विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुक्तेश्वर- याचा जन्म सुमारें शके १५२१ तील असून हा एकनाथाच्या गोदूबाई नांवाच्या मुलीचा मुलगा होय. मुक्तेश्वर हा मूळ पैठणचा, परंतु पुढें पैठण सोडून तो दुसरीकडे गेला असें दिसतें. याला मौजे सोनारीचें जोसपण होतें. हा कथाकीर्तनें करीत असे. याचें गोत्र अत्रि व बापाचें नांव चिंतामणी उर्फ विश्वंभर होतें. याला विद्येची आणि ग्रंथरचनेची गोडी एकनाथापासून लागली. त्याच्या लहान लहान काव्यांतहि एक तर्हेचें कौशल्य व धाटणी दिसून येते. याचें रामायण मात्र मोठाल्या काव्यांपैकीं प्रथम रचलें असावें. मुक्तेश्वराचीं सृष्टिसौंदर्याची वर्णनें व कोणत्याहि मनोविकाराची भावनेसह रेखाटलेलीं शब्दचित्रें मनोवेधक आहेत. तो आपल्या वर्णनांत अनेक रसांची भेसळ करून देऊन वाचकांच्या मनांत अनेक विकार एकदम उत्पन्न करतो. याच्या काव्यांत कालविपर्यासाचा दोष आहे. याचें रामायण कायतें पूर्ण आहे. महाभारताचीं पांचच पर्वे उपलब्ध आहेत. तशींच इतर लहान लहान आख्यानेंहि त्रुटितच आहेत. याचे अनुपलब्ध ग्रंथ फार आहेत अशी लोकसमजूत आहे. हा शके १५७१ पूर्वी तेरवाड येथें वारला. तेथें याची समाधि आहे. यानें आपलें महाभारत रचलें त्यापूर्वी विष्णुदासनाम्याचें महाभारत यानें पाहिलें असावें असें दिसतें. हा दत्तभक्त होता. याचा नातु मुक्तेश्वर नांवाचाच असून त्यानेंहि काव्यरचना केली आहे व तिच्यावर आजच्या काव्यरचनेची छाप पडली आहे. (कवि चरित्र).