विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मिरजमळा संस्थान- यास मिरज छोटी पाती म्हणतात. याचें क्षेत्रफळ १९६ चौरस मैल, लोकसंख्या (१९२१) ३४६२६ व उत्पन्न ३२७४०३ रुपये असून हें इंग्रजसरकारास ७३८९ रुपये खंडणी देतें. सातारा, सोलापूर, पुणें व धारवाड या जिल्ह्यांत अनेक ठिकाणीं मिळून एकंदर या संस्थानचीं ४० गांवें असून त्याचे कवठें, गुडगेरी व कुरोली असे तीन तालुके आहेत. बहुतेक प्रदेश सपाट असून जमीन सुपीक व काळी आहे. कृष्णा, वारणा या मुख्य नद्या आहेत. हवा समशीतोष्ण व आरोग्यकारक असून पावसाचें मान १५ इंच असतें. खनिज पदार्थांत इमारतीच्या उपयोगाचा काळा व कठिण दगड सांपडतो. शेती हा मुख्य धंदा असल्यानें ५/६ जमीन लागवडीखालीं आहे. मीठ, कापड, सूत, रेशीम हे आयात व कापूस, गहूं, हरभरा हे निर्गत जिन्नस होत. चिपळूण व कुमठें बंदारांशीं संस्थानचा बराच व्यापार चालतो. बुदगांव व गुडगेरी येथें हातमाग बरेच असून, लुगडी, धोतरें वगैरे कापड तयार होतें.
बुदगांव ही संस्थानची राजधानी, मिरजेपासून ५ मैलांवर असून, तेथें सुमारें ३ हजार वस्ती आहे. येथें कोळयांची वस्ती पुष्कळ आहे. गांवांत सरकारी कचेर्या, शाळा, लायब्ररी, दवाखाना व राजवाडा आहे.
इ ति हा स.- मिरजमळा घराण्याची वंशावळः- हरभट- गोविंदहरी- गंगाधरगोविंद- माधवरावगंगाधर- लक्ष्मणराव माधव- हरिहरराव लक्ष्मण- लक्ष्मणराव हरिहर- श्री. माधवराव लक्ष्मणराव. गणपतराव नारायण मिरजकर यांच्या वेळीं दौलतीच्या वांटण्या झाल्या (१८२१). त्यांत तिसरा हिस्सा माधवराव गंगाधरास मिळाला. गणपतराव नारायणाच्या लहानपणांत माधवराव हाच मिरजेचा कारभार पाही. त्यानें मिरज किल्ला आपल्याकडे घेण्याबद्दल बरींच खटपट केली, पण ती साधली नाहीं. माधवराव हा मिरजेनजीक एका मळयांत राहूं लागल्यानें या शाखेस मळेकर म्हणूं लागले. माधवरावाचे पुत्र लक्ष्मणराव यांची कारकीर्द मिरजमळयांत पहिली झाली. त्यांचे चिरंजीव हरिहरराव व त्यांचे चिरंजीव लक्ष्मणराव यांच्या अज्ञानपणांत इंग्रज सरकारनें संस्थानची व्यवस्था ठेवली. संस्थानची मुखत्यारी मिळण्यापूर्वीच हे लक्ष्मणराव वारले. नंतर श्री. बाळासाहेब कुरुंदवाडकर यांचे द्वितीय पुत्र रघुनाथराव यास दत्तक घेऊन त्यांचें नांव माधवराव ठेवण्यांत आलें (१८९९). सांप्रत (१९२६) हेच श्री. माधवराव बाबासाहेब मिरजमळयाचे अधिपति आहेत. (खरे- ऐ. ले. सं; आपटे-पटवर्धन घराण्याचा इतिहास; कोल्हापूर ग्याझेटियर.)