विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मीरजाफर- बंगालचा एक नबाब. याचें खरें नांव जाफरअल्लीखान. याची माहिती 'क्लाइव्ह' (ज्ञानकोश विभाग ११) या लेखांत दिलेली आहे. मीरजाफर हा सिराजचा सेनापति होता. सिराजाशीं फितूर होऊन प्लासीच्या लढाईंत इंग्रजांनां हा मिळाला आणि त्याबद्दल त्याला इंग्रजांनीं मुर्शिदाबादेस सिराजच्या गादीवर बसविलें. त्याच्या जवळून क्लाईव्हनें सव्वा दोन कोटी रुपये उकळले. पुढें त्याला इंग्रजांचें खरें स्वरूप कळल्यावर त्यानें त्यांच्याविरुद्ध खटपट चालविली, तेव्हां कंपनीनें त्याच्यावर अव्यवस्थित राज्यकारभाराचा आरोप आणून त्याला पदच्युत केलें (१७६०). या कामीं त्याचा जांवई मीरकासीम हा इंग्रजांनां फितूर होता. इंग्रजांनीं कासीम याला नबाब बनवून त्याच्या मागें नजराण्याचा तगादा लावला, तेव्हां त्यांनेंहि इंग्रजांविरुद्ध खटपट चालविली. त्यामुळें त्यांनीं त्याच्यावर स्वारी करून त्याचा स. १७६३ त पराभव केला आणि पुन्हां म्हातार्या मीरजाफरास नबाब बनविलें. यानंतर जाफर हा दोन वर्षांनीं मेला. त्याची कबर मुर्शिदाबादेस आहे.