विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मीमांसा- हें प्रसिद्ध सहा दर्शनापैकीं एक दर्शन आहे. मीमांसा हा शब्द मान् या धातूपासून आला आहे. मीमांसा याचा अर्थ जिज्ञासा असा आहे असें 'मानेर्जिज्ञासायां' या वार्तिकावरून दिसून येतें. तथापि मीमांसा हा शब्द फार प्राचीन काळापासून तों उपनिषद् काळपर्यंत 'संस्कार, अनुष्ठान किंवा वेदान्त यांतील कठिण प्रश्नांचा उहापोह' या अर्थी वापरण्यांत आला आहे असें आढळतें. तैत्तिरीय ब्राह्मणांत 'उत्सृज्यां३ नोत्सृज्यां३ इति मीमांसते ब्रह्मवादिनः तदाहुरुत्सृज्यमेवेति' या वचनांत मीमांसा शब्दाचा अर्थ विचार करून ठाम निर्णय करणें असा अर्थ आहे. तांडयमहाब्राह्मणांत, कौषीतकी ब्राह्मणांत आणि छांदोग्य अथवा तैत्तिरीय उपनिषदांत याच अर्थी मीमांसा शब्दाचा उपयोग केला गेलेला दिसतो. पुढें निरुक्त, धर्मसूत्रें, पातंजल महाभाष्य इत्यादिकांतहि मीमांसेचा उल्लेख आढळतो. यावरून मीमांसाशास्त्राला ख्रिस्ती शकापूर्वी बर्याच शतकांपासून मान्यता मिळाली होती, व त्या शास्त्राला पूर्णत्व आलें होतें असें प्रत्ययाला येतें. मीमांसा या शब्दाचा वाच्यार्थ जरी चर्चा अथवा जिज्ञासा असा आहे तथापि मोक्ष, निर्वाण इत्यादि शब्दांप्रमाणें याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे. पूज्य अगर वेदवाक्यांचे निरनिराळे अर्थ लावणें शक्य असल्यामुळें त्यापैकीं खरा कोणता व खोटा कोणता हें ठरविण्याचें काम मीमांसेचें आहे. कारण 'अनेकार्थमन्याय्यम्' असेंच मीमांसेचें आहे. कारण 'अनेकार्थमन्याय्यम्' असेंच मीमांसेचें तत्त्व आहे. 'केचिदाहुरसावर्थः केचिन्नासावयंत्विति। तन्निर्णयार्थमप्येतत्परं शास्त्रं प्रणीयते' व 'धर्माख्यं विषयं वक्तुं मीमांसाया: प्रयोजनम्' या कुमारिलाच्या वार्तिकांवरून मीमांसेचे प्रयोजन काय हें दिसून येईल. तात्पर्य लौकिक व वैदिक वाङ्मयांत धर्म म्हणून जो रूढ शब्द आहे त्याचा विचार करण्याकरितां मीमांसाशास्त्राचा अवतार आहे. मीमांसा व वेदान्त हीं शास्त्रें अगरीं परस्परसंबंद्ध आहेत, व त्यामुळें काम्यकर्मविवेचक शास्त्राला पूर्वमीमांसा व वेदान्ताला उत्तर मीमांसा असें नांव पडलें आहे. तथापि प्राचीन काळापासूनच पूर्वमीमांसेऐवजीं मीमांसा या शब्दाचाच उपयोग केला जात होता. या मीमांसाशास्त्रावर सर्वांत जुना व प्रमाणभूत ग्रंथ म्हणजे जैमिनीचीं मीमांसासूत्रें होत. जैमिनीचा काळ अगदीं अलीकडे ओढला तरी तो ख्रिस्ती शकाच्या पहिल्या शतकाअलीकडे आणतां येणार नाहीं असें प्रो. पां. वा. काणें यांनी 'पूर्व-मीमांसापद्धतीचा इतिहास' यांत म्हटलें आहे. या मीमांसासूत्रामध्यें काय सांगितलें आहे त्याचा सारांश पूर्वी ज्ञानकोश (विभाग ५)त दिलेला आहे. जैमिनीच्या सूत्रांवर एका पंडितानें वृत्ति लिहिली असून ती जवळजवळ प्रमाण म्हणून मानिली जाते. या पंडिताचें नांव 'उपवर्ष' असावें असें पुष्कळांचें म्हणणें आहे. पण शबरभाष्यांत एकाच वेळीं वृत्तिकार व उपवर्ष या दोघांचीं प्रमाणें शबरानें दिलीं आहेत, त्यावरून उपवर्ष व वृत्तिकार एकच नसावे असें वाटतें. याशिवाय इतर बर्याच टीकाकारांनींहि जैमिनीसूत्रांवर टीका लिहिल्या होत्या असें शबरभाष्यावरून दिसून येतें. शबर हा जैमिनीसूत्रांवरचा प्रख्यात टीकाकार होय.शबराच्या व प्रभाकर व कुमारिल यांच्या दरम्यानच्या काळांत जैमिनी-सूत्रांवर व त्यांवरील शबरभाष्यावरहि बरेच टीकाग्रंथ लिहिले गेले असावेत असें कुमारिलाच्या ग्रंथावरून दिसतें. तथापि शबरानंतर मीमांसाशास्त्रावर लिहिणारे प्रख्यात ग्रंथकार प्रभाकर व कुमारिल हेच होत. कुमारिल हा मीमांसाशास्त्रांतील सुधारक वीर होय असें म्हणावयास हरकत नाहीं. यानें शबरावर व त्याच्यानंतर झालेल्या टीकाकारांवर टीका करण्यास कमी केलें नाहीं. तसेंच मीमांसासूत्रांवर लिहिणारा त्याचा समकालीन अथवा थोडया पूर्वी झालेला जो प्रभाकर त्याच्यावरहि त्यानें कडक टीका केलेली आढळते. यामुळें मीमांसकांमध्यें दोन महत्त्वाचे पक्ष उत्पन्न होऊन एकाचा प्रभाकर अगर गुरुमत व दुसर्याला कुमारिल अगर भट्टमत असें नांव पडलें. प्रभाकरानें शबराच्या भाष्यावर बृहती व लघ्वी अशा २ टीका लिहिल्या आहेत. कुमारिलानें मीमांसाशास्त्रावर श्लोकवार्तिक, तंत्रवार्तिक, व टुप्टिका असे तीन ग्रंथ लिहिले आहेत. कुमारिलाच्या तेजस्वी व सडेतोड भाषेमुळें प्रभाकराचें मत मागें पडून कुमारिलाचें मत प्रसृत पावलें, तथापि या दोन्हीहि मतांचे बरेच अनुयायी होते व या दोन्हीहि मतांचे अनेक ग्रंथकार होऊन गेले. प्रभाकराच्या संप्रदायामध्यें प्रभाकराचा शिष्य शालील नाथमिश्र यानें प्रभाकराच्या 'बृहती'वर ॠजुविमला व 'लघ्वी'वर दीपशिखा नांवाच्या टीका लिहिल्या आहेत. याशिवाय त्यानें प्रकरणपंचिका नांवाचा एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला असून त्यांत मीमांसाशास्त्राचा हेतु, प्रमाणें, ज्ञान व त्याची योग्यता तसेंच आत्म्यासंबंधी विचार इत्यादिकांचें विस्तृत विवेचन केलें आहे. भवनाथानें आपल्या 'न्यायविवेक' नांवाच्या ग्रंथामध्यें शालीकनाथाच्या तिन्ही ग्रंथांचा सारांश दिला आहे. या संप्रदायाचा सर्वांत अर्वाचीन ग्रंथ म्हणजे रामानुजाचार्यानीं लिहिलेला 'तंत्ररहस्य' ग्रंथ होय. प्रभाकराच्या संप्रदायापेक्षां कुमारिलाच्या संप्रदायांत मीमांसेवर लिहिणारे पुष्कळच प्रसिद्ध ग्रंथकार होऊन गेले. कुमारिलाच्या श्लोकवार्तिकावर पार्थसारथिमिश्रानें न्यायरत्नाकर व सुचरितमिश्रानें काशिका नांवाची टीका लिहिली. याशिवाय जैमिनीच्या सूत्रांवर शास्त्रदीपिका नांवाची टीका व शिवाय तंत्ररत्न व न्यायरत्नमाला असे ग्रंथ लिहिले आहेत. भट्टोंबेक नांवाच्या कुमारिलशिष्यानें श्लोकवार्तिकावर टीका लिहिली. सोमेश्वराची तंत्रवार्तिकावर न्यायसुधा नांवाचीहि एक टीका आहे. कुमारिलचा शिष्य मंडणमिश्र यानें मीमांसानुक्रमणी नांवाचा एक ग्रंथ लिहिला असून त्यांत शबरभाष्याचें सार सांगितलें आहे. तसेंच त्याचा विधिविवेक नांवाचा एक स्वतंत्र ग्रंथहि प्रसिद्ध आहे. वाचस्पतिमिश्रानें विधिविवेकावर न्यायकणिका नांवाची टीका असे दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. अप्पया दीक्षितांचा विधिरसायन नांवाचा एक ग्रंथ आहे. नारायणभट्टाचे मीमांसासारसंग्रह, मीमांसाबालप्रकाश असे दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. खंडदेवानें सतराव्या शतकांत भट्टदीपिका व मीमांसाकौस्तुभ नांवाचे दोन ग्रंथ लिहिले. शिवाजीला राज्याभिषेक करणारे गागाभट्ट यांनीं भट्टचिंतामणि नांवाचा ग्रंथ लिहिला. तसेंच लौगाक्षि भास्कराचा अर्थसंग्रह व आपदेवाचा मीमांसान्यायप्रकाश हेहि मीमांसेवरील महत्त्वाचे ग्रंथ आहेत.
मीमांसाशास्त्र वेदांनां अषौंरुषेय व अनादि मानतें व त्यामुळें कोणत्याहि वादांत वेदाला प्रमाण धरतें. तसेंच जग हें स्वयंभू आहे, त्याला कोणीच उत्पन्न केलें नाहीं असें मीमांसेचें म्हणणें आहे व यावरून हें शास्त्र निरीश्वरवादी असें म्हणण्यांत येतें. तथापि कुमारिलभट्टानें या आक्षेपाचें निरसण करण्याचा प्रयत्न केला आहे. आत्म्यासंबंधीं जैमिनीच्या सूत्रांमध्यें एकहि सूत्र आढळत नाहीं, तथापि तो आत्म्याचें अस्तित्व नाकबूल करतो असें मात्र म्हणतां यावयाचें नाहीं. शबरानें आपल्या भाष्यांत आत्म्याचें विस्तारानें विवरण केलें आहे. तसेंच प्रभाकरानें व कुमारिलानें प्रत्येक शरीरांत निराळा आत्मा असून तो नित्य व सर्वव्यापी आहे असें म्हटलें आहे. तसेंच कुमारिल व प्रभाकर यांच्यामध्यें मोक्षाचेंहि विवेचन आहे. तसेंच कुमारिल व प्रभाकर यांच्यामध्यें मोक्षाचेंहि विवेचन आहे. मनुष्याच्या शरीरांतील धर्माधर्म प्रकार नाहींसे झाल्यानंतर शरीराच्या अस्तित्वाचा कांहीं उपयोग नाहीं व अशी स्थिति प्राप्त होणें म्हणजेच मोक्ष असें प्रभाकराचें मत आहे. मीमांसाशास्त्र ज्ञानाचें स्वतः प्रामाण्य मान्य करतें. मीमांसेनें सत्यनिर्णयासाठीं जी विशिष्ट पद्धत आंखली ती फारच सुंदर आहे व ती सर्वांनीं मान्य केली आहे. ही पद्धत 'विषय, संशय, पूर्वपक्ष, उत्तर पक्ष व सिद्धांत अशी पंचांगी आहे. वाक्यामध्यें क्रियापद हें प्रमुख होय असें मीमांसेचें मत आहे.
इतर सर्व दर्शनांपेक्षां मीमांसादर्शन याचा अभ्यास पाठीमागें पडला आहे; याचें कारण कळत नाहीं. मीमांसाशास्त्र हें पाखंडवादी आहे अशा गैरसमजुतीमुळें याचा अभ्यास मागें पडला असावा अगर उत्तर मीमांसाकारांनीं याचें खंडन केलें म्हणून याचा उपयोग नाहीं या समजुतीनें हें शास्त्र दुर्लक्षिलें गेलें असावें. तथापि मीमांसाशास्त्र अनेक दृष्टींनीं उपयोगी आहे यांत वाद नाहीं. प्रथमतः सत्यासत्यान्वेषणाच्या बाबतींत मीमांसकांनीं जी पद्धत घालून दिली आहे ती शास्त्रशुद्ध व निर्दोष आहे व या पद्धतीचा पुढील सर्व शास्त्रकारांनीं उपयोग केला आहे. अलीकडे कायद्याच्या शब्दांचा अर्थ लावण्यांत जी पद्धत अनुसरली जाते तींत व या पद्धतींत विलक्षण साम्य आढळतें. ब्रूमच्या 'कायद्यांतील म्हणी' सारख्या फारच मार्मिक पण सुटसुटीत म्हणी यामध्यें आढळतात. उदाहरणार्थ, 'गुणांनांच पदार्थत्वात्' अगर 'उभयाकांक्षा'. एखाद्या वाक्याचा अर्थ बरोबर रीतीनें समजण्यासाठीं जे 'उपक्रमोपसंहारावभ्यासोऽपूर्वताफलम्। अर्थवादोपपत्ती च लिंगतात्पर्यनिर्णये वगैरे नियम सांगितले आहेत त्यांहून अधिक चांगले नियम कोणत्याहि कायदेशास्त्राच्या पुस्तकांत सांपडावयाचे नाहींत. मीमांसाशास्त्र हें कायद्याचें पुस्तक नाहीं, तथापि त्यामध्यें कांहीं कांहीं ठिकाणीं कायद्याचीं तत्त्वें ग्रथित केलेलीं आढळतात. उदाहरणार्थ राजा हा आपल्या राज्याचा स्वैर मालक नाहीं हें महत्त्वाचें तत्त्व 'न भूमिःस्यात् सर्वान् प्रत्यवशिष्टत्त्वात्' या वचनांत आढळतें. धर्मशास्त्रावरील टीकाकारांनीं जागोजाग या मीमांसाशास्त्रांतील तत्त्वांचा उपयोग केलेला आढळतो. सारांश हल्लीं प्रचलित हिंदु कायद्यांतील घोंटाळे कमी करण्याच्या कामीं मीमांसाशास्त्राचा बराच उपयोग होण्यासारखा आहे असें रा. खापर्डे, काणे इत्यादि विद्वानांनीं म्हटलें आहे तें खरें आहे. स्त्रियासंबंधीं अगर शूद्रादि कनिष्ट जातींसंबंधीं मीमांसेच्या स्थापकाची संकुचित बुद्धि आढळून येत नाहीं हेंहि लक्षांत ठेवण्याजोगें आहे. तात्पर्यं, मीमांसाशास्त्र हें अनेक दृष्टींनीं उपयुक्त असें शास्त्र आहे व या शास्त्राचा अभ्यास जो मागें पडला आहे त्याला चालना मिळणें जरूरीचें आहे. सुदैवानें अलीकडे विद्वानांचें या शास्त्राकडे लक्ष्य गेलें असून पुणें येथील शिक्षण प्रसारक मंडळीनें नुकतेंच मीमांसाशिक्षणासाठीं वे. शा. सं. किंजवडेकर शास्त्री यांच्या नेतृत्वाखालीं मीमांसाविद्यालय स्थापिलें आहे. जसजसा मीमांसेचा अधिक अभ्यास होत जाईल तसतसा तिचा उपयोग लोकांनां अधिक कळत जाईल असें मानण्यास बरीच जागा आहे.
(जैमिनी- मीमांसासूत्रें; कुमारिल- श्लोकवार्तिक; शालीकनाथ- प्रकारणपंचिका; सर्वसिद्धांतसंग्रह; सरकार- टागोर लॉ लेक्चर्स; गंगानाथ झा- दि प्रभाकर स्कूल ऑफ पूर्वमीमांसा; कीथ- दि कर्ममीमांसा; प्रो. काणे-पूर्व मीमांसापद्धतीचा इतिहास.)