विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मिरची- मिरची, बटाटा, वांगें व तंबाखू, हीं सर्व झुडपें वनस्पतिशास्त्रदृष्टया एका वर्गांत मोडतात. या सर्वांची लागवड बागाइतांत व जिराइतांत करतात. या सर्व पिकांस पोटॅश पोषक द्रव्य असणार्या खतानें फायदा होतो. तें द्रव्य राख व सोर्यांत असतें. हिंदुस्थानांत मिरची सर्वत्र पिकते. मिरची ही अमेरिकाखंडांतून येथें आली असावी असें म्हणतात. मिरची लागवडीस येण्यापूर्वी मिरीं वापरण्यांत येत असावींत व हल्लीं उत्तर हिंदुस्थानांत बर्याच ठिकाणीं मिरीं वापरण्याची पध्दत आहे. या पिकाखालीं मुंबई इलाख्यांत दर वर्षी सुमारें दीड लाख एकर जमीन असते. मद्रास इलाख्यांत, म्हैसूर संस्थानांत व मोंगलाईंत मिरचीचें पीक जास्त होते. मिरचीच्या निर्गतीचा तपशील असा :- १९१३-१४ सालीं (१६१०३००० टन) २०१३००० रु. किंमतीची व १९१४-१५ सालीं (१६०१४००० टन) २६०३००० रु. किंमतीची. हिच्या अनेक जाती आहेत. लवंगी, बुगडी, पांढरी, मोंगली, रेंगणी, (वांग्यासारखी), भोपळी इत्यादि. या जातींचे दोन वर्ग करतां येतात. लांब (खानदेशी), ब्याटगी (धारवाडी), आणि गोव्याची, यांपैकीं गोव्यांतील मिरचीचें साल जाड असतें व ती तिखटपणाला कमी असते. दुसरी आंखूड-लवंगी ही जात फार तिखट असते. ही मिरची अगदीं लहान असते. हिची लागवड सुरतेकडे बागाइतांत करतात.
भोपळी (टोमेटोसारखी) अगर भाजीची मिरची ही जात धारवाड-बेळगांव जिल्ह्यांत बरीच होते. ही तिखटपणाला कमी असून हिची हिरवेपणीं सगळया वांग्यासारखी भाजी करतात. जिराईत मिरच्यांची लागवड मध्यम काळया जमिनींत, गुजराथेंत गोराडु जमिनींत जेथें पावसाळा बरेच दिवस टिकतो अशा ठिकाणीं करतात. विशेष जिराइत लागवड सातारा, बेळगांव व धारवाड जिल्ह्यांत होते. धारवाड जिल्ह्यांत मुख्यत्वेंकरून राणेबिन्नूर व हिरेकेरूर तालुक्यांत हिची विशेष लागवड आहे. बागाईत मिरच्यांची लागवड हलक्या व मध्यम काळया जमिनींत करतात. खानदेशांत एकाच जमिनींत दोनतीन वर्षें मिरचीची लागवड स्वतंत्र करतात किंवा इतर बागाईत पिकांशीं ती मिसळून करतात. तींत गोंवारी, भेंडया, मुळे वगैरे इतर भाज्या करतात.
मिरच्या विकण्यापूर्वी वाळवाव्या लागतात. पण हिरव्या मिरच्यांचाहि बराच खप आहे. मिरचीच्या बिवडांत ऊंस चांगला होतो. ही चाल सातारा जिल्ह्यांत विशेष प्रचारांत आहे. मिरच्या संपल्यावर झाडें, पाला वगैरे जमिनींत नांगरून टाकल्यास त्याचा खतासारखा उपयोग होतो. सरासरी दर एकरी वाळलेल्या मिरचंचें उत्पन्न जिराईत पीक ७५० ते १००० पौंड व बागाईत पीक १२०० ते २००० पौंड असतें. दर एकरीं खर्च जिराइतांत अदमासें ४० रुपये आणि बागाइतांत ७५ते १२५ रुपये लागतो. मिरच्यांचें उत्पन्न सरासरी तंबाखूच्या बरोबरीनें, उंसाच्या निम्यानें व हळीदच्या तिसर्या हिश्यानें येतें.