विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मिरज संस्थान- यास मोठी पाती म्हणतात. याचें क्षेत्रफळ ३४२ चौरस मैल, लोकसंख्या (१९२१) ८२५८० व उत्पन्न ३८६९६२ रुपये. यांत गांवें ६२ असून हें इंग्रजसरकारास १२५५८ रुपये सालीना खंडणी देतें. याचे कसबा मिरज, लक्ष्मेश्वर व मोडनिंब असे तीन अलग अलग तालुके आहेत. पैकीं मिरज तालुक्याची जमीन काळी असून, आंबे व चिंचेचें उत्पन्न चांगलें येतें. लक्ष्मेश्वर तालुका धारवाड जिल्ह्यांत असून, त्याचा प्रदेश सपाट व रुक्ष आहे; मात्र जमीन फार सुपीक व काळी आहे. मोडनिंब तालुका सोलापूर जिल्ह्यांत असून, प्रदेश खडकाळ व हलक्या जमिनीचा आहे. कृष्णा, वारणा व भीमा या मोठया नद्या संस्थानांतून वहातात. हवा आरोग्यकारक व पाऊस सरासरी २० ते २५ इंच असून जंगल मुळींच नाहीं. तांदूळ, गहूं, सागवानी लांकूड, धातूचीं भांडीं हा आयात माल असून बाजरी, ज्वारी, हरभरा, गूळ, भुईमूग, तंबाखू, कापूस, लुगडीं, पागोटीं, कांबळीं, सतारी वगैरे निर्गत माल आहे. मिरज व लक्ष्मेश्वर येथें हातमाग बरेच आहेत. तालुक्यांच्या गांवीं म्युनिसिपालिटया आहेत. मिरज ही संस्थानची राजधानी असून तिची लोकसंख्या २० हजारांवर आहे. येथें एक इंग्रजी हायस्कूल, दवाखाना, सरकारी कचेर्या, टाऊन हॉल वगैरे संस्था व इमारती आहेत. हें गांव व्यापाराची मोठी उतारपेठ असून येथें सोमवारी व मंगळवारीं बाजार भरतो. मुसुलमानांचे दोन दरगे असून पैकीं एक मीराचा व दुसरा शमसुद्दिनाचा आहे. मीराचा दरगा इ. स. १४१३ तील आहे. तेथें दोन फारशी शिलालेख आहेत. मिरजेचा किल्ला बहामनी राजांनीं स. १४९३ च्या पूर्वी बांधला. बहामनीनंतर तो आदिलशाहीकडे आला. येथें अल्ली आदिलशहास त्याच्या बापानें कैदेंत ठेविलें होतें. शिवाजीच्या पहिल्या धामधुमींत मिरज ही रस्तुमजमान याची जहागीर होती. विजापुरकरांकडून औरंगझेबानें तो किल्ला घेतल्यावर त्याच्या पश्चात् निजामाकडे त्याची मालकी आली व पुढें पेशव्यांनीं तो घेऊन, गोविंद हरि पटवर्धनास सरंजामांत नेमून दिला; तेव्हांपासून तो पटवर्धनांच्या ताब्यांत आहे. हल्लीं याचा तट बहुतेक पडला असून, आंत सरकारी कचेर्या आहेत.
इ ति हा स.- पटवर्धनांचा मूळपुरुष हरभट, व त्याच्या इतर वंशजांची हकीकत निरनिराळया पटवर्धन सरदारांच्या इतिहासांत दिली आहे. नारोपंत इचलकरंजीकरातर्फे हरभटाच्या गोविंदराव या मुलास थोरल्या बाजीरावानें आपल्या ५२ पाग्यांतील इंद्रोजी कदम याच्या पागेची फडणविशी दिली (१७३०) व पुढें इंद्रोजी वारल्यावर त्याची पागाच गोविंदरावास मिळाली. गोविंदरावानें कर्नाटकांत महत्त्वाच्या पुष्कळ कामगिर्या केल्या, त्यामुळें पेशव्यांनीं मिरजेचा किल्ला व आसपासचा प्रांत गोविंदराव व त्याचे पुतणे परशुरामभाऊ आणि नीळकंठ त्र्यंबक या तिघांच्या नांवें ८ हजार स्वार ठेवण्यासाठीं २५ लाखांचा प्रांत सरंजाम म्हणून दिला (१७६४). गोविंदरावाचा मुलगा गोपाळराव हाहि फार पराक्रमी निपजला. राघोबादादा, पेशवे झाले असतां त्यांनीं मिरज पटवर्धनापासून जबरीनें घेतली, याचें कारण गोपाळरावानें थोरल्या माधवरावांची बाजू घेतली होती. मिरज गेल्यावर गोपाळराव निजामाकडे गेला,परंतु माधवरावानें त्याची समजूत करून त्यास मिरज परत दिली. गोपाळरावानें हैदर व भोंसले यांच्या स्वार्यांत प्रमुखत्वानें भाग घेतला. कर्नाटकांत त्याचा दरारा फार होता; तो मुत्सद्दी, शूर व करारी होता. हैदरावरील एका स्वारींत ह्याची प्रकृति बिघडून तो मिरजेस आला व तेथेंच वयाच्या ४२ व्या वर्षी वारला (१७७१). त्या शोकानें थोडयाच दिवसांत गोविंदरावहि वारला. त्याच्यामागें गोविंदरावाचा धाकटा मुलगा वामनरव यास सरदारी मिळाली (१७७३) बारभाईंच्या कारस्थानांत वामनराव हा त्यांच्या बाजूस होता. वामनरावानेंहि हैदरावर स्वार्या केल्या होत्या. भोंसल्यावरील स्वारींत जात असतां तो खानदेशांत वरणगांव येथें वारला (१७७५). नंतर त्याच्या पांडुरंगराव नांवाच्या धाकटया भावास सरदारी मिळाली, पांडुरंगराव स्वारीशिकारीवर जाई आणि त्याचा धाकटा भाऊ गंगाधरराव हा मिरजेचा सर्व कारभार पाही. पांडुरंगराव हा हैदरावरील एका स्वारींत पाडाव होऊन शेवटपर्यंत बंदींत होता. पुढें गंगाधर गोविंद व पांडुरंगरावाचा सर्वांत धाकटा मुलगा चिंतामणराव या चुलतेपुतण्यांत सरंजामाबद्दल तंटे लागून ते विकोपास गेले. चिंतामणरावानें तर बाहेर निघून व सैन्य जमवून मिरजेवर हल्ले केले (१८०१). गंगाधरराव हा कारकुनी बाण्याचा व नाना फडणविसाच्या मर्जीतला गृहस्थ होता. अखेर अनेक मंडळींच्या मध्यस्थीनें सरंजामाची वांटणी होऊन, खुद्द मिरज व ४७९७९८ रुपयांची जहागीर गंगाधररावास व सांगली व ६३५१७८ रु. ची जहागीर चिंतामणरावाच्या वांटयास आली. खेरीज सांगलीस किल्ला बांधण्यास १ लाख रु. चिंतामणरावास मिळाले (१८०८). गंगाधररावानें लोकोपयुक्त पुष्कळ कामें केलीं. तो स. १८०९ त वारला. याला केशव, नारायण, माधव, गोविंद, गोपाळ, व वामन असे ६ पुत्र होते. केशव लहानपणीं वारल्यानें नारायणास सरदारी मिळाली (१८१२). या सालीं इंग्रजांनीं पेशवे व पटवर्धन यांचा परस्पर संबंध ठरवून दिला. हा खडर्याच्या लढाईंत हजर होता. याला गणेश व मोरेश्वर हे पुत्र होते. बाप वारला तेव्हां गणपतराव (पहिला) लहान असल्यानें, त्याचा चुलता माधवराव हा कारभारी झाला; त्याच्या वेळींच इंग्रजांचा व मिरजकरांचा गलगले येथें तह झाला (१८१९), त्यांत ३०० स्वार चाकरीस ठेवण्याची अट होती. याचा दुसरा चुलता गोपाळराव यानें हिश्शाबद्दल तक्रार केल्यावरून, इंग्रजसरकारनें मिरज किल्ला व त्याखालींल ५५ हजारांचा सरंजाम वेगळा काढून बाकीच्या दौलतीचे चार भाग केले. गणपतराव नारायण यांस मिरज दौलत, माधवराव गंगाधरास मिरजमळा, कृष्णराव गोविंदास सोनी (हल्लीं खालसा), गोपाळ गंगाधरास सुपारीबाग (हल्लीं खालसा), असे हिस्से पाडून गणपतरावास किल्ला व त्याखलच्या सरंजाम देऊन शिवाय वडिलपणाबद्दल २८ हजारांचा सरंजाम जास्त दिला; गणपतराव १८३३ त वारला. त्याला गंगाधर व नारायण असे दोन पुत्र होते. बाळासाहेब (गंगाधरा)स मुखत्यारी मिळाली (१८४९) त्यापूर्वी १ वर्ष मिरजकराकडून इंग्रजांनीं स्वारांच्या ऐवजीं सालीना १२५५८ रु. नक्त रक्कम घेण्याचें ठरलें. पुढें स. १८५७ च्या नानागर्दींत बाळासाहेब राजनिष्ठ राहिल्यानें इंग्रजसरकारनें त्यास दत्तकाची परवानगी दिलीं. त्यानें किल्ल्यातील त्रिंबक गणेश यास दत्तक घेऊन त्याचें नांव गणपतराव ठेविलें (१८६१); त्यानंतर दोन महिन्यांनीं बाळासाहेब वारला. गणपतरावास स. १८७१ त मुखत्यारी मिळून त्यांनीं तीनच वर्षें कारभार केला. व दवाखाने, लायब्ररी वगैरे संस्था स्थापून, जकात माफ करून व्यापार वाढविला. यांची हुषारी व विद्वत्ता पाहून मुंबई सरकारनें यांस आपल्या कायदेकौन्सिलचें सभासद नेमलें. हे अल्पवयीच (१८७४) वारले. त्यानंतर सांगलीच्या दत्तक घराण्यांतील गणपतराव विनायक यांचा दुसरा मुलगा गोपाळराव यास गणपतराव मिरजकरांच्या कुटुंबानें दत्तक घेऊन त्याचें नांव गंगाधरराव ठेविलें (१८७५). हेच सांप्रतचे विद्यमान मिरजेचे संस्थानिक श्री. गंगाधरराव बाळासाहेब के. सी. आय्. ई. होत. यांचा जन्म स. १८६६ तील असून यांचें शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजांत झालें. यांनां १८८७ त मुख्यतारी मिळाली. यांनां मल्लविद्येची उत्कृष्ट माहिती असून कलाकौशल्य व धंदेशिक्षणाची आवड आहे. यानीं प्रजेवरील निरनिराळया ३३ बाबींचे त्रासदायक कर माफ केले. मिरज व इतर संस्थानांतील मोठीं गांवें येथें म्युनिसिपालिटया स्थापन केल्या, सडका, सार्वजनिक इमारती बांधल्या. पाण्याच्या नळांची व्यवस्था केली. यांनां श्री. नारायणराव व श्री. हरिहरराव असे दोन पुत्र आहेत. (आपटे-पटवर्धन घराण्याचा इतिहास; हरिवंशाची बखर; ऐतिहासिक लेखसंग्रह भा. १-११; ग्रँट डफ; कोल्हापूर गॅझेट; पारसनीस-धी सांगली स्टेट.)