विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मिराबो ऑनोरे गॅब्रिएल रिकेटी (१७४९-९१)- एक फ्रेंच मुत्सद्दी व ग्रंथकार. पेन्शन मिलिटेर या लष्करी शाळेमधील शिक्षणक्रम आटोपल्यावर घोडेस्वाराच्या पथकामध्यें यानें नोकरी धरिली. उच्छृंखलपणाबद्दल त्याला एक दोनदां तुरुगांतहि जावें लागलें. १७७२ सालीं त्याचा 'एसे सूर ल डेस्पॉटिस्म' हा ग्रंथ प्रसिध्द झाला. त्यानंतर 'लेत्र द कॅशे' हा ग्रंथ १७८२ त प्रसिध्द झाला. या ग्रंथांत फ्रेंच शासनपध्दतीचें सुंदर विवरण केलेलें आढळतें. १७८५ सालीं त्यानें 'काँसिडरेशिआं सूर लॉर्ड्र द सिनसिनातुरु' हा ग्रंथ लिहिला. नंतर त्याला परराष्ट्रखात्यांत नोकरी मिळाली. १७८६ सालीं प्रशियामध्यें कांहीं गुप्त राजकारण करण्यासाठीं त्यास पाठविलें. पण ती कामगिरी यशस्वी झाली नाहीं. पण प्रशियांत असतांना त्यानें प्रशियासंबंधीं सर्व माहिती मिळवून 'द ला मॉनकीं ए प्रुशियन सौ प्रेडेरिक ल ग्राँ' हा प्रशियावरील ग्रंथ लिहिला. स. १७८९ त 'स्टेट्स जनरल' या सभेमध्यें त्याला जागा मिळाली व तेथील कामकाजांत त्यानें प्रामुख्यानें भाग घेतला. त्यामुळें त्याला पुढारीपण प्राप्त झालें. १७८० च्या राज्यक्रांतीच्या वेळींहि त्यानें महत्त्वाची कामगिरी बजावली. इंग्लिश प्रातिनिधिक शासनपद्धतीच्या धर्तीवर फ्रान्समध्यें शासनपद्धति असावी असें त्याचें मत होतें. फ्रान्सच्या अंतर्गत राज्यकारभारांत इतर राष्ट्रांनां ढवळाढवळ करण्याचें कारण नाहीं या मताचा तो होता. तो व्यावहारिक राजकारणपटु मुत्सद्दी होता. लोकनायकांच्या अंगीं हवें असणारें वक्तृत्व त्याच्या अंगीं प्रामुख्यानें वसत होतें. मिरोबोनें वर सांगितलेल्या ग्रंथांशिवाय इतर किरकोळ ग्रंथ बरेच लिहिले आहेत.