विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुरार जगदेव- मुरार जगदेव नांवाचा ब्राह्मण सरदार आदिलशाहींत स. १६२८ पासून सुमारें पंचवीस वर्षे मुख्य प्रधानकीच्या कामावर होता. हा धोमचा रहाणारा. यानें भीमाकांठच्या नांगर गांवीं स्वतःची तूला करवून गांवाचें नांव तुळापूर ठेविलें. शहाजीचा विजापूरीं शिरकाव होण्यास मुख्य कारण हा मुरारपंत होय. मराठे सरदारांच्या जोरावर त्यानें अनेक राजकीय कामें तडीस नेलीं. त्याच्या वेळेस मराठे व मुसुलमान सरदारांत चांगली जूट वसत होती. कांही बिकट प्रसंगीं शहाजीनें त्यास मदत केल्यामुळें त्यानेंहि शहाजीचा स्नेह अव्याहत कायम राखिला. निजामशहास मदत करून शहाजहान बादशहाचें फार दिवस इकडे कांही चालू दिलें नाहीं. महंमद आदिलशहानें स. १६३५ त मुरारपंताचा वध करविला असें म्हणतात. (मराठी रियासत भा. २, पृ. १२४)