक होते, त्यांना टिप्पूनें बाटविलें. यांचीहि प्रवृत्ति हिंदुधर्माकडे विशेष दिसते. ('कसाई' पहा.)
अनाहिलपट्टणच्या हिंदु राजांनीं शिया धर्मोपदेशकांनां फार सहानुभूतीनें वागविलें. पण त्या धर्मोपदेशकांनीं पुष्कळ हिंदु बाटविले तेच हे बोहरी होत. मेमन वर्गासंबंधीं माहिती 'कच्छी मेमन' लेखांत आढळते. ताय ही जात गुजराथेंत बलसाडकडे आढळते. तुर्कस्तान व अरबस्तान यांच्या दरम्यानच्या ताय शहरावरून यांनां हें गांव मिळालें असावें. इद्रिस (इलिजा) या एका प्रेषितानें यांनां शिवण्याची कला शिकविली अशी कथा आहे. एक हजार वर्षांपूर्वी सिंधमध्यें आलेल्या परकीयांचें व बाटग्या गुजराथ्यांचे मिश्रण या जातींत असावें. यांचा धंदा शेतकी व मजुरी. हे हनफी शाखेचे सुन्नीपंथी आहेत. वाझा हे मूळचे गुजराथी कोष्टी असून सुमारें १२५ वर्षांपूर्वी बाटले गेले असावे. यांचा धंदा खादी, रुमाल वगैरे विण्याचा. यांच्यांत सुन्नी-हनफी व शफी हे दोन्ही पंथ आहेत. शिपाई हे संजानभागांत प्रथमतः होते, हल्ली ते ठाणें जिल्ह्यांत पसरले आहेत. हे सुन्नीहनफी पंथी आहेत. हजाम हे मूळचे हिंदु व गुजराथेंतील रहिवाशी सुन्नीहनाफीपंथी असून धार्मिक संस्कार फारसे करीत नाहींत. जुलाहा किंवा मोमीन यांचा धंदा लुगडी रुमाल, लुंग्या वगैरे विणण्याचा आहे. हे कांहीं सुनी व कांहीं शियापंथी असल्यानें यांच्यांत बर्याच पोटजाती झाल्या आहेत. मूर्खपणाबद्दल मोमीनांची प्रसिद्धि आहे.
मुसुलमानांत नायकिणीचा धंदा करणार्या कांही बायका असतात. नाशिककडील या बाया सुन्नीपंथाच्या असून, त्यांचा पोषाख व भाषा ही मराठयांसारखी असतात. आपल्या धंद्यास प्रारंभ करण्याचा दिवस व मिसीं (दांतवण) चा दिवस हे यांचे मुख्य दिवस असतात (कसबी व कसबीण पहा).
नैकवारी मुसुलमान हे पुणें, नाशिक, खानदेश, नगर इकडे आहेत. हे हैदरानें बाटविलेलें मूळचे हिंदु; श्रीरंगपट्टण पडल्यावर ते म्हैसूर सोडून पेशव्यांच्या सैन्यांत दाखल होऊन इकडे आहे. अद्यापिहि यांचा पोषाख, आचारविचार व भाषा मराठी आहे; यांचा पंथ सुन्नी, पेशा शिपाईगिरीचा आहे. पिंजारी व तेली जात नाशिक-नगरकडील मूळची गुजराथी हिंदु असून धंदा तेल काढणें व कापूस पिंजणें व पंथ सुन्नी आहे. पिंजर्याला नड्डाफ असें एक नांव आहे (पिंजारी पहा.) सैकलगार हे ५०-७५ वर्षांपूर्वी बाटले गेलेलें मूळचे हिंदु; भाषा मराठी-कानडी-हिंदुस्थानीमिश्र. हे भटक्ये असून लोहारी काम करतात व तांब्याची मोड घेतात. कागजी अथवा कागदी लोक हे पुणें, नाशिक, खानदेश, दौलताबाद या भागांत आढळतात; भाषा हिंदुस्थानी, पंथ सुन्नी, धंदा कागद करण्याचा; परेदशी कागद येऊं लागल्यापासून यांचा धंदा बुडाला, तरी पण सावकारी जमाखर्च लिहिण्यासाठीं अजूनहि यांचा कागद वापरतात. तांबट हे मूळचे मारवाड व राजपुतान्याकडील, भाषा धेडगुजरी मारवाडी, अंगानें मजबूत, कष्टाळू, धंदा तांब्याची मोड घेणें व भांडीं बनविणें, पंथ सुन्नी त्यांत कांहीं वहाबीहि आहेत; ज्यांनां कुराण तोंडपाठ येतें त्यांनां हाफीज ही पदवी मिळते. मलबारी मुसुलमान हे मुंबई-मद्रासपर्यंत कातडयाचा व्यापार करतात. नारळ, कॉफी, खजूर, कांचेच्या अथवा लाखेच्या बांगडया वगैरे जिन्नस हे विकतात. हे दणकट व केंसाळ फार असून नारळ फार खातात. 'नारळ खातो म्हणून आम्हीं केंसाळ, असें ते म्हणतात. हे स्वभावानें तापट, धर्मवेडे व चीडखोर; भाषा मलबारी; लाकडासा हे इमारती व जळाऊ लांकडांच्या वखारी घालतात. हे सुन्नपंथाचे आहेत. मुलतानी हे सह्याद्रीच्या पठारावर आढळतात. हे सुन्नी पंथी पण धर्माच्या बाबतींत अज्ञानी आहेत. सण बहुतेक हिंदूंचेच पाळतात. भाषा खानदेशी व गुजराथी, हे तापट व भांडखोर असून धंदा सुके मासे विकण्याचा, शेतकी व गुरांचा व्यापारहि करतात (ग्याझेटियर).
मु सु ल मा नी का य दा.- मदिना येथील आद्य मुसुलमानी समाजामध्यें महंमद न्यायाधिशाचें काम करू लागला तेव्हांपासून याला प्रारंभ होतो देवाचा दूत या नात्यानें यानें न्याय निवडिले आणि त्याचा कोणताहि निकाल सर्वमान्य ठरला. तथपि, आपल्या नवीन धर्मानुसारहि फरक करणें आवश्यक नसेल तेव्हां, मदिना येथील स्थानिक कायदा व रूढीचें अवलंबन करणें त्यास योग्य व हिताचें वाटे. त्यामुळें असें होई कीं, त्यानें दिलेले निकाल कित्येक वेळां मदिना येथील अरबी टोळयांच्या चालीरीतीस धरून असत; कित्येक वेळा ते यहुदी लोकांच्या कायद्याला धरून असत; केव्हां मक्केच्या त्याच्या अनुयायांनां माहीत असलेल्या व्यापारी कायद्याप्रमाणें असत, तर केव्हां स्वतःच्या न्यायबुद्धीला योग्य वाटतील असे असत. पण यांमध्यें मुसुलमानी कायद्याची स्वतंत्र पद्धत किंवा कोड बनविण्याचा त्याचा विचार होता असें दिसत नाहीं. मरणसमयीं, कुराणान्तर्गत विशिष्ट नियम व स्वतः दिलेल्या निकालांचा मोठा संग्रह त्यांच्यामागें राहिला. महंमदाच्या मरणाबरोबर मुसुलमानी कायद्याच्या संग्रहास व वाढीस सुरवात झाली. दाव्यांचे निकाल देणें जरूर पडे त्याकरितां कुराणाचा प्रथम आधार घेत असत; आणि अडेल तेव्हां महंमदाचे निकाल प्रमाण मानीत. त्यापुढला आधार म्हणजे मदिना येथील परंपरागत आलेले नियम; आणि शेवटीं न्यायाधिशाची न्यायबुद्धि. वरील कारणामुळें महंमदाच्या निकालांनां मोठें महत्त्व प्राप्त झालें व त्यांचा संग्रह काळजीपूर्वक होऊं लागला. परंतु त्यांतच लबाडीला सुरवात झाली. परस्परांविरुद्ध पक्ष स्वतःस अनुकूल असे आधार व महमदाचीं वचनें आपल्या खाजगी टिपणांतून काढून दाखवूं लागले. आणि हळूहळू या परस्परविरोधी वचनांच्या आधारावरच मुसुलमानी संप्रदायांत व कायद्यांत निरनिराळे पंथ (स्कूल्स) उद्भवले.
मुसुलमानी राज्यविस्ताराबरोबर मुसुलमानी कायद्याच्या वाढीस दुसरी एक मदत मिळाली ती रोमन कायद्याची. कारण जिंकलेल्या रोमन प्रांतामध्यें काम करणार्या मुसुलमान न्यायाधिशांस रोमन कायद्याचा आधार घेण्यास प्रथमप्रथम मुसुलमानी कायद्याची मान्यता असे. त्यामुळें मुसुलमानी कायद्यांतील पुष्कळ शब्द व तत्त्वें रोमन कायद्यावरून बनलेलीं दिसून येतात.
पुढें उमईद घराणें नष्ट होऊन अरबी वळणाच्या खलिफांच्या कारकीर्दीस सुरवात झाली. या खलिफांच्या अम्मलाच्या प्रथमशतकांतच चार कायदेपंथ निर्माण झाले ते आजहि अस्तित्वांत आहेत. पहिला पंथ अबुहनीफाचा. तो जरब नव्हता म्हणून मदिना येथील चालीरीतींबद्दल त्याला फारशी आवड नव्हती. त्याची कुराणावर जास्त भिस्त असे. कुराणमतानुरोधानें हनीफानें आपल्या बुद्धिबलानें स्वमतानुकूल असे अनेक समाजसिद्धांत काढले. त्यामुळें मुसुलमानी कायद्याची वाढ होऊन त्याला अधिक व्यावहारिक स्वरूप आलें. चारहि कायदेपद्धतींत आज इनीफाचा पंथ प्रमुख आहे. दुसरा पंथ मलीकचा-मलीकच्या पंथांत दोन तत्त्वें अधिक शिरलींः (१) सार्वजनिक हित समाजाला विघातक असल्यास रूढ कायदाहि बाजूला पडूं लागला. (२) ऐकमत्य; महमदाच्या मरणानंतर हयात असलेल्या त्याच्या सहचरांचें एखाद्या विषयावर एकमत असल्यास त्यांचा निकाल कायम मानीत. त्याचा 'मुत्तच्' नांवाचा सर्वांत जुना कायदेग्रंथ आज अस्तित्वांत आहे. तिसरा पंथ अश्-शफीचा (मृत्यु सन ८२०). हा मलीकचा शिष्य होता. त्यानें परंपरेस फार महत्त्व दिलें. त्यांनां कुराणाहूनहि अधिक मान असे. त्याच्या पंथाचे तीन आधारः- (१) कुराण, (२) रूढी, (३) मुसुलमानी लोकांचें ऐकमत्य (चुकीच्या बाबतींत माझ्या लोकांचें एकमत कधीच होणार नाहीं.) चवथा हनबालचा पंथ. सन ८८५ मध्यें हनबालच्या मृत्यूनंतर त्याच्या शिष्यवर्गानें हा पंथ काढला. ऐकमत्य व साधर्म्य या दोन्ही तत्त्वांचा अल्प स्वीकार करून या पंथाचा विशेष भर कुराण व परंपरेवर असे. हा पंथ सर्वांत लहान होय. या चार पंथांपैकीं, सर्व ठिकाणचे तुर्क लोक, मध्यआशिया व उत्तरहिंदुस्थानांतील मुसुलमान हनफीपंथाचे आहेत. दक्षिण हिंदुस्थान व मलाया बेटांतील, दक्षिण ईजिप्त व सीरिया यांतील लोक शफीपंथाचे; उत्तरईजिप्त, पश्चिम ईजिप्त व उत्तरआफ्रिकेमधील लोक मलीक पंथाचे; मध्यअरबस्तानांतील वहाबी हनबालपंथाचे आहेत. या सर्व कायदेपंथांतील नियमांचे रोमनकॅथॉलिक धर्मपंथांतील नियमांशीं बरेंच साम्य आहे. मुसुलमानी धर्माच्या व राज्याच्या वाढीकरितां जिंकलेल्या देशांतील लोकांचे रूढ कायदे व चाली मुसुलमान पुढार्यांनां मान्य कराव्या लागल्या व त्यांचा कायदेपुस्तकांत समावेश करावा लागला. जुन्या मतांनांच चिकटून राहाणारे असेहि लोक असत; परंतु त्यांच्या मतापेक्षां निरनिराळया मुसुलमान राजांच्या इच्छेप्रमाणेंच कायदे बनत असत. यामुळें प्रत्येक मुसुलमानी देशांत निदान दोन दोन कायदेपद्धती असत. एक विवाह, वारसा इत्यादि खाजगी बाबतींतील धार्मिक कायदा व दुसरा स्थानिक रूढी व राजांचे हुकूम यांच्या आधारें बनलेला कायदा.
याप्रमाणें मुसुलमान लोकांकरितां व्यवस्था होती. आतां मुसुलमानी देशांतील मुसुलमानेतरांकरितां कोणता कायदा असे तें पाहूं. येथें प्रथम हें सांगितलें पाहिजे कीं, मुसुलमान आपल्या देशांतील मुसुलमानेतरांचा अत्यंत तिरस्कार करीत, कारण मुसुलमान देशांत परधर्मी लोक असावे ही कल्पनाच यांनां असह्य वाटे; इतकेंच नव्हे तर सर्व जग मुसुलमानीपंथाचें व्हावें असें त्यांचें ध्येय.यामुळें परधर्मीयांकरितां कायद्यासंबंधीं ते कांहीच सोय करीत नसत. अशा स्थितींत परराष्ट्रीय वकिलाच्या अमलाखाली आपापल्या देशांतील कायद्याप्रमाणें त्यांचे व्यवहार चालत सारांश कोणत्याहि मुसुलमानी देशांत कायद्यांचे तीन प्रकार असतः- एक शुद्ध मुसुलमानी कायदा; दुसरा जिंकलेल्या लोकसमाजांतील रूढ कायदा; व तिसरा मुसुलमानेतरांचा स्वदेशीय कायदा. भविष्यकाळांत या तीन आधारांवर मुसुलमानी कायद्याची वाढ होत जाणार असें दिसतें.