विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मुक्तिफौज- सर्वत्र सामाजिक कार्य करणारी ही एक धार्मिक संस्था आहे. ती इंग्लंडांत विल्यम बूथ नांवाच्या इसमानें १८६५ सालीं स्थापन केली. ह्या संस्थेचे मुख्य हेतूः- (१) ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणें, व (२) लोकांतील दारिद्रय व दुर्गुण नाहीसें करून सामाजिक सुधारणेस मदत करणें हे आहेत. बूथनें प्रथम कांहीं तरुण इसमांच्या साहाय्यानें गरीब लोकांनां मदत करण्याचें काम सुरू केलें. पुढें या कामांत बूथला त्याची बायको कॅथराईन हिची फार मदत होऊं लागली. ती धर्मोपदेशपर व्याख्यानें फार चांगली देत असे; आणि तीं दोघे इंग्लंडभर फिरून आपलें परोपकाराचें काम करूं लागलीं. खुद्द लंडन शहरांतील ईस्ट एन्ड या भागांत त्यांचें काम फार लोकप्रिय झालें. स्वतःच्या संस्थेला प्रथम बूथनें ख्रिश्चन मिशन असें नांव दिलें. १८७५ सालपर्यंत या संस्थेच्या लंडन व इतर ठिकाणीं मिळून ३२ शाखा-विशेषतः मिसेस बूथ हिच्या कतृत्वानें-स्थापन झाल्या. मनुष्याच्या आत्म्याचे शत्रू जे दुर्गुण त्यांच्याशीं लढून त्यांनां नष्ट करणें ही कल्पना बूथच्या कार्यांत प्रमुख असल्यामुळें त्यानें आपल्या संस्थेला फौजेचें स्वरूप देऊन 'साल्व्हेशन आर्मी' (मुक्तिफौज) हें नांव ठेवलें. संस्थेचा जो मुख्य चालक त्याचें नांव प्रथम जनरल सुपरिंटेंडेंट असें होतें, तें नंतर नुसतें 'जनरल' आणि कार्यकारी कमिटीचें नांव 'कौन्सिल ऑफ वॉर' असें ठेवण्यांत आलें. या संस्थेची परदेशांतील पहिली शाखा युनायटेड स्टेट्समधील फिलाडेल्फिया येथें स. १८८० मध्यें स्थापन होऊन नंतर ऑस्ट्रेलिया (१८८०); फ्रान्स (१८८१); कानडा, स्वीडन, हिंदुस्थान व स्वित्झर्लंड (१८८२); दक्षिण आफ्रिका, सीलोन व न्यूझीलंड (१८८३); जर्मनी (१८८६); डेन्मार्क, इटली व हॉलंड (१८८७); नॉर्वे (१८८८); दक्षिण अमेरिका (पांच रिपब्लिक देश), फिनलंड, व बेल्जम (१८८९); वेस्ट इंडीज (१८९२); डच ईस्ट इंडीज (१८९४); आयस्लंड व जपान (१८९५); कोरिया (१९०८); ब्रह्मदेश (१९१४); चीन (१९१५); रशिया (१९१७) वगैरे देशांत शाखा स्थापन झाल्या. या संस्थेंतील कार्यकर्त्यांचें मुख्य सूत्र स्थानिक परिस्थित्यनुरूप स्वतःच्या बाह्य वर्तनांत बदल करणें हें आहे. या संस्थेचा हिंदुस्थानांतील शाखेचा पहिला अधिकारी इंडियन सिव्हिल सर्व्हिसमधला कमिशनर फ्रेडरिक बूथ-टकर नांवाचा इसम होता. एका प्रसिद्ध हिंदी गृहस्थानें साल्व्हेशन आर्मीच्या इसमाजवळ असे उद्गार काढले होतें कीं ''तुम्ही आपली विजार व बूट काढून देऊन काम करूं लागाल तर हिंदुस्थानांत संस्थेचा पुष्कळ प्रसार होईल'' हें ऐकतांच या संस्थेच्या लोकांनीं हिंदु लोकांप्रमाणें धोतर, रुमाल व जोडे वापरण्यास सुरुवात केली. लवकरच हिंदुस्थानांत अनेक पोटशाखा स्थापन होऊन अगदीं कनिष्ठ व अस्पृश्य जातींत शिक्षणप्रसार व समाजसुधारणेचें कार्य जोरानें चालू झालें. आद्य रानटी जाती आणि गुन्हेगार जाती यांची सुधारणा करणें हे हिंदुस्थानांतील, मुक्तिफौजेचें एक विशेष कार्य असून ब्रिटिश सरकारनें असले हजारों इसम या संस्थेच्या स्वाधीन केले आहेत, व त्यांच्या ३२ हून अधिक ठिकाणीं वसाहती या संस्थेनें स्थापिल्या असून त्यांत या लोकांनां उपयुक्त धंद्याचें शिक्षण देण्यांत येतें.
मुक्तिफौजेचा मुख्य अधिकारी जनरल किंवा कमांडर-इन-चीफ हा असून तो जगांतील सर्व शाखांचे कमिशनर व इतर अधिकारी नेमतो; व स्वतःनंतरचा जनरलहि तोच नेमतो. विल्यम बुथ हा १९१२ पर्यंत जनरल होता, नंतर त्यानें स्वतःचा वडील मुलगा ब्रॅमवेल बूथ यास जनरल नेमिलें. तथापि जनरलचा हा अधिकार वंशपरंपरा चालणारा नाहीं. या संस्थेचीं इंटर नॅशनल हेडक्वार्टर्स आणि टेरिटोरियल कमांड्स अशीं दोन पृथक् खातीं आहेत. इंटर नॅशनल हेडक्वार्टर्समधील अधिकारी या संस्थेच्या जगभर पसरलेल्या शाखांवर देखरेख ठेवतात; आणि टेरिटोरियल कपाँड्समधील अधिकारी निरनिराळया देशांत राहून संस्थेच्या शाखाचें प्रत्यक्ष काम करतात. या संस्थेच्या अखिल द्रव्यनिधीचा व मालमत्तेचा जनरल हा ट्रस्टी असून तो संस्थेचा सर्व जमाखर्च लेखी ठेवून दरसाल बॅलन्स-शीट प्रसिद्ध करतो. देणग्यांच्या रूपानें संस्थेचा द्रव्यनिधि जमविला असून प्रत्येक देशांतील शाखा स्वपोषणक्षम असली पाहिजे हें तत्त्व पाळण्यांत येतें. मुक्तिफौजेंत जीझस खाईस्टप्रमाणें अत्यंत साधी राहणी ठेवितात. दुय्यम दर्जाच्या अधिकार्यांत स्टाफ आफिसर्स आणि फील्ड ऑफिसर्स असे दोन प्रकार आहेत. हे धूम्रपान व मद्यपान करीत नाहींत. जनरलपासून इतर सर्व जागांवर स्त्रियाहि नेमण्याची मोकळीक आहे. या स्त्रियांच्या हक्काचा मिसेस बूथ हिनें प्रथमपासून पुरस्कार केला व १८९९ सालीं व मुत्तिच्फौजेंत काम करणार्या ५००० हून अधिक स्त्रिया होत्या. या संस्थेच्या सभासदांनां लग्नें करून राहण्याची परवानगी असते. तसेंच संस्थेतल्या लोकांनीं त्या देशांतल्या सरकारशीं राजनिष्ठ राहून मुख्यतः ख्रिस्ती धर्मप्रसाराचें व सामाजिक सुधारणेचें काम करावें असा नियम आहे. संस्थेच्या कार्यप्रसाराकरितां 'ऑफिशियल गॅझेट' व आणखी पुष्कळ वृत्तपत्रें (बहुतेक साप्ताहिकें) एकंदर निरनिराळया २० भाषांत प्रसिद्ध होतं असतात, आणि बहुतेक देशांत या वृत्तपत्रें नांव 'वॉर क्राय' (किंवा तदर्थक शब्द) हें असतें. विशेषतः गरीबांनां मदत करणें हें संस्थेचें ध्येय असून पुढील प्रकारें मदत करण्यांत येतेः- (१) अन्नवस्त्रहीनांकरितां सकाळचें व दुपारचें जेवण फुकट देणें; स्वस्त दरानें खाण्यापिण्याच्या पदार्थांचीं, धान्याचीं, जुन्या कपडयांचीं दुकानें काढणें, दुष्काळांत कर्जाऊ रकमा देणें, (२) दारूबाज स्त्रीपुरुषाकरितां मद्यपानाविरुद्ध उपदेश करणें, (३) बेकार लोकांकरितां काम मिळवून देणें, औद्योगिक भुवनें (बर्फ-हाऊस) काढणें वगैरे, (४) गुन्हेगारांच्या मदतीकरितां तुरुंगांनां भेट देणें, पोलिस-कोर्टांत मदत करणें, माजी गुन्हेगारांच्या वसाहती स्थापून त्यांनां उद्योगधंद्यांस लावणें, (५) कुमार्गगामी स्त्रियांकरितां वेश्यागृहांनां भेट देणें, सूतिकागृहें स्थापणें, स्त्रियांकरितां औद्योगिक भुवनें काढणें, वेश्यावृत्ति सोडून देणार्यांनां राहण्याची सोय करणें, (६) गरीब लोकांकरितां मोफत दवाखाने व रुग्णालयें स्थापणें, महारोग्यांकरितां वसतिगृहें, (लेपर असायलम्) काढणें; (७) आत्महत्त्या करूं पाहाणार्यांस उपदेश करणें, कर्जाऊ रक्कम देणें; (८) ट्रेनिंगकॉलेजें, विद्यार्थीवसतिगृहें, मजुरांचे संघ, खेडेगांवी बँका वगैरे स्थापणें.
हिंदुस्थानांत हल्लीं (१९२४) मुक्तिफौजेचा उत्तर हिंदुस्थान (पंजाब व संयुक्तप्रांत) हा एक विभाग असून लाहोर हें मुख्य ठाणें आहे, व या विभागांत गुन्हेगार जातींकरितां कित्येक वसाहती, १८००० शेतकर्यांची एक वसाहत, विणकामाच्या शाळा, डेअरी व फळझाडें असलेलीं कृषिगृहें, बोर्डिंगसह दिवसाच्या शाळा, दवाखाने व रुग्णालयें वगैरे असून विभागाचा मुख्य अधिकारी ले. कमिशनर जयकुमार (टॉफ्ट) हा आहे. याशिवाय पश्चिम हिंदुस्थान (मुंबई, गुजराथ व महाराष्ट्र), मद्रास व तेलगू प्रदेश आणि दक्षिण हिंदुस्थान हे आणखी तीन विभाग असून त्यांत वरील प्रकारच्याच संस्था आहेत.