विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मिनबु- उत्तर ब्रह्मदेश. मगवे विभागांतील जिल्हा. याचें क्षेत्रफळ ३३०२ चौरस मैल आहे. याच्या पूर्वेकडील भागांत इरावती नदीच्या कांठाकांठानें वाळूचीं मैदानें असून त्यांच्या शेवटास टेंकडया आहेत, आणि यांतून इरावती, व तिच्या शाखा ह्या नद्या वहातात. यांत पाँगलिन व वेठ्ठिगन हीं सरोवरें आहेत. या जिल्ह्याची हवा रुक्ष आहे. पाऊस २६.६ इंच पडतो. या जिल्ह्याचा पूर्वेतिहास उपलब्ध नाहीं. १८८६ सालीं हा ब्रह्मी लोकांपासून इंग्रज लोकांनीं घेतला जिल्ह्याची लोकसंख्या (१९२१) २७४३०२. या लोकसंख्येंत ब्रह्मी लोकांचें प्रमाण फार मोठें असून चिनी, थुगाँग, हिंदु, आणि मुसुलमान ह्या लोकांचाहि समावेश होतो. एकंदर लोकसंख्येपैकीं शेंकडा ६६ लोक आपली उपजीविका शेतकीवर करतात. यांतील ब्रह्मी लोक बौद्धधर्मानुयायी आहेत.
येथील जमिनींत मुख्य उत्पन्न भाताचें होत असून कांही ठिकाणीं तीळ, कडधान्यें मका, ज्वारी, चणा, तंबाखू, थोडा कापूस, विडयाची पानें, आंबे, केळीं नारळ हेहि जिन्नस होतात. सागु व मिनबु भागांत राकेल तेलाच्या विहिरी आहेत. याशिवाय कोठें कोठें शिंपांचा खडू, अभ्रक आणि दगडी कोळसा हे पदार्थ सांपडतात. प्रमुख व्यापारी चिनी आहेत, जिल्ह्याचें मुख्य ठिकाण मिनबु आहे.