विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुंडा- उत्तरहिंदुस्थानांतील एक मानववंश व जात. बंगाल, बिहार, ओरिसा, आसाम इत्यादि प्रांतांत या जातीचे लोक आढळतात. या जातीची लोकसंख्या सुमारें ६ लाख असून मुख्य वस्ती, छोटानागपूरमधील रांची जिल्ह्यांत आढळते. मुंडा याचा अर्थ 'खेडयांतील मुख्य गृहस्थ' असा आहे. मुंडा लोक द्राविड शाखेचे असावेत असें रिस्लेचें मत आहे. मुंडा जातींत देवकपूजेचें फार माहात्म्य आहे. सिंगबोंग, बुरुबोंग, मरंगबोंग, पटसरणा इत्यादि देवांची हे पूजा करतात. सिंगबोंग हा सर्वांत मुख्य देव आहे. मनुष्य आयुष्यांत ज्यामानानें चांगलीं वाईट कर्मे करीत असतो त्यामानानें, मेल्यावर सिंगबोंग हा पुन्हां त्या माणसाला मनुष्य पशु, पक्षी अगर कृमी इत्यादि योनींत घालतो अशी यांची समजूत आहे. मागेपरब, फागु, सरहुल, होनवापरब, बर्तौलि करम, कोलोमसिंगबोंग, सोहोसह, सोसोबोंग इत्यादि उत्सव साजरे करण्यांत येतात. या जातींतील बरेच लोक ख्रिस्ती आहेत. ज्यांनीं ख्रिस्तीधर्म स्वीकारलेला नाहीं अशांच्यावर देखील ख्रिस्तीधर्माचा बराच परिणाम झालेला दिसतो.
मुं डा भा षा व र्ग.- हिंदुस्थानांतील लोक ज्या एकंदर भाषा बोलतात त्यांचे मुख्य चार वर्ग पडतात, व त्यांपैकीं मुंडा नांवाच्या वर्गांतील भाषा बोलणार्या लोकांची संख्या सर्वांत कमी म्हणजे सुमारें ३० लाखपर्यंत आहे. या मुंडाभाषावर्गाला आणखीहि कित्येक नांवें पडलेलीं आहेत. मुंडारी ही कोल भाषेची एक शाखा आहे असें हॉगसनप्रभृति विद्वानांचें मत आहे. पण मुंडा व द्राविडी भाषा एकाच वंशाच्या नाहींत. मुंडा व द्राविडी हे दोन निरनिराळे भाषावर्ग आहेत ही गोष्ट प्रथम मॅक्समुल्लरनें दाखवून दिली. तथापि मुंडाभाषावर्ग या नांवालाहि थोडी हरकत आहे, ती अशी कीं, परकीय लोक मुंडा हा शब्द रांची जिल्ह्यांतील लोकांनांच फक्त लावतात. मुंडारी भाषेमध्यें मुंडा म्हणजे ग्राममुख असा संताळी भाषेंतील 'मांजही' या शब्दासारखाच अर्थ आहे. मुंडा हा शब्द मुंडारी भाषा बोलणार्या लोकांनांच फक्त लावतात. तेव्हां सर्व भाषावर्गाला मुंडा हें नांव द्यावयाचें तें अर्थात सांकेतिक अर्थानेंच होय. याशिवाय या भाषावर्गाला जॉर्ज कँपबेल व प्रो. थॉमस यांनीं अनुक्रमें कोलरी व खेरवारी अशीं नांवें देण्यांत यावींत असें सुचविलें आहे. पण मॅक्समुल्लरनें दिलेलें मुंडा हेंच नांव या लेखांत कायम ठेविलें आहे.
प्रस्तुत काळीं मुंडा भाषा मुख्यतः छोटानागपूर प्रांतांत चालतात. शिवाय मद्रासनजीकच्या जिल्ह्यांत, मध्यप्रांतांत व महादेव टेंकडयांमध्येंहि ह्या भाषा बोलणारे लोक आहेत डोंगरांत व जंगलांत राहणारे लोक या भाषा बोलतात. मुंडा भाषा बोलणारांपेक्षांहि मुंडा जातीचे लोक अधिक आहेत. कारण दक्षिणहिंदुस्थानांत रहाणार्या द्राविडी लोकांत मुंडा जातीचे लोक फार पूर्वीपासून मिसळून गेलेले आहेत आणि उत्तरहिंदुस्थानांतील लोकांतहि त्यांचें मिश्रण आहे. मुंडा भाषेचा द्राविड भाषावर्गावर थोडफार परिणाम झाला आहे.
मुंडावर्गांतील पोटभाषा:- संताळी, मुंडारी, भुमिज, बीरहार, कोडा, हो, तूरी, असुरी, कोरवा, कूरकू, खरिआ, जुआंग, सवर, गडबा. इ.संताळी, मुंडारी, भुमिज, बीरहार, कोडा, हो, असुरी, व कोरवा या भाषा म्हणजे मूळ एकाच भाषेंतून निघालेले प्रकार असूनत्यांत परस्पर फरक अल्प आहे. वरील सर्व जातीचें लोक मूळ खरेवारी उर्फ खारवारी या एकाच वंशांतून निघालेले आहेत. हल्ली खरेवारी जातीचे लोक छोटा नागपूर व दक्षिण बिहारप्रांतांत जमीनदार व शेतकरी या स्थितींत रहात आहेत. मुंडाभाषावर्गांतील खेरवारी हीच मुख्य भाषा असून शेजारच्या भाषांचा तिच्यावर परिणाम त्यामानानें मुळींच झालेला नाहीं. बाकी राहिलेल्या भाषा बोलणारांची संख्या त्यामानानें फार अल्प असून त्यांच्यावर आर्यभाषांचा परिणाम पुष्कळ झालेला आहे; आणि सबर व गडबा या भाषांवर शिवाय द्राविडी भाषांचाहि परिणाम झालेला आहे. (लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया, पु. ४.)