विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माशी- कीटकवर्गांतील एक कीटक ('कीटक' पहा). षट्पाद व पक्षक्तच् कीटकवर्गांत हिची गणना होते. माशीला दोन पंख असून बारीक केंसासारखे दोन तोलक असतात. या तोलकांमुळें तिला आपली गति संभाळतां येते. पंखांमध्यें शिरा असतात. माशीचे डोळे पैलूदार असतात, व हे पैलू सुमारें चारशेंपर्यंत असतात. माशीचें डोकें वर्तुळाकार असतें. हिचें वास्तव्य सर्व प्रदेशांत आढळतें. हिची प्रसवशक्ति फार मोठी असते. एका ठिकाणाहून दुसरीकडे रोगोत्पादक जंतू ही नेत असल्यामुळें तिच्या प्रतिबंधार्थ पाश्चात्य देशांत प्रयत्न चालू आहेत. माशीचे अनेक प्रकार आहेत, त्यांपैकीं साधी माशी, गोमाशी, गांधीलमाशी, मधमाशी, सोनमाशी इत्यादि प्रमुख प्रकार होत. मधमाशी अगर गांधीलमाशीचे पंख त्वचेसारखे पातळ असून त्यांतील शिरा, थोडया पण मोठया असतात, कमर बारीक असते. गोमाशीचा घोडयांनां व बैलांनां फार उपद्रव होतो. गोमाशा जनावरांच्या शरीरांत व केंसावर आपली वस्ती करतात व त्या ठिकाणींच अंडींहि घालतात. मधमाशीसंबंधीं स्वतंत्र लेख पहा.