विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माल्टा- माल्टीज द्वीपसमूहांत माल्टा हें सर्वांत मोठें आहे. हें बेट १७॥ मैल लांब व ८॥ मैल रुंद आहे. मजबूति तटबंदी व सुंदर नैसर्गिक बंदर यामुळें हें भूमध्यसमुद्रावरील व्यापाराचें महत्त्वाचें ठिकाण झालें आहे. आगबोटीचें कोळसा घेण्याचें माल्टा हे मुख्य ठिकाण आहे. येथील हवा बहुतेक वर्षभर समशीतोष्ण व निरोगी असते. येथील सर्व साधारण वार्षिक उष्णमान ६७ अंश असतें. माल्टाचे लोक फिनिशियन वंशाचे असून ते फिनिशियन माल्टीज भाषा बोलतात. लोकसंख्या (१९२१) २२४६८०.
व्या पा र धं दे.- येथील मुख्य धंदा शेतकीचा आहे. १९२३-२४ सालीं या बेटांत ४२९५० एकर जमीन लागवडींत होती. गहूं, मका व जव हीं धान्य पिकें येथें मुख्य असून कापूस, बटाटे, संत्रीं वगैरेंहि येथें होतात. येथें फीत, कापड व सिगारेट तयार होतात. मच्छीमारीचाहि धंदा बराच चालतो. देशांत ७॥ मैल लांबीचा आगगाडीचा रस्ता आहे. येथील चलनी नाणीं इंग्लिश आहेत.
रा ज्य व्य व स्था.- माल्टा ही बादशाही (क्राऊन) वसाहत असून हायकमिशनर व मुख्य लष्करी अंमलदार यांच्या हातीं महत्त्वाच्या प्रश्नांचा निकाल लावण्याचें असतें. इतर सत्ता लष्करी गव्हर्नराच्या हातीं असते. कार्यकारी व कायदेमंडळ आहे. राज्यव्यवहाराची भाषा इंग्रजी असून कोर्टाची इटालियन आहे. येथें एक विश्वविद्यालय असून त्याला जोडलेल्या दुय्यम शिक्षणाच्या शाळा २ व धंदेशिक्षणाच्या शाळा ७ आहेत.
इ ति हा स.- हें बेट फिनिशियन, ग्रीक, कार्थेजिअन आणि रोमन लोक यांच्या हातांतून एकामागून एक गेल्यावर ८७० सालीं अरबांनीं जिंकून घेतलें. स. १०९०-१५३० पर्यंत हें सिसिलीला जोडलेलें असे. पुढें सेंटजॉनच्या सरदारांकडे याचा ताबा आला. स. १७९८ त नेपोलियननें त्यांनां हांकून लाविलें पण १७९८-१८०० या अवधींत ब्रिटिश आरमारानें याला वेढून टाकिलें होतें. स. १८१४ त माल्टीज लोकांच्या संमतीनें ही ब्रिटिश क्राउन कॉलनी करण्यांत आली. ब्रिटिश साम्राज्याला भूमध्यसमुद्रांत याचें फार महत्त्व आहे. पुराणवस्तुसंशोधनाच्या दृष्टीनेंहि माल्टीज बेटें महत्त्वाचीं आहेत. १८१८-२० च्या दरम्यान टारक्सीन येथील प्रागैतिहासिक कालांतील देवालयांचें संशोधन करण्याचें काम सुरू झालें. प्यूनिक व रोमन थडगी राबटजवळ बरींच सांपडलीं. घरदलमच्या गुहेंत नीएँडर्थल कालांतील मनुष्यप्राण्याचा दांत व हिपॅपोटेमस व हत्ती यांचे अवशेष सांपडले आहेत.