विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मिशन- कोणत्याहि धर्माचा अगर धर्मसंप्रदायाचा प्रसार करणार्या संस्थेला 'मिशन' अशी संज्ञा आहे. धर्मप्रसार करणार्या मनुष्याला धर्मप्रसारक उर्फ धर्मोपदेशक असें नांव आहे. परंतु मिशन व मिशनरी हे दोन्ही शब्द हल्लीं 'कोणत्याहि मताचा प्रसार करणारी संस्था व प्रसार करणारा मनुष्य' या व्यापक अर्थानें वापरण्यांत येतात. 'मिशन' संस्थांचा जन्म मुख्यतः ख्रिस्तीधर्मामधून झाल तथापि हें धर्मप्रसाराचें तत्त्व फार प्राचीन काळापासूनच अस्तित्वांत आलें होतें असें प्राचीन इतिहासावरून आढळून येतें. ख्रिस्तीधर्माचा जनक या जगांत अवतरण्यापूर्वी हिंदुस्थानांतील बौद्धांनीं हें तत्त्व अमलांत आणलें होतें, हें त्या धर्माचा इतिहास वाचरणार्यास कळून येईल.
बौ द्ध मि श न.- अशोकानें व तत्पूर्वी बुद्धानेंहि आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठीं संस्था काढल्या होत्या. अशोकानें तर केवळ अखिल हिंदुस्थानभरच नव्हे तर चीन, तिबेट इत्यादि बाहेरच्या देशांतहि धर्मोपदेशक पाठविले होते. ख्रिस्ती शकाच्या ६७ व्या वर्षी बौद्धधर्मानें चीनच्या दरबारांत प्रवेश केला होता व त्यानंतर ४-५ वर्षांनींच लोकांमध्यें बौद्ध धर्मोपदेशकांनीं आपली चळवळ सुरू केली होती. मध्यआशिया व पार्थिया या ठिकाणीं बौद्धभिंक्षूंनीं आपल्या धर्माचा प्रसार करण्यास सुरवात केली होती. शिहकाओ नांवाचा प्रसिध्द पार्थियन धर्मोपदेशक चीनच्या आसपासच्या भागांत लेखनद्वारां बौद्धधर्माचा प्रसार करीत होता. त्यानंतरहि चीनमध्यें बौद्धांच्या बर्याच धर्मप्रसारक संस्था होत्या व या संस्थांमार्फत बौद्धधर्मग्रंथांचीं चिनी भाषेंत भाषांतरें झालीं होतीं. विशेषतः चवथ्या व पांचव्या शतकांत तर बौद्धधर्माच्या प्रसारकांनीं धर्मप्रसाराचें काम, ताओ संप्रदायाच्या विरोधाला न जुमानतां जोरांत चालविलें होतें. अनाथांनां मदत करून रोगग्रस्तांनां दवापाणी देऊन, व अनेक प्रकारांनीं त्यांनीं हें काम मोठया आस्थेनें चालविलें होतें. उत्तर चीनमध्यें फोतुचेंग, कुमारजीव इत्यादि नांव घेण्यासारखे प्रसारक होऊन गेले तर दक्षिण चीनमध्यें बुद्धभद्र, गुणवर्म, तिस्स, धर्मकाल इत्यादि महान् धर्मप्रसारकांनीं बौद्धधर्माचा झेंडा उभारला.खुद्द चीनच्या बर्याच बादशहांनी या धर्माचा अंगीकार केला. जी गोष्ट चीनच्या बाबतींत तीच तिबेट, कोरिया, जपान इत्यादि देशांत घडून आली. अवघ्या दीड शतकांत कोरिया राष्ट्रानें बौद्धधर्माचा अंगीकार केला व जपानमध्येंहि कांहीं काळ बौद्धधर्म हा राजधर्म म्हणून गाजला. तिबेटमध्येंहि राज्यकर्त्यांच्या आश्रयानें बौद्ध भिक्षूंनीं आपल्या धर्माचा पुष्कळ प्रसार केला.
इ स्ला मी मि श न.- इस्लामी धर्माचा जनक महंमद पैगंबर हा स्वतः मोठा धर्मप्रसारक होता व धर्मोपदेशक कसे असावेत यासंबंधीं त्यानें नियमहि करून ठेवले होते.तथापि अलीकडे ज्याप्रमाणें इस्लामीधर्मप्रसारक संस्था स्थापन झालेल्या दिसतात तशा त्या प्राचीन व मध्ययुगीन काळात दिसून येत नाहींत. पण धर्मोपदेशकांच्या संस्था जरी इस्लामी धर्मांत प्राचीन काळीं आढळत नाहींत तथापि सत्तेच्या व तरवारीच्या जोरावर त्यांनीं आपल्या धर्माचा बराच प्रसार केला होता. १० व्या शतकामध्यें त्यांनीं तुर्कांनां व अफगाण लोकांनां इस्लामाची दीक्षा दिली. १३ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून इस्लामी धर्मोपदेशक संस्थांनीं व विशेषतः 'नक्षबंदी' संस्थेनें मोंगल जातीमध्यें इस्लाम धर्माचा प्रसार करण्यास सुरवात केली व हळू हळू त्यांनीं मोंगल जातींनां इस्लाममध्यें आणिलें, मोंगलांनीं इस्लामी धर्माचा स्वीकार करतांच त्यांच्या सत्तेखालीं असलेल्या जावा, सुमात्रा, चीन, मलाया द्वीपकल्प इत्यादि प्रदेशांतहि इस्लामी धर्मोपदेशकांचा संचार व बाटविण्याची क्रिया सुरू झाली. ११ व्या शतकापासून, आफ्रिकेमधील बर्बरादि जातींमध्येंहि इस्लामी धर्मानें आपले हातपाय पसरले. हिंदुस्थानामध्यें शेकइस्मायल (१००५),सय्यद नादीरशहा (१०३९), अल्दअल्ला, नूर सतागर, मुइनअल्दीन चिस्ति, जलालदिन ताब्रीझी वगैरे धर्मप्रसारकांनीं इस्लामी धर्माचा बराच प्रसार केला. वहाबीपंथाचा उदय झाल्यापासून तर हिंदुस्थानामध्यें इस्लामीधर्माचा प्रसार झपाटयानें सुरू झाला. त्यांतच राजकीय सत्तेचा आश्रय मिळाल्यामुळें इस्लामची प्रगति अधिक सुकर झाली. पण धर्मोपदेशकांच्या संस्था मात्र ख्रिस्ती मिशनर्यांच्या संस्थेच्या अनुकरणानें १९ व्या शतकांत उदयास येऊं लागल्या. तथापि आजकाल हिंदूंनां धर्मोपदेशकानें बाटविण्यापेक्षां अन्य तर्हानीं बाटविण्याच्या कामींच या संस्थानीं आपलें सर्वस्व खर्च करण्यास सुरवात केलेली दिसते.
पा र शी मि श न.- पारशीधर्म हा जात्याच प्रसारकधर्म आहे. पारशीधर्माचा पुरस्कर्ता झरथुष्ट्र यानें आपल्या हयातींत पुष्कळशा प्रदेशांवर आपला धर्म प्रसृत केला. सस्सानियय घराण्याच्या कारकीर्दीत धर्मप्रसाराच्या कामाला तेजीचे दिवस आले; व राजसत्तेच्या जोरावर आर्मेनिया, चीन इत्यादि भागांतहि पारशीधर्माचा थोडाफार प्रसार झाला. तथापि या घराण्याच्या र्हासानंतर धर्मप्रसाराचें कार्य समाप्तच झालें असें म्हणावयास हरकत नाहीं. हिंदुस्थानांतहि झरथुष्ट्री संप्रदायाचा प्रसार करण्याचे प्रयत्न प्रथमतः करण्यांत आले पण या पंथास अस्पृश्यवर्गाखेरीज कोणीच अनुयायी मिळंत नाहींत असें दिसून आल्यामुळें त्यांच्या अंतर्भावास विरोध करण्यांत आला.
ख्रि स्ती मि श न.- वरील तिन्ही धर्मांपेक्षांहि ख्रिस्ती धर्मानें या कार्यांत अधिक आघाडी मारली आहे. ख्रिस्तीधर्माच्या स्थापनेपासून तों आतांपर्यंत ख्रिस्तीधर्मानें हें काम फारच पद्धतशीर तह्रेनें व मोठया यशस्वी तह्रेनें चालविलें आहे. ख्रिस्तीधर्मामध्यें बरेच पोटभेद झालें व त्यांनीं परस्परांशीं झगडेहि चालविले. तथापि आपला धर्म जगामध्यें प्रसृत करण्याच्या कामीं या सर्व संप्रदायांनीं अवाढव्य परिश्रम केले आहेत. अगदीं प्राचीन काळीं पॉल, क्रिसॉस्टोम इत्यादिकांनीं हें कार्य केलें. मध्ययुगांत केल्टिक, स्लाव्ह, स्कँडिनेव्हिया, इस्लामी प्रदेश, हिंदुस्थान इत्यादि ठिकाणीं धर्मप्रसारकांनीं ख्रिस्तीधर्माचा प्रसार केला. अर्वाचीन काळांत, मिशनसंस्थांनीं मागील काळांतील वैयाक्तीक प्रयत्नांच्या ऐवजीं सामुदायिक प्रयत्न करण्यास सुरवात केली व त्यामुळें सर्व जगांत या संस्थांचा शिरकाव झाला आहे. त्यांतच राजसत्तेचा पाठिंबा मिळाल्यामुळें धर्मप्रसाराला चांगलीच मदत झाली आहे. नुसत्या इंग्लंड व अमेरिकेंतच शंभरावर मिशनरी संस्था असून त्यांच्या शाखा जगाच्या पाठीवर सर्वत्र पसरल्या आहेत. या संस्थांमध्यें बौद्ध भिक्षुणींप्रमाणें बायकांचा देखील प्रवेश करण्यांत आल्यामुळें त्यांची या धर्मप्रसाराला फारच मदत झाली आहे. ख्रिस्ती मिशनर्यांच्या चळवळींत महत्त्वाची गोष्ट म्हणजे रानटी, असंस्कृत व खालच्या दर्जाच्या लोकांमध्यें त्यांनीं मुख्यतः धर्मप्रसार केला ही होय. ख्रिस्ती मिशनर्यांपैकीं बर्याच मिशनर्यांनीं धर्मप्रसाराचें कार्य शांततेनें केलें. तथापि कांहीं मिशनर्यांनीं हिंदूंचा अत्यंत छळ करून निर्दयतेनें त्यांनां बाटविलें, असें गोव्यांतील मिशनर्यांच्या इतिहासावरून दिसून येतें.
ख्रिस्ती धर्मोपदेशक व हिंदुस्थानः- हिंदुस्थानांत अगदीं पहिल्या प्रथम नेस्टोरियन पंथाचे धर्मोपदेशक आले. त्यांच्या नंतर १६ व्या शतकामध्यें जेसुइट पंथाच्या धर्मोपदेशकांनीं प्रवेश केला, व त्यांनीं पुष्कळ लोकांनां आपल्या धर्माचे अनुयायी बनविलें. पुढें १८ व्या शतकांत 'डॅनिश कोस्ट मिशन' या संस्थेच्या धर्मोपदेशकाचें आगमन झालें. या तिन्ही मिशनसंस्थांच्या परिश्रमामुळें ख्रिस्ती धर्माचें बीं हिंदुस्थानांत थोडें फार रुजलें व त्यामुळें त्यांच्यानंतर आलेल्या ख्रिस्ती मिशनर्यांचा कार्यभाग सुलभ झाला. १९ व्या शतकाच्या प्रारंभीं विल्यम कॅरी यानें श्रीरामपूर येथें आपल्या मिशनरी संस्थेची स्थापना केली व आपल्या हाताखालच्या उत्साही मिशनर्यांच्या साहाय्यानें ख्रिस्तीधर्म पसरविण्याची अतोनात खटपट केली. त्यानें बायबलचें सात भाषांमध्यें भाषांतर करविलें, गरीबांनां मदत करण्यासाठीं शेतकी संस्था व बँका काढल्या, व हिंदु धर्मांतील ज्या सती सारख्या चाली होत्या त्या नाहींशा करण्यासाठीं खटपट केली. दक्षिण हिंदुस्थानांत लंडन मिशनरी सोसायटीनें व चर्च मिशनरी सोसायटीनें मुख्य मुख्य शहरीं आपल्या संस्था स्थापिल्या. महाराष्ट्रांत व विशेषतः अहमदनगर येथें अमेरिकन-वार्ड संस्थेनें आपलें कार्य सुरू केलें. हिंदुधर्माचें केंद्रस्थान जें गंगेचें खोरें त्या ठिकाणीं बॅप्टिस्ट, व चर्च मिशनरी व लंडन मिशनरी सोसायटयांनीं ख्रिस्ती धर्माचा झेंडा रोंविला. अशा रीतीनें १९ व्या शतकाच्या उत्तरार्धांत या मिशनरी सोसायटयांनीं आपलें जाळें हिंदुस्थानभर पसरलें. त्यांच्या कार्याची मुख्य दिशा पुढीलप्रमाणें होतीः- (१) जातिभेदाचे कडक निर्बंध शिथिल करणें व सामाजिक व धार्मिक स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठीं खटपट करणें, (२) मूर्तिपूजेविरुद्ध चळवळ करणें, (३) एकेश्वरीमताचा व उपासनामार्गाचा पुरस्कार करणें (४) स्त्रीविषयक पारतंत्र्याविरुद्ध चळवळ करणें. या कार्यासाठीं त्यांनीं खेडेगांवांत आपल्या संस्थेतर्फे शाळा उघडल्या, धर्मोपदेशकांच्या द्वारें व्याख्यानें देण्यास आरंभ केला, दवाखाने काढले, अनाथगृहें उघडलीं, स्त्रीशिक्षणाच्या संस्था स्थापल्या, अस्पृश्यांची सुधारणा करण्यासाठीं परिश्रम केले, इंग्लिश भाषा व ख्रिस्ती वाङ्मय यांचा प्रसार केला, व निरनिराळया ठिकाणीं चर्चेस्थापन केलीं. या कार्यांत त्यांनां, अनेक बाजूंनीं विरोध झाले तथापि त्यांनीं आपल्या कार्यांत खंड पडूं दिला नाहीं. या त्यांच्या कार्याचें फळ म्हणजे हिंदुस्थानांत आर्यसमाज, ब्राह्मसमाज, प्रार्थनासमाज इत्यादि हिंदुधर्माच्या मिशनरी संस्था निर्माण झाल्या हें होय. तथापि अलीकडे हिंदूधर्मांत सामाजिक जागृति झाल्यामुळें या मिशनरी संस्थांचें कार्यक्षेत्र कमी कमी होत चाललें आहे, व उत्तरोत्तर अधिकाधिक कमी होत जाण्याचीं स्पष्ट चिन्हें दिसत आहेत.
हिं दु मि श न.- हिंदुधर्माच्याच तेवढया मिशनरी संस्था नाहींत व असल्या तरी त्या अगदीच थोडया आहेत व त्यांचे उद्देशहि निराळे आहेत. हिंदुधर्म हा अत्यंत उदार धर्म असल्यानें तो कोणत्याहि धर्माचा तिरस्कार करीत नाहीं व आपला धर्म सामोपचारानें अगर जबरीनें परधर्मावर लादूं इच्छीत नाहीं; त्यामुळें त्याच्यामध्यें अशा प्रकारच्या संस्थांचा प्रसार झाला नाहीं. हिंदुधर्माच्या अनेक संप्रदायांमध्यें संप्रदायांच्या मुख्यांनीं, इतर संप्रदायांतील अनुयायांनीं आपला संप्रदाय अनुसरावा एतदर्थ खटपट केल्याचीं उदाहरणें आहेत, तरी परधर्माच्या लोकांमध्यें जाऊन तेथें आपल्या धर्माला अनुयायी मिळविण्याची त्यांनीं कधींच खटपट केली नाहीं. हल्लीं मिशनरी संस्थांच्या अनुकरणानें आर्यसमाज, ब्रह्मोसमाज, हिंदुमिशनरी सोसायटी इत्यादि संस्था निघाल्या आहेत, तथापि त्यांचें कार्य मुख्यतः हिंदुधर्मामध्यें सुधारणा घडवून आणणें व धर्मांतर केलेल्यांनां स्वधर्मांत परत आणणें हेच आहे.