विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मिर्झापूर, जि ल्हा.- संयुक्तप्रांताच्या बनारस भागांतील जिल्हा. क्षेत्रफळ ५२३३ चौरस मैल. ह्या जिल्ह्याच्या उत्तरेकडील सरासरी ११०० चौरस मैलांचा टापू गंगा नदीच्या दोन्ही बाजूंनीं पसरला आहे. या भागांत गंगा नदीच्या दोन्ही बाजूंनीं पसरला आहे. या भागांत गंगा नदीच्या दक्षिणेस विंध्याद्रि पर्वताच्या शाखा थेट कैमूरपर्यंत पसरल्या आहेत. यांत कर्मनाशा नदीचे लतीफशाह व छन्नपाथर हे दोन धबधबे फारच प्रेक्षणीय आहे. यांत गंगा, शोण, कर्मनाशा, गराई या मुख्य नद्या आहेत. गंगा नदीच्या उत्तरेस दाट जंगल पसरलें आहे. येथें सरासरी ४१ इंच पाऊस पडतो.
इतिहासः- या जिल्ह्याच्या बर्याच भागाचा प्राचीन इतिहास उपलब्ध नाहीं. येथील गंगा नदीच्या टापूंत पूर्वी भार नांवाच्या टोळीचें वर्चस्व होतें. चुन्नरपासून पूर्वेकडील टापू चिरस नांवाच्या टोळीच्या ताब्यांत होता, व याच्या दक्षिण भागांतील अरण्यांत कोल व खारवारी लोकांचें वर्चस्व होतें. १२ व्या शतकाच्या शेवटीं सबंध जिल्ह्यावर रजपूत टोळयांचा अंमल बसला. पुढें कांहीं वर्षांनीं येथील गंगा नदीचा टापू मुसुलमानांच्या हातीं लागला. अकबर बादशहा दिल्लीच्या तक्तावर आरूढ झाल्यानंतर कांही काळापर्यंत जुन्नरगड पठाण लोकांच्याच ताब्यांत होता. नंतर १८ व्या शतकांत अयोध्येच्या नबाबाला जो मुलुख तोडून दिला त्यांत या जिल्ह्याचा समावेश होत असें. इ. स. १७३८ त अयोध्येच्या नबाबानें बनारस, जानपूर, गाझीपूर व चुन्नर या सरकारांवर मनसाराम यास सुभेदार नेमलें. मनसारामच्या मरणानंतर त्याचा मुलगा बलवंतसिंग (बनारसचा राजा) हा त्या सरकारांचा सुभेदार झाला. बलवंतसिंगाच्या मरणानंतर त्याचा दासीपुत्र चेतसिंग याच्या ताब्यांत सर्व मुलूख आला. पढें चेतसिंगास वॉरन हेस्टिंग्जनें पदच्युत केल्यानंतर महिपत नारायण यास त्याची मालमत्ता देण्यांत आली. पुढें स. १७८८ मध्यें महिपतसिंगाला त्या मालमत्तेची व्यवस्था नीट करतां येत नाहीं असें दिसून आल्यावर कोटा व काची या दोन जहागिरी इंग्रजी राज्यास जोडण्यांत आल्या. येथें कैमूरच्या डोंगरावर कांहीं लेणीं व त्यांत दगडांचीं शस्त्रें आणि जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागांत कांहीं दगडी मूर्ती सांपडल्या आहेत. अर्हौराजवळ इ. स. ११९६ त लिहिलेला कनोजच्या लेखनदेवाचा शिलालेख सांपडला आहे.
जिल्ह्यांत ६ शहरें व ४२५७ खेडीं असून लोकसंख्या इ. स. १९२१ मध्यें ७२४१८३ होती. येथें हिंदी भाषा प्रचलित आहे. येथील जमीन नद्यांच्या गाळानें तयार झाली असल्यामुळें सुपीक आहे. तींत तांदूळ, चणे, कोद्रा, गहूं, बाजरी, ज्वारी, मका, तीळ व अळशी हीं धान्यें होत असून ऊंस व खसखशीची हि लागवड होते. ह्या जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागांत इमारतीला योग्य असा दगड सांपडतो. चुन्नरजवळ शिंदीच्या झाडांपासून साखर तयार होते व गंगा नदीच्या उत्तरेकडील भागांत उंसापासून साखर तयार होते. खास मिर्झापूरमध्यें उत्तम पितळेचीं भांडीं होतात. येथें लाखेचा रंग व लोंकरीचें कापड तयार होतें.
ता लु का.- क्षेत्रफळ ११८५ चौरस मैल व लोकसंख्या (१९११) ३०६०८८. यांत १००१ खेडीं व एक मोठें गांव आहे. मिर्झापूर हें जिल्ह्याचें मुख्य ठिकाण आहे.
श ह र.- मिर्झापूर जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. लोकसंख्या सुमारें ३२०००. १८ व १९ व्या शतकांत हें उत्तर हिंदस्थानांत एक मोठें व्यापाराचें शहर होतें. येथें गंगा नदीस घाट बांधिला आहे त्यामुळें व येथें असलेल्या सुंदर मशिदी, देवालयें व श्रीमंत व्यापार्यांच्या वाडयांमुळें या शहराला फारच सौंदर्य आलें आहे. स. १८६७ मध्यें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. याच्या नैर्ॠत्येस कांहीं मैलांवर विंध्याचल नांवाच्या गांवीं विंध्यावासिनी अथवा विंध्येश्वरीचें देवालय असून दरवर्षी तेथें मोठी यात्रा भरते. येथून जवळच भार लोकांच्या वेळच्या पंपापूर शहराचे अवशेष आहेत. या शहरांत पितळेची सुंदर भांडीं तयार होत असून लोंकरी व सुती कापडहि तयार होतें.