विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुझफरपूर- बहारप्रांत. पाटणा विभागांतील जिल्हा. क्षेत्रफळ ३०३६ चौरस मैल. लोकसंख्या २७५४८४५. या जिल्ह्यांत बरेचसे प्रवाह असून पाण्याचा पुरवठा चांगला आहे. आग्नेयीकडे कांही तलाव आहेत. यांतील मुख्य नद्या गंगा व गंडकी या होत. बहुतेक जमीन सुपीक आहे. जंगल नाहीं. पाऊस ४६ इंच पडतो. हवा थंड आहे. फार पूर्वी या जिल्ह्याच्या उत्तर भागांत मिथिल व दक्षिण भागांत वैशाली नांवांचीं राज्यें होतीं. मिथिल देश पाल व सेन घराण्यांच्या नंतर सन १२०३ त बखत्यार खिलजीकडे आला. १८ व्या शतकापासून येथें ब्राह्मण राजे झाले व नंतर सन १५५६ पासून मोंगल अंमल सुरू झाला. ई. इंडिया कंपनीला दिवाणी मिळाल्यानंतर सन १७८२ त बिहार व तिरहुत (हाजीपूर सुद्धं) असे दोन भाग पडले. बलसंदर (म्हणजे रेताळ चिकण माती), मटियारी (चिकण माती), बंगर व उसर असे जमिनीचे चार प्रकार यांत आढळतात. मुख्य पिकें गहूं, तांदूळ, जव, तुरीची डाळ, कडधान्यें, तीळ, मका, नीळ, वगैरे. येथें कापड, सतरंज्या, भांडीं, तसेच पालख्या, वगैरे लांकडी सामानहि होतें. परंतु मुख्य व्यापार म्हणजे नीळीचा होय. या जिल्ह्यांत साखर बरीच तयार होते. हा जिल्हा शिक्षणाच्या बाबतींत बंगालपेक्षां मागासलेला आहे. शें. ४ लोकांनां लिहितां वाचतां येतें. मुझफरपूर हें जिल्ह्याचें मुख्य ठिकाण आहे. लोकसंख्या (१९०१) ४३६६८. येथें सन १८६४ मध्यें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. येथें लहान गंडकी नदीतून होडयांच्या योगानें बराच व्यापार चालतो. येथें एक कॉलेज आहे.