विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुरळी- यांच्याविषयीं थोडीशी माहिती १५ व्या विभागांत 'देवदासी' व (१८ व्या विभागांत) 'भाविणी व देवळी' या लेखांत दिली आहे. देवाला मुलगी वहाण्याच्या या चालीचा प्रारंभ, त्याचें कारण व वांढ यांचा प्राचीन इतिहास फारसा उपलब्ध नाहीं; कदाचित हें देवभोळेपणाचें लक्षण असूं शकेल. आपल्याकडे हे प्रकार मद्रास इलाख्यांत फार आहेत. कर्नाटकांतील हा सदृश वर्गास बसवी म्हणतात. मराठींत यामुळेंच बाजारबसवी हा शब्द आला आहे. पश्चिम हिंदुस्थानांत ही चाल तिकडून आली असावी. मुरळीसारखी निरनिराळीं नांवे धारण करून निरनिराळया देवस्थानांशीं संबंध असणार्या अथवा नसणार्या पुष्कळच स्त्रिया आपापले निरनिराळे संप्रदाय चालवीत आहेत. पुढील कोष्टकावरून या चालीचा प्रसार कसा व कोठें आहे हें दिसेल.
वर्गाचें नांव | देव | देवस्थान |
मुरळी | खंडोबा | जेजुरी, जिल्हा पुणें |
,, | जोतिबा | जोतिबा डोंगर, कोल्हापूर |
जोगवीण | अंबाबाई | तुळजापूर-मोंगलाई |
भावीण | रवळनाथ | खानापूर जि. बेळगांव |
नायकीण | भूतनाथ | मालिगांव, कोंकण |
कलावंतीण | महाबळेश्वर | गोकर्ण, कारवार |
वेसवी | दारेश्वर | कुमठें '' |
देवदासी | गुट्टम्मा | शिरशी, कानडा |
देवळी | यलम्मा | सौंदत्ती, बेळगांव |
जोगतीण | दुर्गव्वा | कणकेरी, बलजरी |
मातंगी | धामव्वा | गुड्डूर, गदग |
शरणी | मारुती | ... ... |
या बायकांच्या संख्येची वाढ शिक्षणानें थांबेल असें कांहीं लोकांचें म्हणणें असून, कांहीचें म्हणणें सरकारी कायद्यानें थांबेल असें आहे. इंडियन पीनल कोडचीं ३७२ व ३७३ हीं कलमें या चालीच्या प्रतिकारार्थ केलेली आहेत. कांहीं वेश्या आपला धंदा अधिक प्रतिष्ठित रीतीनें चालावा व समाजांत अपला अधिक राजरोसपणें शिरकाव व्हावा म्हणून कोणत्याहि प्रकारचा विशेष विधि न करतां त्या मुरळया बनतात.
मुलींप्रमाणेंच मुलगेहि देवांनां वाहाण्याची चाल आहे. खंडोबाच्या वाघ्या, अंबाबाईचा आराघ्या, द्यामव्वाचा पोतराज, यलम्माचा जोग्या वगैरे पुरुष असेच वाहिलेले असून त्यांनां लग्न करण्याची (मुरळी, देवदासी यांच्यासारखी) सक्त मनाई असते. या पुरुषांचा व वरील स्त्रियांचा निकटवास झाल्यानें चोरून बदफैलीपणा होण्याचा बळकट संभव असतो. हा प्रकार ज्या जातींत आढळतो त्या म्हणजे, भंडारी, कुणबी, धनगर, नाईक, कोळी, बेडर, डासर, कबलीगार, तळवार, महार, मांग, वगैरे होत. औरंगझेबादेजवळील सातारें गांवच्या खंडोबास मुरळया वाहाण्याची चाल बंद केली होती (औरंगझेब पहा). (वि. रा. शिंदे-लेख व व्याख्यानें, पृ. ९०-९३)