विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुर्शिद कुलीखान- बंगालचा पहिला नबाब. हा मोंगल बादशहांच्या वंतीनें नेमलेला बंगालचा पहिला सुभेदार होय. याचें पहिलें नांव जाफरखान असून हा मूळचा दक्षिणेंतील एका ब्राह्मणाचा मुलगा होता. हा प्रथम वरहाडमध्यें मुलकी खात्यांत नोकरीस होता. पुढें बादशहाची स्वारी दक्षिणेंत असतांनां मुर्शिदची कर्तबगारी व हुशारी औरंगझेबाच्या नजरेस येऊन त्यानें त्यास इ. स. १७०१ मध्यें 'कुर्तुलबखान' अशी पदवी देऊन बंगालचा दिवाण नेमिलें, आणि त्यास डाका येथें पाठविलें. थोडयाव अवधींत त्यानें बंगालप्रांतामध्यें वसुलाची व्यवस्था उत्तम केल्यामुळें बादशहाची मर्जी त्याजवर सुप्रसन्न होऊन त्यानें त्यास बहुमोल पोषाख दिले आणि मुर्शिद कुलीखान अशी नवी पदवी दिली. मुर्शिद कुलीखाननें मुसुदाबाद येथें आपली राजधानी स्थापन केली व तिचें नांव मुर्शिदाबाद असें ठेविलें. तेथें त्यानें उत्तम रीतीनें राज्यकारभार चालवून वसुलाची व्यवस्था उत्तम ठेविली आणि हिंदु लोकांस मोठमोठया जागा देऊन आपल्या निःपक्षपातीपणानें सर्व प्रजेचें प्रेम संपादन केलें. पुढें हा १७०४ सालीं बंगाल, बहार व ओरिसा या प्रांतांचा सुभेदार झाला. औरंगझेबाच्या मृत्यूनंतर हा आपणांस स्वतंत्र म्हणवूं लागला. ह्यानें राज्यामध्यें अनेक प्रकारच्या सुधारणा केल्या; लष्करी खर्च कमी केला, धान्याचा निर्गत व्यापार बंद केला, विद्या व कला यांस उत्तेजन दिलें, आणि अनाथ लोकांस जीवदान दिलें. त्यामुळें त्याची कीर्ति विशेष झाली. तो स्वतः फार शांतवृत्तीचा व बातबेतानें वागणारा असा असून, त्यानें एकपत्नीव्रत आढळ चालविलें होतें. मुर्शिद कुलीखान याच्या कारकीर्दीत सुबत्ता चांगली होती. त्या वेळी एका रुपयास पांच मण तांदूळ मिळत असून एक रुपया दरमहाचें उत्पन्न असणार्यास दोन वेळ पोटभर अन्न खावयास मिळत असे. मुर्शिद कुलीखान हा इ. स. १७२५ मध्यें मृत्यु पावला. (इतिहाससंग्रह- पुस्तक, अंक १०-१/-१२).