विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मियानवाली, जि ल्हा.- पंजाबमधील रावळपिंडी विभागांतील जिल्हा. क्षेत्रफळ ५३९५चौरस मैल. या जिल्ह्यांतून झेलम, सिंधुनद व त्यांच्या शाखा वहातात, व त्यामुळें जमीन सुपीक आहे. ईशान्येस असलेला मिठाचा पर्वत व सकेसर टेंकडी हे दोन डोंगर महत्त्वाचे आहेत. येथें उन्हाळयांत कडक उष्णता असते व हिंवाळयांत कडक थंडी पडते. पावसाचें मान ७ ते ११II इंच असतें. पाऊस थोडा पडतो.
इतिहासः- या जिल्ह्याचा पूर्वेतिहास उपलब्ध नाहीं. ११ व्या शतकाच्या आरंभीं यांत जाट लोकांनीं वसाहत केली व त्यांच्यानंतर बलोच लोकांनीं जाट लोकांवर आपलें स्वामित्व प्रस्थापून, करोर, भक्कर व लेह हीं गांवें वसविली. पुढें १७५६ सालीं हा बहुतेक संबंध जिल्हा दुराणी राज्यास जोडण्यांत आला. नंतर याचा कांहीं भाग शीख लोकांनीं आपल्या ताब्यांत घेतला. शेवटीं १८४९ सालीं हा जिल्हा इंग्रजी साम्राज्यास जोडण्यांत आला.
या जिल्ह्यांत ३९६ खेडीं व चार गांवें असून एकंदर जिल्ह्याची लोकसंख्या ३४१३७७ आहे. मुसुलमान लोकांचें प्रमाण अधिक आहे. जाट, पठाण, बलोच, अवान आणि रजपूत, खत्री, जुलाहा, मोची, तरवान या मुख्य जाती आहेत. या जिल्ह्याचें मुख्य उत्पन्न गव्हाचें होय. येथील सर्व कालव्यांस सिंधुनदाच्या पाण्याचा पुरवठा होतो. मीठ, तुरटी, कोळसा व मातीचें तेल हे खनिज पदार्थ सांपडतात. लोखंडाचीं भांडी व इतर लोखंडी सामान तयार होतें , आणि लेह येथें सुती कापड विणलें जातें. याशिवाय कोठें कोठें ताडाच्या टोपल्या व इतर उपयोगी वस्तू तयार होतात. या जिल्ह्यांत कालवे पुष्कळ असून त्यांचें पाणी शेतांस मुबलक मिळत असल्यामुळें यांत तीव्र दुष्काळ कधींच पडला नाहीं. येथें साक्षरतेचें प्रमाण सुमारें शेंकडा ४ आहे.
त ह शी ल.- या तहशिलीचें क्षेत्रफळ १५४८ चौरस मैल असून लोकसंख्या (१९२१) ३४१३७७. तहशिलींत खेडीं ११७ व एक मियानवाली (मुख्य ठिकाण) गांव आहे.