विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माळवा- याचा समावेश मध्यहिंदुस्थान-एजन्सीच्या पश्चिमभागांत होऊन हिंदुस्थानच्या प्राचीन व मध्यकालीन इतिहासांत याला बरेंच मोठें महत्त्व आलें. क्षेत्रफळ ७६३० चौरस मैल. हा प्रदेश उत्तर अक्षांश २३० ३०' ते २४० ३०' आणि पूर्वरेखांश ७४० ३०' ते ७८० १०' यांच्या दरम्यान आहे. यांतून चंबळा, क्षिप्रा, काली, सिद आणि पार्वती या नद्या वाहतात. यांतील बराच मोठा प्रदेश या नद्यांच्या गाळानें तयार झालेला असल्यामुळें चांगला सुपीक आहे. यांत गहूं, चण, ज्वारी, कापूस, अफू व खसखस याचें उत्तम पीक येतें. पावसाची सरासरी २० इंच आहे. येथील अर्धेअधिक लोक माळवी अथवा रांगडी भाषा बोलतात.
इ ति हा स.- मालव उर्फ माळवा या देशांतील रहिवासी मालव लोक हे माळवा व आग्नेय राजपुताना येथील रहिवासी होत. यांचीं ख्रि. पू. ५८ वर्षांच्या मागील नाणीं उत्तरराजपुतान्यांत सांपडलेली आहेत. नाण्यांवरून मालव लोक हे मूळचे माळव्यांतील दिसत नाहींत. वराहमिहिरानें उत्तरभागांत मद्रांबरोबर मालवांचा उल्लेख केला आहे. हा मालव देश चितोडच्या उत्तरेस किंवा हरियान ते नर्मदा नदी यांमध्यें असावा असें रा. वैद्य म्हणतात. अशोक मौर्य हा बापाच्या वेळीं उज्जनीस माळवा राज्याचा सुभेदार होता. इसवी सनाच्या प्रारंभीं माळव्यावर चष्टपादि क्षत्रपांची सत्ता व नंतर मगधाच्या गुप्तांची सत्ता होती, असें सांची व उदयगिरीच्या शिलालेखांत आढळतें. इ. सनाच्या चवथ्या शतकाच्या मध्यभागीं समुद्रगुप्तानें मालवांचा पराभव केल्याचा उल्लेख अलाहाबादच्या स्तंभ लेखांत आढळतो. गुप्तघराणें मोडल्यानंतर कांहीं वर्षांनीं हूणांचा (मिहिरगुलादि) अंमल माळव्यावर बसला. परंतु मिहिरगुलाच्या फार जुलमामुळें बंड होऊन स. १५१० त यशोवर्म्यानें हूणांनां कायमचें हांकलून दिलें. नंतर सम्राट हर्षानें माळवा घेतला. विष्णुवर्धन-यशोवर्मा नामक उत्तर हिंदुस्थानच्या राजानें माळवा काबीज केला, व इ. स. ७३८-३९ त माळव्याचा उत्तरभाग मौर्य घराण्यांतील धवल राजाच्या ताब्यांत होता; परंतु मध्यंतरीचा इतिहास चांगलासा उपलब्ध नाहीं. त्यावेळीं पूर्व व पश्चिम माळवा अशीं दोन राज्यें स्वतंत्र होतीं. पूर्वमाळव्याचा राजा देवगुप्त याचा उल्लेख (६००) आढळतो. हा ठाणेश्वरच्या राज्यवर्धनाचा समकालीन होता. पश्चिम मालवराज, नरवर्मा व विश्ववर्मा यांचे उल्लेख ४२३ च्या सुमाराचे आढळतात. पुढें परमार कृष्ण (उपेन्द्र) राजानें आपला वंश स्थापन केला (त्याची माहिती 'परमार घराणें' ज्ञा. को. वि. १७ पहा). पुराणकाळीं या देशाचें नांव अवंती असून राजधानीहि अवंती (उज्जैनी) होती असें बौद्धवाङ्मयावरून दिसतें. गौतमाच्या वेळच्या हिंदुस्थानांतील १६ मोठया राज्यांपैकीं हें अवंतिराज्य होतें. परमार घराण्यानें धार ही राजधानी केली. ह्युएनत्संगानें दिलेली माळव्याच्या राजधानीची दिशा व अंतर हीं दोन्हीं चुकलीं आहेत. बौद्धधर्मासंबंधीं विद्येचे फार प्रसिध्द असे प्रांत मगध आणि माळवा हे दोन होत असें ह्युएनत्संग लिहितो.
माळव्याचे सुलतानः- गुलाम घराण्यांतील सुलतान अल्तमष यानें १२२६ सालीं माळवाप्रांत जिंकून दिल्लीच्या राज्यास जोडिला; व पुढें लवकरच त्यानें ग्वाल्हेर व उज्जनी हीं शहरें हस्तगत करून उज्जनी शहरांतील सर्व मंदिरे उध्वस्त केलीं. अशा प्रकारें माळवाप्रांत दिल्लीच्या अंमलाखालीं आला. दिलावरखान घोरी नामक फिरोजशहा सरदार माळव्यांत स्वतंत्र बनला. त्यानें मांडवगड ही आपली राजधानी केली (१४०१). दिलावर १४०५ सालीं मरण पावला. नंतर त्याचा पुत्र आलफखान उर्फ हुशंग घोरी हा तख्तावर बसला. तो फार लोकप्रिय होता. हिंदु लोकांस न दुखवितां सर्वांस त्यानें ममतेनें वागविलें. त्यानें हुशंगाबाद हें शहर स्थापिलें. १४३८ सालीं बहामनी सुलतान अहंमदशहा यानें हुशंगचा पराभव केला. हुशंग १४३२ सालीं मरण पावला. नंतर त्याचा पुत्र महंमद गज्नीखान गादीवर बसला; परंतु त्याचा वजीर महंमूदखान खिलजी यानें त्यास ठार मारून तख्त बळकाविलें (१४३६). याप्रमाणें माळव्याच्या घोरी वंशाचा शेवट होऊन खिलजी लोकांचा अंमल सुरू झाला. महंमूद खिलजी हा शूर व चतुर होता. त्यानें आपल्या राज्याची उत्तम व्यवस्था ठेविली. रजपूत राजांशीं व बहामनी सुलतानांशीं ह्याचे एकसारखे झगडे चालू होते. तो सन १४७५ मरण पावला. त्यानें अनेक इमारती बांधल्या. हिंदु लोकांस त्यानें त्रास दिला नाहीं. त्याच्या पश्चात त्याचा पुत्र ग्यासुद्दीन हा सुलतान झाला. त्याला राज्यकारभाराचा चांगला अनुभव होता. त्यानें शांततेनें राज्य केलें. तो १५०० सालीं मृत्यु पावल्यानंतर नसिरुद्दीन हा तख्तनशीन झाला. तो १५१० साली मरण पावला. नंतर त्याचा मुलगा दुसरा महंमूद हा गादीवर बसला. त्यानें सर्व राज्यकारभार मेदिनीराय नामक रजपूत सरदाराकडे दिला. परंतु पुढे या दोघांचें वितुष्ट पटल्यामुळें मेदिनीरायानें मेवाडाच्या संगराण्याची मदत मागितली. नंतर संग राणा व सुलतान महंमूद यांची लढाई होऊन, सुलतान रजपुतांच्या हाती सांपडला; परंतु संगानें त्याचा सन्मान करून त्यास परत पाठविलें. १५२५ सालीं गुजराथच्या बहादूरशहानें माळव्यावर स्वारी केली; त्यांत महंमूद मारला जाऊन माळवा प्रांत गुजराथच्या राज्याला जोडला गेला. अशा प्रकारें माळव्याच्या स्वतंत्र राज्याचा शेवट झाला (१५२६). बहादूरशहा पळाल्या नंतर इसवी सन १५४० पासून १५६२ पर्यंत येथें सूरी घराण्याचें वर्चस्व होतें. १५६५ मध्यें बाझवहादराचा अकबरनें पराभव केल्यापासून माळवा हा एक मोंगल सुभा झाला. मोंगलांच्या कारकीर्दीत मोंगल आपलें सैन्य दिल्लीहून दक्षिणेंत ज्यामार्गानें नेत असत तो मार्ग माळव्यामधून असल्यामुळें माळव्याला बरेंच महत्त्व आलें. पुढें, माळव्यांत इसवी सन १४४३ त मराठयांचें वर्चस्व स्थापित झालें. अजूनहि शिंदे, होळकर वगैरे मराठे सरदारांच्या राज्यांत यांतील बराच भाग आहे. इसवी सन १७८० पासून पुढें जवळ जवळ २५वर्षे माळवा म्हणजे इंग्रज मराठे, व मुसुलमान यांची समरभूमीच होऊन बसली होती. शेवटीं इसवी सन १८१८ त येथें इंग्रजीचें आधिपत्य कायम झालें.