विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मिरीं- मिर्यांचें मूलस्थान हिंदुस्थानच होय. याचे बेल कानडाच्या जंगलांत रानटी स्थितींत आढळतात. मि र्यांची लागवड उत्तर मलबार, वैनाड, त्रावणकोर व मुंबई इलाख्यांतील कारवार जिल्ह्यांतील शिरसी, शिद्दापूर व सुपें तालुक्यांत बर्याच प्रमाणांत होते. मिर्यांची लागवड एकदां केली म्हणजे पुष्कळ वर्षें टिकते. मलबारांत जंगल साफ करून पांगार्याचे डांबे लावितात व त्यांच्या बुडाशीं मिर्यांचें वेल लावितात, ते पांगा र्यावर चढतात. शिवाय आंबा व फणस या झाडांवरहि वेल सोडतात. त्यांची लागवड कारवारांतील सुपारी, वेलदोडे यांच्या बागांत कागदाळी जमिनींत करतात.
मिर्याची लागवड जून जुलई महिन्यांत वेलांचीं कलमें अगर 'लेअरिंग' करून करतात. हीं कलमें पोफळीच्या आळयांत लावितात. वेल लाविल्यापासून तिसर्या अगर चवथ्या वर्षी फळें येऊं लागतात. फुलें जुलई-आगष्ट महिन्यांत येऊन फळें मार्च महिन्यांत तयार होतात. फळें पक्की होण्यापूर्वी काढतात. त्यांचीं डेंखें चोळून काढतात व तीं उन्हांत वाळवितात. मिरीं वाळलीं म्हणजें तीं काळीं होतात व सुरकुततात. एक हजार घोंसांपासून काढलेलीं मिरीं वाळल्यावर सात शेर (शेर = २४ तोळे) भरतात. दर एकरीं सरासरी उत्पन्न ३००-५०० पौंडांर्पर्यंत येतें. सुपारी, वेलदोडे व मिरी यांच्या मिसळीच्या बागांतील सरासरी जमाखर्चाकरितां उत्तररकानडांतील शिर्शी तालुक्यांतील मसाल्याच्या बागांतील उत्पन्नासंबंधीं रा. सहस्त्रबुद्धे यांनीं लिहिलेलें १९१७ सालचें बुलेटिन नंबर ८३, पृष्ठ २६ पहा.