विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुद्रणकला- दाबाच्या योगानें कागद किंवा मुद्रणयोग्य अशा इतर पृष्ठभागावर शाई किंवा इतर तैलरंग यांच्या साहाय्यानें अक्षरें किंवा आकृती वठविण्याच्या कलेला मुद्रण म्हणतात. या व्याख्येंत तीन निरनिराळया कृतींचा समावेश होतोः- (१) कॉपरप्लेट प्रिंटिंग, (२) लिथोग्रॅफिक किंवा केमिकल स्टोन-प्रिंटिंग, आणि (३) लेटरप्रेस प्रिंटिंग, या तीन प्रकारांमध्यें मुख्य फरक, शाई किंवा तैलरंग ज्या पृष्ठभागाला लावून ठसा उमटवितात तो पृष्ठभाग तयार करण्याच्या पद्धतींत आहे. कॉपरप्लेट प्रिंटिंगमध्यें प्रथम सर्व प्लेटला शाई लावतात आणि तो पृष्ठभाग स्वच्छ पुसून काढतात. पण पृष्ठभागावर खोदलेल्या जागेंत शाई बसून रहाते. नंतर ओला कागद त्या पृष्ठभागावर घालून दाबल्यानें कागदावर खोदलेल्या जागेंतील शाई उमटून कॉपरप्लेटवरील मजकूर किंवा आकृति कागदावर दिसूं लागले. लिथोग्रॅफीकमध्यें दगडाचा पृष्ठभाग वस्तुतः सर्व सपाट असतो, पण आकृतीच्या भागाखेरीज इतर भागाला शाई चिकटणारच नाहीं अशी योजना केलेली असते. अक्षरमुद्रणा (लेटर-प्रिंटिंग) मध्यें जो भाग कागदावर उमटावयाचा जो उंच किंवा उठावदार ठेवून बाकीचा पृष्ठभाग खोल केला असतो, त्यामुळें उठावाच्या भागालाच फक्त शाई लागून त्याचा ठसा कागदावर उठतो. अक्षरांचे ठसे (टाईप) करण्याची कल्पना निघण्यापूर्वी छापावयाचा मजकूर लांकडाच्या ठोकळयावर खोदून काढीत असत. अशा तर्हेनें नाना फडणविसानें तांब्याच्या पत्र्यांत कोरलेलें गीतेचें एक पृष्ठ पुणें येथील इतिहासमंडळांत आहे. पण हा ठोकळा विशिष्ट मजकुरासच उपयोगी पडतो. तर खिळे पुन्हां जुळवितां येतात.
अ क्ष र मु द्रा किं वा टा ई पां ची यु क्ति (टायपोग्राफी).- अक्षर-मुद्रणाच्या कलेंत टाईपांची रचना आणि छापण्याचीं यंत्रें असें मुख्य दोन भाग आहेत: टाईपाचे मोठे व लहान आणि जाड व बारीक असे मुख्य प्रकार आहेत. सिक्सलाईन पायका, फोरलाईन पायका, टूलाईन ग्रेट प्रायमर, टूलाईन पायका, लांबा वन्निक, वन्निक व ग्रेटप्रायमर ब्लॅक, हे मोठया टाईपांचे अनुक्रमें प्रकार असून ग्रेटप्रायमर, इंग्लिश बॉडी, ब्लॅक, इंग्लिश बॉडी, पायका ब्लॅक, पायका, लाँगप्रायमर ब्लॅक व लाँग प्रायमर हे सर्व लहान टाईपांचे प्रकार आहेत. मोठे टाईप मुखपृष्ठावरील नांवांकरितां व प्रकरणांच्या वगैरे मथळयांकरितां वापरतात. लहान टाईपांतील ब्लॅक टाईप प्रकरणांतर्गत मथळयांकरितां व महत्त्वाच्या मजकुराकरितां वापरतात. सिक्सलाईन पायका ते लाँग प्रायमरपर्यंतचीं टाईपांचीं नांवें मोठे-लहानपणाच्या अनुक्रमानें दिलीं आहेत.
छापण्याची युक्ति १५ व्या शतकापूर्वी पुष्कळ काळ अस्तित्वांत होती. ठशांनीं (ब्लॉक-प्रिंटिंग) आणि टाईपांनीं छापणें या गोष्टी चीन व जपान या देशांत फार पूर्वीपासून प्रचारांत होत्या. सन १७५ सालीं छापलेल्या कांहीं चिनी ग्रंथांचा भाग हल्ली अस्तित्वांत आहे असें म्हणतात. लांकडी ठोकळयांच्या साहाय्यानें छापलेल्या मजकुरांचे नमुने ६ व्य शतकांतले सांपडतात तथापि चीनमध्येंहि १० व्या शतकापासून छापलेलीं पुस्तकें सर्वसाधारणपणें मिळूं लागलीं. जपानांतील सर्वांत जुना ब्लॉकप्रिंटिंगचा नमुना ७६४-७७० च्या सुमाराचा आहे. सुटया टाईपांनीं छापण्याची सुरवात चीनमध्यें ११ व्या शतकापासून झाली असें म्हणतात. ब्रिटिश म्यूझियममध्यें कोरियांत १३३७ मध्यें सुटया टाईपासंनीं छापलेल्या पुस्तकाचा नमुना ठेवलेला आह. तांब्याच्या धातूचे टाईप करण्याची युक्ति कोरियन लोकांनीं १५ व्या शतकाच्या आरंभीं काढली असें म्हणतात; आणि तसल्या टाईपांनीं त्या शतकांत छापलेल्या पुस्तकांचे नमुने उपलब्ध आहेत. तथापि ठसे किंवा टाईप यांनीं छापण्याची युक्ति यूरोपीय लोकांनीं चिनी लोकांपासून घेतलेली नाहीं असाच पुरावा मिळतो. यूरोपांत १४ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंतचें प्रत्येक पुस्तक व प्रत्येक खाजगी व सार्वजनिक दस्तऐवज हस्तलिखित आहेत. तसेंच आकृत्या, चित्रें, खेळण्याचे पत्ते, साधूंचीं (सेंट) चित्रें सर्व लेखणीनें (पेन) काढून ब्रशानें रंगविलेलीं आहेत. हाताचें लेखनकौशल्य व चित्रकौशल्य पूर्ण वाढल्यानंतर यूरोपांत ब्लॉक-प्रिंटिंगची कला उदय पावली आणि एकाच लांकडी ठशापासून थोडक्या वेळांत व थोडक्या श्रीमंत शेंकडों प्रती काढण्याची सोय झाली. अशा प्रकारें कागदावर छापलेल्या मजकुराचे नमुने १४ व्या शतकाच्या उत्तरार्धांतील उपलब्ध असून १५ व्या शतकांत या युक्तिचा प्रसार जर्मनी, हॉलंड व फ्लँडर्समध्यें पुष्कळ झाला. या कलेला पूर्ण स्वरूप आल्यावर धातूचे सुटे टाईप करण्याची युक्ति निघाली. ती प्रथम कोणी काढली याबद्दल वाद चारशें वर्षे चालू होता व आतां हें नक्की ठरलें आहे कीं, हे श्रेय हार्लेम येथील लौरन्स जॅन्सझून कॉस्टर यास आहे; मेंझच्या जोहन गुटेनबर्ग यास नाहीं. टाईपांनीं छापण्यास सुरवात स. १४५० च्या सुमारास होऊन ही कला इटली व फ्रान्समध्यें १४६८, जर्मनी १४६६, इंग्लंड १४७७, स्कॉटलंड १५०७, आयर्लंड १५५१, मेक्सिको १५४४, गोवा १५५०, सीलोन १७३७, मद्रास १७७२, ईजिप्त १७९८, इराण १८२० येणेंप्रमाणें पसरली.
मु द्र ण यं त्र.- या यंत्राचा शोध १५ व्या शतकाच्या मध्यकालांत यूरोपांत लागला. प्रथम लांकडी यंत्रें उपयोगांत आलीं. पहिलें यंत्र गटेनबर्ग यानें काढलें व त्यावर त्यानें बायबल छापलें. या यंत्राची रचना कशी होती त्याचें वर्णन आढळत नाहीं. त्यानंतर १६ व्या शतकांत जें यंत्र वापरीत असत, तेंहि लांकडी असून हल्लीच्या हँडप्रेसप्रमाणेंच हातानें दांडा फिरविण्याचें होतें. खिळे जुळविलेला मजकूर ज्या फळीवर ठेवीत तिच्यावर दुसर्या एका फळीचा दाब स्क्रूनें बसे व मजकूर छापला जाई. त्यानंतर आमस्टर्डामच्या ब्ल्यू (१५७१-१६३८) नांवाच्या एका ड्राप्समननें वरील यंत्रांत स्क्रू, दांडा व टाईप ठेवण्याची खालची प्लेट यांच्यांत तीं सुलभ रीतीनें उपयोगांत आणतां येतील असा फरक करून दुसरें यंत्र काढलें. हीं दोन्ही प्रकारची लांकडी यंत्रें जवळ जवळ ३५० वर्षे उपयोगांत होती. पुढें १८ व्या शतकाच्या शेवटीं चार्लस स्टॅनहोप (१७५३-१८१६) यानें पहिलें लोखंडी यंत्र प्रचारांत आणलें. थोडयाशा शक्तीनें पुष्कळ काम काढावयाचें हा याच्यांत विशेष होता. टाईप ठेवण्याची फळी, व ती पुढें मागें सरकण्यास चामडयाच्या वाद्या व चाकें, स्पिंडल,यंत्राची उभी व बळकट चौकट, स्क्रू, टाईपावर दाब चांगला बसण्यासाठीं चौकटींत असलेली प्लेट इत्यादि अंगांत पुष्कळ सुधारणा केल्या. अद्यापिहि हें यंत्र उपयोगांत आणतात. याच्यांत आणखी कांहीं सुधारणा करून अल्बियन व कोलंबियन यंत्रें पुढें आलीं (सन १८४९-९८). अलबियन हे यंत्र वजनानें हलकें, कामास सोपें, साध्या रचनेचें, सर्व भाग सुटे होणारें, दाब बसविण्याच्या दांडयास थोडी शक्ति लागणारें व ज्यावर डबल क्राऊन (३० * २० इंच) कागद छापला जातो असें असतें. मोठें काम काढण्यास कोलंबियन यंत्र वापरतात, पण त्यास अल्बियनपेक्षां शक्ति जास्त लागते व त्यासाठीं एका कप्लिंगबारची योजना केलेली असते. मात्र यांत अल्बियनपेक्षां वेळेच्या प्रमाणांत काम थोडें होतें. हल्लीच्या साधारण हातयंत्रांत एका तासांत २५० प्रती छापून निघतात व यंत्र चालविण्यास (शाई लावणें व यंत्र चालविणें) दोन माणसें लागतात. सिलिंडरमशीनची कल्पना विल्यमनिकोल्सन (१८१५) यानें काढली. यांत छापावयाचा कागद या सिलिंडरास गुंडाळला जाऊन हातयंत्रांतील चौकटीच्या जागेची बचत होते व ती हातानें आंत लोटणें आणि बाहेर काढण्याचा त्रास व वेळ वाचतो, तसेंच शाईचेहि रूळ यांत ठेवल्यामुळें शाई लावणार्या माणसाचीहि गरज लागत नाहीं आणि हीं सर्व कृत्यें एकच दांडा फिरवून एकटा माणूस करूं शकतो. फ्रेडरिक कोनिग (१८३३) यानें जें यंत्र काढलें तें वाफेच्या शक्तीनें चाले व त्यांत दर ताशी ११०० प्रती निघत. मात्र यांत व निकोल्सनच्या यंत्रांत एका वेळीं कागदाची फक्त एकच बाजू छापली जाई. सिलिंडरच्या (गरगर फिरणार्या) जातीच्या यंत्रास रोटरी व प्लेटच्या (पुढें मागें होणार्या) जातीच्या यंत्रास रिसिप्रोकेटिंग यंत्रें म्हणतात. यापुढील सुधारणा म्हणजे एकाच फेर्यांत निरनिराळे दोन कागद समोरासमोर छापून निघणें ही होय. यांतहि प्रथम कागदाची एकच बाजू छापून निघे. यंत्रांत दोन प्लेटी असत व त्यावर दोन कागदांचा छापावयाचा जोडलेला टाईप ठेवीत; या यंत्रांत डबल डेमी (३५*२२ १/२ इंच) कागद छापून निघे. यानंतर टाईपरिव्हालव्हिंग यंत्र पुढें आलें, स्टीरिओटाईप गाल प्लेटी करण्याच्या पूर्वी हें यंत्र प्रचारांत आलें. त्यांत सिलेंडरवरच उभा किंवा आडवा टाईप जुळवून ठोकीत असत, त्यावर दाब बसण्यास दुसरे सिलेंडर फिरत आणि या सिलेंडरच्यामध्यें कागद असे. याच्यांत एकाच वेळी ४ पासून १० पर्यंत निरनिराळे कागद छापून निघत म्हणून त्यास फोर , सिक्स, एट अथवा टेनफीडर यंत्र म्हणत. असल्या प्रकारचें एक यंत्र १८७१ च्या सुमारास लंडनटाईम्ससाठीं अॅप्लेगाथ यानें तयार केलें होतें. त्यांतून दर ताशीं ८००० प्रती निघत, हें एटफीडर होतें. न्यूयॉर्कच्या रॉबर्ट हो आणि कंपनीनें कागदांच्या दोन्ही बाजू छापणारें यंत्र प्रथम तयार केलें. त्याची रचना वरील यंत्रासारखी असून, निरनिराळया कॉलमांत मजकूर छापला जाईल अशी त्यांत सोय होती. कागदाची एक बाजू छापल्यास दर ताशीं वीस हजार व दोन बाजू छापल्यांस दोन हजार प्रती निघत. कागदाचा एक रोलर घेऊन त्यावर एकाच वेळीं दोन्ही बाजू छापावयाच्या व एकाच मजकुराच्या अशा दोन प्रती यंत्रांच्या दोन निरनिराळया बाजूस काढावयाच्या, ही कल्पना विल्यम बुलक यानें (१८६७) काढलीं. या यंत्रास मात्र स्टीरिओटाईप सिलिंडर करावे लागतात. प्रथम प्रथम या यंत्रांत कागद ठरलेल्या ठिकाणीं कापण्याची व घडी घालण्याची अडचण पडे, पण ती निघून जाऊन ही यंत्रें फार प्रचारांत आली. विल्यम, बुलक हा या आपल्या यंत्राच्या पट्टयांत सांपडून मरण पावला.
अलीकडील छापण्याच्या यंत्रांत साधारणपणें पुढील यंत्रें विशेष उपयोगांत येतात (१) लोखंडीं हँडप्रेस- यावर प्रुफें व हस्तपत्रिका अगर जाहिराती अशीं किरकोळ कामें निघतात. (२) लहान प्लेटन प्रेस- हा पायानें अथवा वाफेच्या शक्तीनें चालतो व यावरहि कार्डे, सर्क्युलरें इत्यादि जॉबचीं कामें दर ताशी १ हजार प्रती याप्रमाणें २१ # १६ इंची कागद छापण्याचीं होतात. (३) सिंगल सिलेंडर मशीन (यांस इंग्लंडमध्यें व्हॉरफ्डेल्स स्टॉफ सिलेंडर म्हणतात) यांत पुस्तकें छापून निघतात व दर ताशीं १ हजार प्रती निघतात. कागद एका पंख्यानें काढून ठेवला जातो व शाई लावण्याची योजना फार चांगली असते. यानें कागदाची फक्त एकच बाजू एका वेळीं छापली जाते. (४) परफेक्टिंग मशीनमध्यें दोन सिलेंडर असून त्यांत एका वेळीं दोन बाजू छापून निघतात. लहान वर्तमानपत्रें व मासिकें वगैरे यांत छापून निघतात. हंबर कंपनीचें या जातीचें यंत्र उत्तम असतें व तें ताशीं हजार प्रती काढतें. (५) टू रेव्होल्यूशन मशीन, याचें सिलेंडर एक असूनहि हें नंबर चारच्या मशीनपेक्षां थोडया वेळांत जास्त काम-ताशीं दीड ते दोन हजार प्रती-देतें. यांत रंगीत छापण्याचें कामहि उत्तम होतें व डबल क्राऊनचें (६० # ४० इंच) काम निघतें. (६) टू कलरमशीनला एक अथवा दोन सिलेंडर असतात, छापण्याच्या प्लेटी दोन व शाईचे रूळ वगैरे साधनेंहि दोन टोकांस दोन स्वतंत्र असतात. (७) रोटरी मशीन, यांत कागदांचे अखंड रूळ जोडलेले असतात, आणि मजकुराच्या स्टीरीओटाईप अथवा इलेक्ट्रोटाईप प्लेटी केलेल्या असतात. या यंत्राचा उपयोग बहुधां वर्तमानपत्रें किंवा नियतकालिकें छापण्यासाठीं होतो. कागदाचे रूळ एकापासून आठापर्यंत उपयोगांत आणणारीं व चार ते आठ पानें एकदम छापणारी यंत्रें या वर्गांत असतात. कागद पकडून तो सर्व बाजूंनीं (४ ते १६ पानें) छापून व संपलेल्या ठिकाणीं तुकडा पाहून आणि शेवटीं त्याची घडी घालण्याचें व प्रती मोजण्याचें इतकीं कामें या यंत्रांत आपोआप होतात. या जातीचें पहिलें यंत्र १८६८ निघालें. त्यानंतर त्या जातीची निरनिराळया धर्तीची बरीच यंत्रे झालीं, त्यांत क्वाड्रूपल (चार रुळांचे) यंत्र पुष्कळ उपयोगांत येतें. हें यत्र ताशीं ४८ हजार प्रती काढतें. रॉबर्ट हो कंपनीचें यंत्र या जातीच्या यंत्रांत चांगलें असतें, यांच्यांत ३२ पानांच्या ५० हजार प्रती एकाच खेपेस दर ताशीं छापून निघतात, तर दर ताशीं १६ पानांच्या १ लाख व ८ पानांच्या दोन लाख प्रती निघतात. इतकें हें प्रचंड राक्षसी यंत्र आहे. याची लांबी ५४ फूट, रुंदी १२ फूट व उंची १९ फूट आणि वजन ११० टन असतें. किंमत साधारण १८००० पौंड पडते. याच्या कागदाच्या एका रूळांत पांच मैल लांबीचा व १४ हंड्रेडवेट वजनाचा कागद असतो.
छा प खा न्यां ती ल नि र नि रा ळया क्रि या.- पुस्तकें छापण्याच्या छापखान्यांत अनेक खातीं असतात; व त्यांवर एक 'जनरल मॅनेजर' आणि त्याच्या हाताखालीं 'वर्क्स मॅनेजर' असतो. एकंदर कामाची व्यवस्था येणेंप्रमाणें असतेः- मजकुराची हस्तलिखित प्रत छापखान्यांत आली कीं, ती प्रथम केसरूमवरील ओव्हरसीयरकडे दिली जाते व तो ती कंपॉझिटरांनां देतो. हें काम फक्त (कंत्राटपद्धतींने) करून घेतात किंवा आठवडयाचा किंवा महिन्याचा ठराविक पगार देऊन कंपाझिटर नेमतात. मजकूर टाईपांत जुळवून झाल्यावर त्याचें प्रूफ कागदावर काढून तें प्रूफकेरक्टरकडे देतात. तो तें मूळ प्रतीवरून वाचून त्यांतील चुका प्रुफाच्या कागदावर खुणांनीं दाखवितो. तपासलेलें प्रूफ कंपाझिटरकडे जातें व त्यावर हुकूम तो टाईपांत दुरुस्त्या करतो. त्यानंतर दुसरें प्रूफ काढून तें मूळ लेखकाकडे पाठवितात. तो मजकुरांत कमजास्त दुरुस्त्या करून तें परत पाठवितो. दुरुस्त्या असल्यास त्या झाल्यावर पुन्हां 'रिव्हाइज प्रूफ' काढून लेखकाकडे पाठवितात. याप्रमाणें जरूर तर दोन तीन वेळांहि 'रिव्हाइज प्रुफें' काढतात. पूर्ण दुरुस्ती झाल्यावर तो जुळविलेला मजकूर प्रिंटिंग डिपार्टमेंटकडे पाठवितात. छापखान्याच्या यंत्रावर त्याचें पुन्हा एक 'प्रेसप्रूफ' काढतात व तें तपासून दुरुस्त्या करतात; आणि शेवटीं छापण्यास हुकूम देतात. छापखान्यांतलें मुख्य कसब यंत्रावरून छापून प्रती काढण्यांत आहे. कागदावर यंत्राचा भार सर्वत्र सारखा पडून मजकूर, चित्रें किंवा आकृत्या चांगल्या उठणें ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. टाईप केलेल्या मजकुरांत चित्रांचें किंवा आकृत्यांचे ब्लॉक्स बसविणें असल्यास मजकूर व ब्लाक्स एका पातळीत येऊन सर्वांवर सिलेंडरचा दाब सारखा पडेल याबद्दल काळजी घ्यावी लागते.
लि थो ग्रा फी (शिळाप्रेस)- विशेष प्रकारें तयार केलेल्या दगडावर (शिळेवर) किंवा दुसर्या योग्य अशा पृष्ठभागावर आकृति काढणें व तीवरून अनेक छापील प्रती काढणें, या क्रियेला लिथोग्राफी म्हणतात. पाणी व चरबी यांच्यामध्यें जो परस्पर विरोधक गुण आहे त्यावर ही कला उभारलेली आहे. चरबी व पाणी यांनां समान आकर्षक रासायनिक रीत्या शुद्ध केलेला पृष्ठभाग, घेऊन, त्यावरील छापावयाचे जे भाग चिकट अशा मिश्रणानें झांकून टाकितात व बागीचा पृष्ठभाग ओला करतात, म्हणजे त्यावरून चरबीचा रूळ फिरविल्यास ओल्या भागाला चरबी न लागतां इतर भागाला ती लागते, व अशा पृष्ठभागावरून कागदावर किंवा अन्य पदार्थावर दाब पाडून छाप घेणें फारच सोपें जातें. ही कला अलॉइस सेनेफेल्डर (१७७१-१८३४) यानें शोधून काढली व ती त्यानें एकटयानेंच पूर्णत्वास नेली ही कौतुकास्पद गोष्ट आहे. उलटपक्षीं मुद्रणकलेची मूळ युक्ति निघाल्यानंतर तिचा हळूहळू विकास होऊन शेदोनशें वर्षांनीं ती पूर्णत्वास पोहोंचली. लिथोग्राफीच्या मुख्य दोन शाखा आहेत. एक खरखरीत (ग्रेन्ड) शिलेवर चरबीयुक्त रंगाच्या काडीनें काढलेल्या आकृती (चॉक-लिथोग्राफी) आणि दुसरा प्रकार गुळगुळीत शिळेवर शाईनें काढलेल्या आकृती. या प्रकारच्या शिळा प्रथम बव्हेरियांत सोलेनहोफेन गांवीं सेनेफेल्डर यासच सांपडल्या व नंतर फ्रान्स, स्पेन, इटली, ग्रीस वगैरे देशांत असल्या दगडांच्या खाणी सांपडल्या आहेत. पहिल्या प्रकारच्या कलेंत इंग्रज लिथोग्राफर विशेष प्रवीण आहेत, आणि दुसर्या प्रकारांत फ्रेंच, जर्मन व अमेरिकन कलाभिज्ञ प्रवीण आहेत. चॉक-लिथोग्राफीचे आणखी दोन प्रकार आहेत. एका प्रकारांत फक्त काळा रंग व त्याच्याच पांच सहा छटा असतात. दुसर्या प्रकारांत काळा व दुसरे एक डझन किंवा अधिकहि रंग असतात, व प्रत्येक रंगाकरितां एकेक स्वतंत्र शिळा असल्यामुळें कित्येक उत्तम चित्रांनां निरनिराळया रंगांच्या वीस ते तीसपर्यंत शिळा लागतात. शिळेऐवजीं खरखरीत कागद वापरण्याची युक्ति मॅकल्युअर, मॅकडोनल्ड अँड कंपनीनें १८६८ सालीं काढली. लिथोग्राफीचे मुख्य फायदे असे कीं, (१) काम थोडक्या खर्चांत होतें, (२) फार मोठया आकृतीहि काढतां येतात, (३) केवळ रेखायुक्त आकृती उत्तम उठतात, व छपाईचें काम कोणत्याहि प्रकारच्या कागदावर होऊं शकतें. शिक्षणविषयक आकृत्या, चित्रें व नकाशे, तसेंच भिंतीवरच्या जाहिराती वगैरे कामें लिथोग्राफीनें उत्तम होतात. १९०६ सालीं युनायटेड किंगडममध्यें २०३६७ इसम या धंद्यांत होते व सुमारें तितकीच संख्या फ्रान्स, जर्मनी, युनायटेडस्टेट्स वगैरे प्रत्येक देशांत असावी.
प्रोसेसः- मुद्रणकलेमध्यें ज्या पद्धतीनें चित्रांची प्रतिकृति छापली जाते त्या पद्धतीला हल्ली प्रोसेस हें नांव रूढ झालें आहे. या शब्दाला स्वतःचा निश्चित असा कोणताच अर्थ नाहीं. तथापि यांत्रिक पद्धतीनें चित्राच्या प्रतिकृती छापण्याच्या सर्व पद्धतींनां हा शब्द सामान्यतः लावण्यांत येतो. १९ व्या शतकांच्या अखेरच्या पादापर्यंत चित्रें छापावयाचीं म्हणजे मूळ चित्राची नक्कल लांकडावर धातूच्या, पत्र्यावर किंवा दगडावर खोदून तयार करावी लागे आणि या एकाच पद्धतीनें चित्रें छापणें शक्य असे. अर्थात् ही खोदलेली आकृति मूळाबरहुकूम तयार करावयाची म्हणजे खोदणारा कारागीर चांगला कुशल लागत असे व अशा रीतीनें फारच थोडीं चित्रें छापणें शक्य होत असे. १९ व्या शतकाच्या अखेरीस यांत्रिक व रासायनिक पद्धतीनें या जुन्या पद्धतीस मागें टाकलें.
उठावाची पद्धति:- या पद्धतीमध्यें छापणारा पृष्ठभाग उठावदार असून बाकीचा खोदला गेलेला असतो. ही पद्धषत फोटोग्राफीची कला वाढविल्यामुळें प्रचारांत आली. प्रथम मंगो पाँटन या नांवाच्या मनुष्यास असें आढळून आलें कीं, अंडयांतील पांढरा बलक अथवा दुसरा एखादा जिलेटिनयुक्त पदार्थ आणि पालाशद्विक्रुमित यांच्या मिश्रणानें एक असा पदार्थ तयार होतो कीं, त्यावर प्रकाश पडला असतां तो घट्ट होऊन पाण्यांत अविद्राव्य बनतो व पाणीहि शोषून घेत नाहीं. तेव्हां अशा पदार्थाचे पातळ पडदे तयार करून ते फोटोग्राफीच्या ॠणकांचेखालीं ठेवून त्यांवर विशिष्ट तर्हेनें प्रकाश पाडलां असतां त्यास विशिष्ट ठिकाणी घट्ट व अविद्राव्य स्वरूप देतां येईल. याच शोधावर पुढील सर्व पद्धती उभारल्या आहेत.
रेषायुक्त ठसेः- जेव्हां रेषायुक्त ठसे तयार करावयाचे असतील तेव्हां मूळ चित्रांतील रेषा स्पष्ट व काळया असतील अशी खबरदारी घ्यावी. याकरितां इंडियन इंक व ब्रश हीं साधनें वापरणें चांगलें. मूळ आकृतींतील रेषा जर फार बारीक असतील तर मूळ चित्र मोठें करून त्यावरून ठसा करणें चांगलें. आपल्याला ज्या आकाराचा ठसा करावयाचा असेल त्या आकाराचा मूळ चित्राचा प्रथम फोटो घ्यावा. नंतर एक तांब्याचा किंवा जस्ताचा गुळगुळीत पत्रा घेऊन त्यावर बलक व पालाशद्विक्रुमित यांच्या मिश्रणाचा पातळ थर द्यावा. नंतर त्या पत्र्यांवर ॠण कांच ठेवून तो सूर्यप्रकाशांत ठेवावा, म्हणजे त्या पत्र्यावरील थर घट्ट होईल. नंतर सर्व एका काळोखाच्या खोलींत नेऊन तेथें त्या पत्र्यावर रुळानें शाई लावावी आणि तो पाण्यांत ठेवून द्यावा. कांहीं वेळानें प्रकाशानें घट्ट झालेला मिश्रणाचा भाग सोडून बाकीचा भाग विरघळून जाईल. राहिलेल्या भागावर अस्फाल्टची पूड टाकून थोडी उष्णता द्यावी, म्ळणजे उठावदार पृष्ठभागावर अस्फाल्ट चिकटून त्यावर अम्लाचें कार्य होणार नाहीं. नंतर पत्र्यास खालच्या व चारी बाजूंनीं वार्निशचा हात देऊन तो पत्रा श्नीणनत्राम्लांत ठेवाव म्हणजे पत्र्याचा मोकळया राहिलेल्या भागावर नत्राम्लाचें कार्य होऊन तो झिजून जाईल, व बाकीचा मिश्रणानें आच्छादलेला भाग कायम राहील. याप्रमाणें मूळ चित्रांतील रेषांचा भाग पत्र्यावर उठावदार रीतीनें दिसूं लागेल. हा पत्रा लांकडाच्या ठश्यावर ठोकल्या म्हणजे छापावयास ठसा तयार होईल.
पुढें मूळ चित्रांतील निरनिराळया छायेच्या छटा येण्याकरितां वरील पद्धतींत निरनिराळे फरक करण्यांत आले. जिलेटिन व पालाशद्विक्रुमित यांचे मिश्रण पाण्यांत ठेवले असतां फुगतें. या गुणधर्माचा उपयोग करून वरील पद्धतीनेंच या मिश्रणाच्या पडद्यावर प्रकाशाचें कार्य करून घेऊन व नंतर तो पडदा पाण्यांत ठेवून त्यापासून प्रथम प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा सांचा तयार करून त्यावरून तांब्याचा इलेक्ट्रोटाईप सांचा तयार करतां येतो.
दुसर्या एका पद्धतींत छापावयाच्या चित्राची प्रतिकृति मेणावर खोदून काढून तिच्यापासून तांब्याचा इलेक्ट्रोटाईप तयार करण्यांत येतो. या पद्धतींत फोटोग्राफीचें काम पडत नाहीं.
याप्रमाणें रेषायुक्त चित्रें छापतां येऊं लागल्यावर प्रकाश व छाया यांचे निरनिराळें प्रमाण असलेलीं चित्रें छापण्याबद्दल प्रयत्न सुरू झाले. व हा प्रकाश आणि छाया यांचा परिणाम चित्रांमध्यें कमीजास्त प्रमाणावर बारीक टिंबें किंवा रेषा उठवून दाखविण्यांत येऊं लागला. परंतु हा परिणाम घडवून आणण्याकरितां उठवावयाची टिंबें व रेषा फारच बारीक व नाजूक असाव्या लागतात व याकरितां स्क्रीन किंवा पडदा वापरण्याची युक्ति निघाली. ही स्क्रीन म्हणजे एका कांचेवर सारख्या अंतरावर बारीक आडव्या रेषा आंखून घेऊन व त्या उज्जप्लवाम्लानें (हायड्रोफ्लओरिक) कांचेमध्यें खोदून व त्यांत काजळ भरून तयार करण्यात येते. हा पडदा फोटोग्राफ घेतांना कांचेच्या आड योग्य अंतरावर ठेवला म्हणजे आपणांस पाहिजे तशा रेषा फोटोग्राफीच्या कांचेवर उठवितां येतात. या पद्धतीला हाफटोनपद्धती असें म्हणतात. या पद्धतींत वापरावयाचा पत्रा प्रथम जस्ताचा वापरीत असत. परंतु तांब्याच्या पत्र्यावरून अधिक चांगली छपाई होते असें दिसून आल्यापासून चांगल्या छपाईकरितां तांब्याचा पत्रा वापरण्यांत येऊं लागला.
अशा रीतीनें हाफटोन पद्धतीनें केलेल्या ठशापासून निरनिराळे रंग योग्य प्रमाणांत वापरून कोणत्याहि चित्रांतील अनेक प्रकारचे निरनिराळे रंग आपणांस छापलेल्या चित्रांत दाखवितां येतात. व हा परिणाम घडवून आणण्याकरितां फक्त तीन वेळां छपाई करावी लागते.
इंटॅलिओ-पद्धति:- या पद्धतीमध्यें छापणारा पृष्ठभाग ठशामध्यें उठावदार नसून आंत खोदलेला असतो, व छापतांना त्यामध्यें असलेली शाई कागदावर येते व बाकीचा ठशाचा भाग स्वच्छ पुसून टाकलेला असतो. लांकडी ठशामध्यें पूर्वी याच पद्धतीचा उपयोग करीत असत. या पद्धतीनें ठसे बनविण्याच्या ज्या निरनिराळया रीती आहेत त्यांस फोटोग्रेव्ह्यूर असें सामान्य नांव आहे, व हेलिओ ग्रेव्ह्यूर हाहि याच पद्धतीचा एक प्रकार आहे. या फोटोग्रेव्ह्यूर पद्धतीनें इतर सर्व पद्धतींपेक्षां अधिक चांगल्या तर्हेनें मूळ चित्रावर हुकूम चित्र छापतां येतें. या पद्धतीमध्यें ठसे तयार करण्याच्या कामीं वरीलच जिलेटिन व पालाशद्विक्रुमिताचें मिश्रण उपयोगांत आणितात. परंतु पडदा वापरावयाच्या ऐवजीं पत्र्यावर बिटयूमिनची बारीक पूड टाकून तिला थोडी आंच देऊन नंतर तीवर वरील मिश्रणाचा पडदा ठेवून त्यावर फोटोग्राफीच्या कांचेतून प्रकाश घेतात व धुतल्यानंतर पत्र्यावर लोहहरिदाची क्रिया करून पाहिजे तसा ठसा बनवून घेतात. ही पद्धत जरा खर्चाची आहे व या ठशावरून छापण्याचेंहि काम नाजूक व काळजीपूर्वक करावें लागतें व ठसेहि बिघडण्याचा फार संभव असतो. याच पद्धतीमध्यें बिटयूमिनच्या भुकटीच्या ऐवजीं कांचेचा पडदा वापरून व हाफटोनच्या उलट क्रिया करून ठसे बनवितां येतात, परंतु ही पद्धत फारशी प्रचारांत दिसत नाहीं.
मोनोटाईपः- याखेरीज मोनोटाईप या नांवाची एक पद्धत आहे. तीमध्यें छापावयाचे चित्र एका पत्र्यावर पाहिजे त्या रंगांत अगर शाईनें काढून ते प्रेसमध्यें घालून उलट दुसर्या कागदावर घ्यावयाचें असतें व नंतर आपणांस पाहिजे त्या कागदावर पुन्हां सुलट छापावयाचें असतें. परंतु या पद्धतीमध्यें एकच प्रत छापतां येते. तथापि तें चित्र ओलें असतां त्यावर धातूची भुकटी टाकून याच पद्धतीनें उठावदार इलेक्ट्रोटाईप करून घेणेंहि शक्य आहे व त्यावरून हजारों प्रती छापून घेणें अशक्य नाहीं हें सर ह्यूबर्ट यानें दाखवून दिलें आहे.
जेव्हां एखाद्या चित्राच्या अनेक प्रती छापावयाच्या असतात तेव्हां मूळ ठसा कायम ठेवून त्यावरून अनेक ठसे बनविणें आवश्यक असतें. अशा वेळीं मूळ ठशावर प्लंबॅगोची भुकटी टाकून त्यावरून एक मेणाचा ठसा तयार करण्यांत येतो, व त्या ठशापासून विजेच्या साहाय्यानें तांब्याचे पाहिजे तितके ठसे तयार करतां येतात. जास्त काळजीपूर्वक ठसे करावयाचे असल्यास मेणाच्या ऐवजीं गटापर्चा वापरण्यांत येतो. याहूनहि जास्त प्रती छापावयाच्या असल्यास तांब्याच्या ऐवजीं विजेच्या साहाय्यानें पोलादाचेहि ठसे बनविण्यांत येतात.
ज्याप्रमाणें छापावयाच्या ठशामध्यें वरचेवर फरक होत गेले त्याप्रमाणें छापण्याच्या यंत्रामध्येंहि वरचेवर फरक करण्यांत आले. विशेषतः यंत्रांतील दाब देण्याच्या पद्धतीमध्यें फेरफार करणें अवश्य झालें. हे सर्व फरक प्रथम अमेरिकेमध्यें होऊन नंतर सर्व जगभर त्यांचा प्रसार झाला.
वूडबरी टाईपः- आतांपर्यंत दोन पद्धती सांगितल्या, त्यांत छपणारा पृष्ठभाग इतर पृष्ठभागाच्या वर किंवा खालीं असतो. परंतु शिळाछापासारख्या कांहीं पद्धतींत सर्व पृष्ठभाग एकाच पातळींत असतो. वूडबरी टाईपपद्धतींत पूर्वीच्या नैसर्गिक मुद्रणपद्धतीचा उपयोग करण्यांत येतो. या नैसर्गिक मुद्रणपद्धतीमध्यें छापावयाच्या पानें वगैरेसारख्या नैसर्गिक वस्तू खूप जोराच्या दाबाच्या योगानें एखाद्या नरम धातूच्या पत्र्यामध्यें दाबून बसविण्यांत येत असत, व त्यावरून प्रतिकृती छापण्यात येत असत. वूडबरीनें वर सांगितलेल्या जिलेटिनच मिश्रणाचा प्रकाशामध्यें कडक होण्याचा गुणधर्म उपयोगांत आणून अशा प्रकाशाच्या योगानें कडक झालेला जिलेटिन-मिरझाच्या पडद्याचा भाग दाबाच्या साहाय्यानें शिशाच्या किंवा टाईपाच्या धातूच्या पत्र्यामध्यें घट्ट दाबून बसवून ठसे तयार करण्याची युक्ति काढली.
कोलो-टाईप अथवा फोटो-टाईपः- या पद्धतीमध्यें इसीन ग्लास, जिलेटिन किंवा गोंद यांचें पालाशद्विक्रुमिताशीं मिश्रण करून घट्टपणा येण्याकरितां तुरटी किंवा दुसरा एखादा पदार्थ त्यांत घालून त्याचा पातळ पडदा तयार करून वरील पद्धतीप्रमाणें प्रकाशाच्या साहाय्यानें त्यावर आपणाला पाहिजे तसें चित्र वठवून त्याच पडद्याचा प्रत्यक्ष शाई लावून छापण्याकडे फार उपयोग होतो व या पद्धतीनें चित्रांतील अनेक रंग उठावदार पद्धतीनें दाखवितां येतात. हेलिओ टाईप हाहि याच पद्धतींतील एक दुसरा प्रकार आहे. परंतु या प्रकारानें प्रती फार थोडया छापून घेतां येतात तरी त्या प्रत्यक्ष फोटोग्राफसारख्या दिसतात.
फोटोलिथोग्राफीः- अलीकडे पूर्वीच्या शिळांऐवजी जस्ताचे किंवा अल्यूमिनमचे पत्रे वापरण्याची पद्धत आली आहे. या पत्र्यांच्या अंगींहि शिळांप्रमाणेंच शाई ओढून घेण्याची शक्ति असते व छापण्याची पद्धतीहि एकच असते. या पद्धतीमध्यें पत्र्यावर जिलेटिनमिश्रणाचा पातळ थर देऊन छापावयाच्या चित्राची फोटोग्राफ घेतलेली ॠण कांच उलटी ठेवून तीवर प्रकाश पाडून जिलेटिनमिश्रणाचा पृष्ठभाग कडक झाला म्हणजे कोलोटाईपप्रमाणें छापतां येते, किंवा हीच कृति एका कागदावर करून तीवरील चित्र पत्र्यावर दाबानें ट्रान्सफर करून घेऊन त्यावरून प्रतिकृति छापतां येते. या पद्धतींतील बाकीच्या सर्व क्रिया शिळाछापाप्रमाणेंच आहेत. याच पद्धतीचा इंकोफोटो या नांवाचा एक प्रकार आहे, त्याची कृति स्प्रेग या कंपनीनें गुप्त ठेविली आहे. परंतु त्या पद्धतीनें होणारें काम इतकें सुबक दिसत नाहीं.
या पद्धतींत दगडाऐवजी जस्ताच्या पत्र्यावर चित्र ट्रान्सफर करून घेतल्यानंतर त्याला शाई लावून अम्लाच्या साहाय्यानें बाकीचा पृष्ठभाग झिजवून छापावयाच्या चित्राचा उठावदार ठसा तयार करून साध्या छापण्याच्या पद्धतीनेंहि छापतां येतें, या पद्धतीस झिंकोग्राफी हें नांव आहे.
हिं दु स्था न.- वास्कोदिगामानें हिंदुस्थानांत पाऊल ठेवल्यानंतर ६४ वर्षांनीं म्हणजे दोन पिढयानंतर पोर्तुगीज लोकांनीं हिंदुस्थानांत प्रथम छापखाना काढला. लष्करी व मुलकी राज्यकारभारांत पोर्तुगीजांनां मुद्रणकलेचा उपयोग करण्याचें कारण फार अल्प पडलें असावें; मिशनरी लोकांनी मात्र छापण्याच्या सोयीचा उपयोग बराच केलेला दिसतो. अमेरिकेंत काय किंवा पौरस्त्य देशांत काय आरंभीचीं छापील पुस्तकें बहुतेक स्पॅनिश व पोर्तुगीज मिशनदी लोकांनीं देश्य लोकांत धर्मोपदेश व धर्मप्रसार करण्याच्या कामांकरतां तयार केलेलीं होती. हिंदुस्थानांत पहिलें पुस्तक १५६० सालीं छापलें गेलें. तें गोव्याचा आर्चबिशप बास्पर डी लीओ ह्यानें लिहिलेलें 'दि स्पिरिच्युल कॉपेंडियम ऑफ दि ख्रिश्चन लाईफ' हें होय. नंतर १५६३ मध्यें गार्सिया डा ओर्टा याचें ''डयलॉग्ज ऑन इंडियन सिंपल्स ऍंड ड्रग्ज'' हें पुस्तक प्रसिद्ध झालें. आर्चबिशप लीओनें ज्यू लोकांविरुद्ध एक व मुसुलमान लोकांविरुद्ध एक अशीं आणखी दोन पुस्तकें छापून प्रसिद्ध केलीं. पुढें १६५५ पर्यंत गोव्यास फक्त आणखी तेरा पुस्तकें छापून निघाली होतीं. त्यांपैकीं एक विशेष महत्त्वाचें म्हणजे 'मराठी भाषेंतलें सेंटेपीटरचें चरित्र' हें एस्टेव्हाओ दा क्रूझचें पुस्तक होय. हिंदुस्थानच्या देश्य भाषेंत यूरोपीयनानें लिहिलेलें हें पहिलेंच पुस्तक होय. १५७७ सालीं एक व १५९८ मध्यें एक अशीं दोन तामिळ पुस्तकें मलबारकिनार्यावरील अंबलकर येथें जेसुईट लोकांनीं छापलीं होती असें म्हणतात, पण तीं हल्ली नष्ट झालीं असावी किंवा निराळया नांवांनीं अस्तित्वांत असतील.
हिंदुस्थानांत अलीकडे छापखान्यांची वाढ किती वेगानें झाली तें छापखान्यांच्या संख्येच्या पुढील आंकडयांवरून कळेलः- सन १९०१ मध्यें २१९३ छापखाने १९०५ सालीं २३८०; १९१० सालीं २७५१; १९१५ सालीं ३२३७; १९२० सालीं ३७९५ व १९२२ सालीं ४०८३ छापखाने होते.
मुद्रणविषयक कायदा (प्रेसलॉ).- स. १८३५ पूर्वी पुस्तकें व वर्तमानपत्रें छापण्याकरितां गव्हर्नर-जनरल इन कौन्सिलकडून परवाना (लायसेन्स) घ्यावा लागत असे. सदरहू सालीं प्रिंटरनें स्वतःचें नांव सरकारांत नोंदवावें हा व कांहीं किरकोळ नियम करण्यांत आले. १८६७ सालीं 'प्रेस ऍंड रेजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ऍक्ट' पास करण्यांत आला. स. १८७८ मध्यें लॉर्ड लिटनच्या कारकीर्दीत 'व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट' पास झाला, पण लॉर्ड रिपनच्या वेळीं १८८२ मध्यें तो रद्द झाला. १९०८ मध्यें 'न्यूजपेपर (इन साइटमेंट टू ऑफेन्सेस) ऍक्ट' पास झाला. खून किंवा अत्याचार यांनां उत्तेजन देणार्या वर्तमानपत्रांचा बंदोबस्त त्यानें करण्याचा उद्देश होता, पण तो सफल झाला नाहीं; म्हणून १९१०सालीं 'दि इंडियन प्रेस ऍक्ट' हा व्यापक कायदा करण्यांत आला. त्यांत खून, अत्याचार यांचा बंदोबस्त; व शिवाय शिपायांनां किंवा खलाशांनां कर्तव्यपराङ्मुख करण्याचा, किंवा ब्रिटिशसरकार, कोणताहि संस्थानिक किंवा ब्रिटिश प्रजाजनांचा कोणताहि वर्ग यांच्याविरुद्ध द्वेष किंवा तिरस्कार उत्पन्न करण्याचा किंवा सरकारी नोकराला किंवा खाजगी व्यक्तीला धमकी देण्याचा मजकूर यांचा बंदोबस्त करणारीं कलमें होतीं. त्यांत छापखानेवाले व वृत्तपत्रकार यांच्यापाशीं जामीनकी मागणें व ती जप्त करणें वगैरे अधिकार सरकारनें घेतले होते. स. १९१७ पासून या कायद्याविरुद्ध विशेष ओरड होऊं लागली. स. १९२१ त नेमलेल्या कमिटीनें प्रेसऍक्ट, व न्यूजपेपर्स इनसाइटमेंट टू आफेन्स ऍक्ट हे दोन्ही रद्द करण्याची आणि प्रेस ऍंड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ऍक्टमध्यें कांहीं दुरुस्त्या करण्याची सूचना केली गेली आणि आणि तदनुसार स. १९२२ मध्यें दोन्ही कायदे रद्द होऊन तिसर्या कायद्यांत दुरुस्त्या करण्यांत आल्या, त्या:- (१) वृत्तपत्राच्या प्रत्येक अंकावर संपादकाचें नांव असावें आणि त्यांतील मजकुराबद्दल संपादक व मुद्रक व प्रकाशक यांच्या इतकाच दिवाणी व फौजदारी कायद्यास जबाबदार असावा. (२) राजद्रोही लिखाण जप्त करण्याचा अधिकार प्रांतिक सरकारला असावा, पण त्या हुकुमाच्या न्याय्यान्यायतेचा निवाडा कोर्टांत मुद्रकाला किंवा इतराला करून घेतां यावा. (३) कस्टम व पोस्ट-ऑफिसांनां राजद्रोही वाङ्मय जप्त करण्याचा अधिकार असावा; पण त्याविरुद्ध कोर्टांत दाद मागतां यावी.