विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मिल्ल, जॉन स्टुअर्ट (१८०६-७३)- इंग्लिश तत्त्ववेत्ता व अर्थशास्त्रज्ञ. जेम्स मिल्ल या नामांकित इतिहासकार व तत्त्ववेत्त्याचा हा मुलगा. जेम्स मिल्ल हा बेंथामच्या उपयुक्ततावादाचा पुरस्कर्ता होता व त्यामुळें आपल्या मुलाला या शास्त्रामध्यें प्रावीण्य मिळवितां येईल अशा प्रकारचें शिक्षण देण्याबद्दल त्यानें अतिशय काळजी घेतली. त्यामुळें जॉन १५ व्या वर्षींच वाङ्मय, तर्कशास्त्र, अर्थशास्त्र व गणित या विषयांत तरबेज झाला. नंतर त्याला फ्रान्समध्यें बेंथामच्या भावाच्या देखरेखीखालीं अर्थशास्त्राचें अध्ययन करण्यासाठीं ठेवण्यांत आलें. त्यामुळें बेंथामच्या अर्थशास्त्रविषयक सिद्धांतांमध्यें त्यानें नैपुण्य संपादन केलें. १८२३ सालीं 'इंडिया हाऊस' मध्यें त्यानें कारकुनीची जागा पत्करिली व त्या जागेवरून चढत चढत तो हिंदुस्थानविषयक कागदपत्रा' चा तपासनीस झाला. १८२५ सालीं त्यानें बेंथामचें 'रॅशनल ऑफ ज्यूडिशियल एव्हिडन्स' हें पुस्तक प्रकाशित केलें. त्याशिवाय त्यानें १८२५ नंतर 'रॅडिकल' मासिकांत बरेच लेख लिहिले. लंडन रिव्ह्यूचा तो संपादकहि होता. १८४३ सालीं त्याचा 'लॉजिक' (तर्कशास्त्र) हा प्रसिद्ध ग्रंथ बाहेर पडला. १८४८ सालीं त्यानें 'प्रिन्सिपल्स ऑफ पोलिटिकल एकॉनमी' (अर्थशास्त्राची तत्त्वें) हें पुस्तक प्रसिध्द केलें. १८५८-६५ या दरम्यानच्या काळांत तर त्यानें पुष्कळच ग्रंथ लिहिले; त्यांपैकीं 'लिबर्टी' (स्वातंत्र्य), 'युटिलिटोरियानिझम' (उपयुत्तच्वाद) 'रेप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट' (प्रातिनिधिक राजपद्धति) इत्यादि पुस्तकें महत्त्वाची आहेत. १८६५ सालीं तो पार्लमेंटाचा सभासद झाला. पण पार्लमेंटमध्यें तो विशेष चमकला नाहीं. १८६९ सालीं 'दि सब्जेक्शन ऑफ वुइमेन' (स्त्रियांची परवशता) व १८७० सालीं 'दि आयरिश लँड क्वश्चन' हे ग्रंथ त्यानें लिहिले. त्यानंतर आत्मवृत्तपर ग्रंथ लिहिला. १८७३ सालीं तो ऍव्हिग्नान येथें मरण पावला. मिल्लचे नांव त्यानें बेंथामच्या 'उपयुक्ततावाद' विषयक सिद्धांताचा धडाडीनें पुरस्कार केला या बाबतींत प्रसिध्द आहे. तथापि उपयुक्ततावादांत त्यानें आपल्या विचारांची भर घालून त्याला व्यापक स्वरूप दिलें. तत्कालीन जनतेवर मिल्लच्या मतांची भयंकर छाप बसली होती. स्त्रियांच्या बाबतींतील त्याचे विचार फार प्रगमनशील असून ते सर्व राष्ट्रांनीं हल्लीं मान्य केले आहेत.