विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माल्थस, थॉमस रॉबर्ट (१७६६-१८३४)- एक इंग्रज अर्थशास्त्रज्ञ. हा एका जमीनदाराचा मुलगा होता. प्राथमिक शिक्षण घरींच झाल्यानंतर तो केंब्रिज विश्वविद्यालयांत दाखल झाला. गणित विषयांत त्यानें रँगलरची पदवी संपादन केली व नंतर त्याला जीझस कॉलेजमध्यें शिष्यवृत्ति मिळाली. पुढें त्यानें सर्व यूरोपखंडभर प्रवास करून निरनिराळया लोकांच्या आचारविचारांचें सूक्ष्म ज्ञान करून घेतलें. १७९८ सालीं त्याचा 'एसे ऑन पॉप्युलेशन' (लोकसंख्येवर निबंध) हा ग्रंथ बाहेर पडला. 'लोकसंख्या ही भूमितिश्रेढीनें वाढत असून, निर्वाहाचीं साधनें मात्र अंकगणितश्रेढीनें वाढत आहेत' तेव्हां वाढत्या लोकसंख्येला पुढें पोटापाण्याचीं साधनें भरपूर मिळणार नाहींत असें त्यानें या ग्रंथांत प्रतिपादन केलें आहे. पण अलीकडच्या अस्तित्वांत आलेल्या निरनिराळया निर्वाहाच्या साधनांची कल्पना त्याला आली नाहीं म्हणून त्यानें तसें चुकीचें विधान केलें; व त्यामुळें त्याच्यावर पुष्कळ अनुकूल व प्रतिकूल टीका झाल्या. माल्थस हा पुष्कळ वर्षे हेलीबेरी येथें राजनीतिशास्त्राचा प्रोफेसर होता. त्याचें खाजगी वर्तन अत्यंत चोख होते.