विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मिशमी लोक- मिशमी टेंकडया आसामप्रांतांच्या उत्तर सरहद्दीवर आहेत. यांत मिशमी नांवाचे लोक रहातात. या टेंकडयांचा नीट शोध अजून लागला नाहीं. येथील मिशमी लोकांत पोटजाती आहेत. हे लोक तिबेटो-ब्रह्मी रक्ताचे असून अंगापिंडानें ठेंगणे व मजबूत आहेत; यांचे चेहरे मंगोलियन लोकांच्या चेहर्यासारखे आहेत. यांच्यांत पुष्कळ बायका व गुरेंढोरें असणें हें श्रीमंतीचें लक्षण समजलें जातें. या लोकांचें तिबेटच्या लोकांशीं दळणवळण आहे. हे लोक त्यांच्याजवळून गुरें, लोंकरी कापड, तरवारी, धातूचीं भांडी वगैरे सामान घेतात व कस्तुरी, मिशमी जहर व मिशमी टीटा त्यांनां परत देतात. (डाल्टन- एथ्रॉलॉजी ऑफ बेंगाल.)