विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुण्डकोपनिषद्- दहा प्रसिद्ध उपनिषदांपैकीं एक. हें अथर्वणवेदाचें मंत्रोपनिषद् आहे. याचीं तीन मुंडकें असून त्या प्रत्येक मुंडकाचे दोन खंड आहेत. प्रथमतः या उपनिषदाच्या प्रारंभीं ब्रह्मदेवापासून शौनकापर्यंतच्या संप्रदायप्रवर्तक ॠषींचा निर्देश आलेला आहे. त्यानंतर शौनकानें आपल्या अंगिरस नामक गुरूला 'भगवान् कोणाचें विज्ञान झालें असतां हें सर्व विज्ञान होतें' असा प्रश्न केल्यावर त्याला अंगिरसानें परा व अपरा अशा दोन विद्या आहेत व त्यांचें यथार्थ ज्ञान झालें असतां सर्व विज्ञान होतें असें सांगितलें आहे. त्यानंतर अखिल भूतयोनींचें मूळ ब्रह्म असून त्याच्यापासून विश्वोत्पत्ति कशी होते हें निरनिराळया दृष्टांतांनीं कथन केलें आहे. नंतर दुसर्या खंडांत अपराविद्येचा विषय जो संसार व पराविद्येचा विषय मोक्ष त्यांचें विवेचन केलें आहे. दुसर्या मुंडकांतील प्रथम खंडांत अक्षरापासून त्याच्याच स्वरूपाचे भिन्न भाव कसे होतात व त्यांतच कसे विलीन होतात तें सांगून पुरुषच हें सर्व विश्व आहे व त्याला बुद्धीच्या साहाय्यानें जाणावें असें सांगितलें आहे. दुसर्या खंडांत या ब्रह्माचा उपनिषदांतील महास्त्ररूप धनुष्य घेऊन उपासनेनें तीक्ष्ण केलेला शर योजून वेध करावा असें अलंकारिक भाषेंत म्हटलें आहे. ॐकार हें धनुष्य व सोपाधिक आत्मा हा शर असून त्याचें ब्रह्म हें लक्ष्य आहे असें पुढें कथन केलें आहे. शेवटच्या मुंडकांत शरीररूपी ऊर्ध्वमूल व अधश्शाख अशा वृक्षावर बसलेल्या दोघा समानधर्मी पक्ष्यांचा 'द्वासुपर्णा' या प्रसिद्ध मंत्रानें उल्लेख करून त्यांपैकीं एक अहंभाननेनें प्रेरित झाल्यामुळें शोकमग्न होतो पण पुढें दुसर्या पक्ष्याची सेवा करून शोकरहित होतो असें म्हटलें आहे. शेवटीं आत्मज्ञान अनन्यभावानें प्रार्थना केल्यानेंच प्राप्त होतें असें सांगून ब्रह्मरूप होणें हाच मोक्ष होय असें म्हटलें आहे.