विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मीडिया- हें इराणच्या वायव्य भागाचें प्राचीन नांव आहे. यांत सध्यांचें अझरबैजन, आर्देलन, इराक अजेमी, व कुर्दिस्तानचा कांहीं भाग येतो. मीडियाचा बराच भाग म्हणजे ३००० ते ५००० फूट उंचीचें एक पठार असून त्यांत कांहीं सुपीक मैदानें आहेत. हवा समशीतोष्ण आहे. सेफिद रुद (आमरर्दस) ही एकच नदी असून ती कास्पियन समुद्रास मिळते. वायव्य भागांत उरुमिया नांवाचें एक मोठें सरोवर आहे. मीडियाच्या प्राचीन साम्राज्येतिहासाची त्रोटक माहिती व पुढील इतिहास 'इराणचें सत्तावर्धन' या बुद्धोतर जग विभागांतील प्रकरणांत आला आहे. शिवाय 'मग' पहा.