विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मीठ- अगदीं प्रथमावस्थेंतील मनुष्यास मीठ तयार करण्याची कृति ठाऊक नसल्यामुळें त्याच्या उपयोगाची जाणीव असणें शक्य नव्हतें. कच्चे किंवा भाजलेलें मांस खाणार्या लोकांनांहि त्यांतील क्षार नाहीसे होत नसल्यामुळें मिठाचा उपयोग करण्याची जरूरी भासली नाहीं. पण शाकाहारी व शिजविलेलें मांस खाणार्या लोकांनां मात्र मिठाइतकी आवश्यक गोष्ट कोणतीच नाहीं असें वाटूं लागलें आणि म्हणूनच प्रथमतः मीठ प्रसवणार्या वस्तूंस लोक ईश्वरी देणगी समजूं लागले. होमरसारखा प्राचीन ग्रंथकार मिठास 'दैविक' म्हणतो व प्लेटो त्यास 'ईश्वराचा आवडता पदार्थ' समजतो. हळू हळू मिठाच्या अंगीं असणारा नासके पदार्थ सुरक्षित ठेवण्याचाहि गुण लोकांच्या दृष्टोत्त्पत्तीस येऊं लागला व त्यामुळें त्याची जरूरी जास्तच भांसू लागली. या पदार्थाची आवश्यकता सार्वत्रिक असल्यामुळें ज्या देशांत हें तयार होत होतें त्या देशांतून याचा व्यापार बर्याच मोठया प्रमाणावर चालत असे. उत्तर हिंदुस्थानांतील मिठाच्या खाणींतून अलेक्झांडरच्या पूर्वीपासून मीठ काढीत असून तेथून तें बर्याच ठिकाणीं रवाना होत असे व फोनिशियन व्यापारीहि मीठ व मिठानें खारलेले मासे यांचा व्यापर मोठया प्रमाणावर करीत असत.
जगांतील बरेचसें मीठ समुद्राच्या पाण्यापासून करतात. हें पाणी एका साफसूफ केलेल्या जमिनीच्या भागावर घेतात व सूर्याच्या उष्णतेमुळें त्याची वाफ होऊन गेली म्हणजे खालीं मीठ रहातें. पाण्याची जसजशी वाफ होत जाते तसतसें खालीं रहाणार्या पाण्याचें विशिष्टगुरुत्व वाढत जातें. मीठ विशिष्ट गुरुत्व १.२१८ असतांना .१५ इतका साका खालीं जमतो. त्यांत चुना व लोहसार बरेच असतात, पण तेच वि. गु. १.२१८ ते १.३१३ इतकें असतांनां त्यामध्यें निरनिराळया क्षारांचें पुढीलप्रमाणे असतें. खटगंधकित शें. .०२८३, मग्नगंधकित शें. .०६२४, सिंधुहरिद शें. २.७१०७, व सिंधुस्तंभिद शें. .०२२२ म्हणजे एकंदर क्षारांपैकीं शें. ९५ मीठ असतें. याच विशिष्टगुरुत्वाच्या सुमारास उष्णमानाचाहि त्यावर परिणाम होऊन कांहीं द्वय-क्षारहि (डबलसाल्ट्स) तयार होऊन मिठाबरोबरच खालीं जमतात.
मीठ उत्पन्न करण्याचा दुसरा मोठा मार्ग म्हणजे मिठाच्या खाणी होय. हिंदुस्थानांत अशा खाणी कोहट येथें असून इंग्लंडमध्यें त्या चेशायर वगैरे ठिकाणीं आहेत व जर्मनीमध्यें स्टॅस्फूर्ट येथें मिठाच्या गाळवटाचे थरच्या थर आहेत. इंग्लंडमधील खाणींतून मिठाच्या थरावर मिठवण्याचा थर असतो तो पंपाच्या साहाय्यानें काढून त्यापासून मीठ बाहेर काढतात. ज्या ठिकाणी ह्या खाणीं खोल आहेत त्या खाणींतून एक भोंक पाडून त्यांत एक नळी बसवितात. ह्या नळीस ज्या ठिकाणीं मिठाचे थर असतात तेथें भोकें पाडलेलीं असतात, व तीमध्यें दुसरी एक लहान व्यासाची नळी सोडलेली असून त्या दोन्ही नळयांच्यामधील भागांतून पाणी सोडतात. या पाण्याच्या योगानें मीठ विद्रुत होऊन मिठवणी तयार होतें व तें लहान नलिकेमधून पाणी व मिठवणी यांच्या वि. गु. च्या व्युत्त्क्रम प्रमाणांत साधारणतः १०:१२ या प्रमाणांत वर चढतें. नंतर त्या लहान नलिकेमधून पंपाच्या साहाय्यानें मिठवणी वर काढून त्यांतील पाण्याची वाफ करून मीठ करतात.
हिंदुस्थानांत मुख्यतः मीठ चार प्रकारें पैदा होतें. पंजाबांतील क्षार पर्वत आणि कोहटखाणी यांत सांपडणारें खनिज मीठ; राजपुतान्यांत सांबर सरोवरापासून होणारें मीठ; कच्छच्या रणांत सांपडणारें मीठ; आणि मुंबई, मद्रास आणि सिंधु नदीच्या मुखाजवळ समुद्राच्या पाण्यापासून होणारें मीठ. क्षारपर्वतांतील खाणींत सांपडणार्या मिठाचा सांठा अपरिमित आहे. या खाणींपैकीं कांही २५० फूट लांब, ४५ फूट रुंद, आणि २०० फूट खोल आहेत. राजपुतान्यांत सांबर सरोवराचें पाणी सूर्याच्या उष्णतेनें वाफ होऊन गेल्यावर खालीं मीठ सांपडतें. कच्छच्या रणांतहि याच रीतीनें मीठ पैदा होतें. स. १९२३ त ध्रांगध्रा संस्थानांत समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करण्याला नवीन सुरवात झाली. मुंबई आणि मद्रास शहरानजीक उथळ शेतांत समुद्राचें पाणी घेतात आणि मद्रास शहरनजीक उथळ शेतांत समुद्राचें पाणी घेतात व तें सूर्याच्या उष्णतेनें वाफ होऊन गेल्यावर मीठ तयार होतें. या पद्धतीनें तयार केलेलें मीठ बहुतेक हिंदुस्थानांत खपतें. बंगालच्या किनार्याजवळ उपसागराचें पाणी गोडें आणि हवा सर्द असल्यामुळें तेथें मीठ तयार होऊं शकत नाहीं, आणि बंगाल व ब्रह्मदेश या प्रांतांनां मिठाचा पुरवठा मुंबई, मद्रास, एडन, जर्मनी व लिव्हरपूल या ठिकाणांहून होतो. हिंदुस्थानांत होणार्या मिठाच्या एकंदर निपजेपैकीं सुमारें निम्में मीठ सरकारमार्फत तयार केलें जातें, आणि बाकीचें लायसेन्स पद्धतीनें तयार होतें. पंजाब आणि राजपुताना येथील मिठाचे कारखाने नॉर्थ इंडिया साल्ट डिपार्टमेंटच्या नियंत्रणाखालीं आहेत. हें डिपार्टमेंट व्यापार व औद्योगिक खात्याची एक शाखा आहे. मद्रास आणि मुंबई इलाख्यांतील कारखाने प्रांतिक सरकारांच्या देखरेखीखालीं आहेत. देशी संस्थानाबरोबर केलेल्या विशेष तहान्वयें मिठाची आयात-निर्गत हिंदुस्थानांत सर्वत्र होऊं शकते. गोवा आणि दमण या पोर्तुगीज मुलुखांच्या सरहद्दीवर मात्र चोरून मीठ ब्रिटिश मुलुखांत येऊं नये म्हणून पहारा ठेविलेला असतो.
मिठावर कर पूर्वीचे येथील राजेहि घेत असत व तीच पद्धत ब्रिटिश सरकारनेंहि चालू ठेविली आहे. १८८८ ते १९०३ पर्यंत मिठावर कर दर मणीं (८२ पौंड) २॥ रुपये होता. १९०३ सालीं तो २ रुपये करण्यांत आला, १९०५ सालीं १॥ रुपया व १९०७ सालीं १ रुपया याप्रमाणें कमी करण्यांत आला. १९१६ सालीं पुन्हां तो १। रु. करंण्यांत आला. कर कमी झाला त्यावेळी खप सारखा वाढत गेला. १९०३ ते १९०८ पर्यंत एकंदर खप २५ टक्के वाढला. १९२३ सालीं हा कर २॥ रु. करण्यांत आला. १९२४-२५ सालीं या कराचें अंदाजी उत्पन्न ९०४६२००० रुपये धरलें होतं. १९२५ सालीं हा कर कमी होऊन आतां १। रु. झाला.
खताचें मी ठ.- कोंकणप्रांतांत नारळ, कलमी आंबे, भात या पिकांनां मिठापासून उपयोग होतो असें अनुभवास आले आहे. स्वस्त दरानें खताकरितां मिळावयाच्या मिठाचा उपयोग माणसांच्या किंवा जनावरांच्या खाण्याच्या उपयोगांत आणूं नये म्हणून प्राणिमात्रांस दोषी परंतु वनस्पतीस उपयुक्त असे जिन्नस यांत मिसळलेले असतात. बर्याच शेतकर्यांकडून, मीठ आक्टोबर अगर नोव्हेंबरमध्यें नारळ अगर कलमी आंब्यांच्या झाडांस देणें फायदेशीर होतें असें सांगण्यांत आल्यावरून खताचें मीठ नोव्हेंबर महिन्यांत रत्नागिरी व कानडा जिल्ह्यांत देण्याचें मुंबई सरकारनें सन १९२१ मध्यें ठरविलें. मिठाचा दर, दर बंगाली मणास आ. १३ प्रमाणें सन १९२५-२५ अखेरपर्यंत मुक्रर केला आहे.
मुख्य देशांतून १९०५ सालीं मिठाची निपज खालीलप्रमाणें झालीः- (पुढील आंकडे टनांचे आहेत) ऑस्ट्रिया ३४३,३६५, फ्रान्स ११३०००७, जर्मनी १७७७५५७, हंगेरी, १९५४१०, हिंदुस्थान १२१२६००, इटाली ४३७६९९, जपान ४८३५०६, रशिया १८४४६७८, स्पेन ४९३४५१, युनायटेड किंगडम् १९२०१४९, युनायटेड स्टेट्स ३२९७२८५.