विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुर्शिदाबाद, जि ल्हा.- बंगाल्यांतील प्रेसिडेन्सी विभागांतील एक जिल्हा. क्षेत्रफळ २१४३ चौरास मैल. लोकसंख्या (१९२१) १२६२५१४. भागीरथी नदी या जिल्ह्यांतून वहात जाते. जिल्ह्यांत तेलकरवील व मोतीझील असे दोन मोठे तलाव आहेत. मोतीझील हा भागीरथीचा प्रवाह वळवून तयार केलेला तलाव आहे. जिल्ह्यांतील उष्णमान सरासरी ७९० असतें व पावसाचें मान सरासरी ५३ इंच आहे.
इतिहासः- प्राचीन काळीं भागीरथी नदी वंग व कर्णसुवर्ण या राज्यांमधील सीमा होती. सेन राजांच्या वेळी या नदीनें राऱ्ह व बागडी असे या प्रदेशाचे दोन भाग केले होते. ११९७ सालीं बखत्यार खिलजीनें या प्रातांवर स्वारी केली. येथें १७ व्या शतकांत रेशमाचा मोठा व्यापार असे. १८ व्या शतकाच्या आरंभी मुर्शिदकुलीखानानें आपली राजधानी डाक्क्याहून मुसुदाबादेस आणली व नंतर मुसुदाबादला मुर्शिदाबाद म्हणूं लागले. इतिहासांत मुर्शिदाबाद महत्त्वाचें शहर आहे. १८७५ सालीं हा जिल्हा बंगाल इलाख्याला जोडला.
बऱ्हामपूर, मुर्शिदाबाद, अझीमगंज, जंगीपूर व कांदी हीं मुख्य शहरें होत. तांदूळ, गहूं, जवस, ऊंस, नीळ ही पिकें होत. येथें मासे धरण्याचा धंदा बराच महत्त्वाचा आहे. निरनिराळया प्रकारचें रेशीम मिर्झापूर, हरिहर, पारा व दौलतबाजार ठाण्यांतून येतें. टसर व मतका या प्रकारचेंहि रेशीम येथें तयार होतें व मतका हें रेशीम हिंदु लोक हातमागावर फार सुरेख विणतात. येथें जरीचें काम चांगलें होतें व कोठें कोठें हस्तिदंती कामहि क्वचित करतात. मुर्शिदाबादेच मुर्शिदाबाद, कांदी, लालबाग, जंगीपूर असे चार पोटविभाग आहेत. हा जिल्हा कलकत्त्याजवळ असूनहि फक्त शेंकडा ५.५ लोकांनांच लिहितांवाचतां येतें.
शहर.- हें भागीरथी नदीच्या पश्चिम किनार्यावर वसलें आहे. या ऐतिहासिक शहराचें पूर्वीचें नांव मुसुदाबाद असें होतें. सध्यांचें मुर्शिदाबाद बनण्याला बर्याच अंशी मुर्शिदकुलीखान व माणिकचंद जगतशेट नांवाचा जैन व्यापारी यांचे श्रम कारणीभूत झालेले आहेत. येथें नंरत मराठयांच्या स्वार्यांवर स्वार्या झाल्या होत्या. क्लाईव्हला हें लंडनसारखें शहर वाटलें होतें. १७९० सालीं कार्नवालिसनें हें लंडनसारखें शहर वाटलें होतें. १७९० सालीं कार्नवालिसनें येथून न्यायासन उचलून कलकत्त्याला नेलें, व नंतर दिवाणी कचेर्याहि हळू हळू दुसरीकडे नेल्या व १८८२ सालीं ही फक्त नबाबाची रहाण्याची जागा होती.
मुर्शिदाबादची लोकसंख्या सुमारें १२००० येथील निवडक प्रेक्षणीय स्थळेंः- (१) भागीरथीच्या कांठीं असलेला हजारद्वारी नावांचा भव्य राजवाडा. (२) इमामवाडा किंवा प्रार्थनामंदिर. (३) राजवाडयापासून पूर्वेस १ १ २ मैलावर असणारा तोफखाना, (४) मोतीझील नांवाचा एक तलाव, हा अलीवर्दीखानाचा मुलगा व जांवई नवाझिशखानानें बांधिला. (५) मोतीझीलेच्या ईशान्येस दीड मैलांवर कटरा येथें असलेली मशीद. (६) राजवाडयापासून एक मैलावर मीरजाफर याचा, हा सेनापति असतांना राहण्याचा राजवाडा. (७) राजवाडयाच्या आग्नेयीस अडीच मैलांवर मुबारक मंझील बगीचा. (८) शहराच्या उत्तरेस दोन मैलांवर जगतसिंहाचें राहाण्याचें माहिमपूर नांवाचें ठिकाण. (९) मोतीझील तलावाच्या समोर पूर्वकिनार्यावर खुशबाग नांवाची बाग, इत्यादि. आणखीहि बरींच पहाण्यासारखीं स्थळें आहेत. येथें फक्त हस्तिदंताचें कोरीव काम, हुक्के वगैरे राजविलासी जिन्नस होतात.