विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मिरासदार- महाराष्ट्रांतील लोकांची अशी समजूत आहे की, प्राचीन काळीं प्रत्येक शेत कोणाच्या न कोणाच्या तरी मालकीचें असे. जोंपर्यंत शेताचा मालक सरकारांत नियमितपणें सारा भरतो तोंपर्यंत त्यांजकडून शेत काढून घेण्याचा सरकारास कांहीं एक हक्क नाहीं. अशा प्रकारच्या शेतकर्यास पुढें उपरी कुळांपासून ओळखण्याकरितां मिरासदार ही संज्ञा देण्यांत आली. मिरासदारास आपली जमीन दुसर्या कोणासहि विकण्याचा हक्क आहे. परंतु उपरी कुळांत तसें करतां येत नाहीं. मिरासदाराची जमीन वंशपरंपरा त्याच्याच घराण्यांत रहाते. मिरासदार हें मुसुलमानी नांव असून थळकरी हा त्याच अर्थाचा मराठी शब्द आहे. (डफ. पु. ५, पृ. २४)