विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मालोजी- हा शिवाजीचा आजा; याच्या चरित्रास बखरीखेरीज दुसरा फारसा आधार नाहीं. याचा बाप बाबाजी भोंसला, त्याला राजा ही पदवी होती. मालोजीचा जन्म इ. स. १५५० त वेरूळ येथें झाला. बाबाजी हा निजामशाही सरदार होता, त्याच्या म्हातारपणी त्याच्या पथकाची सरदारी मालोजीस मिळून, तो लुखजी जाधवराव (हा फार मोठा सरदार असल्यानें) याच्या दिमतीखालीं नेमला गेला (१५७७). मालोजी तोलदार सरदार असल्यानें त्याला फलटणच्या वणगोजी निंबाळकर नायकानें आपली बहीण दीपाबाई ही दिली. मालोजीनें १५७७ ते १५९९ पर्यंत विशेष कामगिरी केल्याचें आढळत नाहीं. या धामधुमीच्या काळांत मालोजी वेळ येईल तसें वागून आपली जहागीर बचावून असे. मूर्तुजानें मात्र इमादशाही व खानदेशची फरुक्शाही डबघाईस आणली, त्यावेळीं मालोजीनें बराच पराक्रम गाजविला असावा. त्यासाठींच त्याला खानदेश व वेरूळ प्रांतांत जहागीर मिळाली असावी. मालोजीस बरेच दिवस संतति न झाल्यानें, त्यानें नगरच्या शहाशरीफ यास नवस केला व पुढें त्याला दोन पुत्र झाल्यानें त्यानें त्यांची नांवें शहाजी व सरीफजी अशीं ठेविलीं (शहाजी पहा.) मालोजीचा मेहुणा वणगोजी यानें विजापूरकरांच्या मुलुखांत कर्हाड-कोल्हापुरापर्यंत धुमाकूळ घातल्यानें, त्याच्यावर आदिलशाही फौज आली असतां, मालोजीनें मोठा पराक्रम करून तिचा पराभव केला. त्यामुळें निजामशहानें मालोजीचा गौरव करून त्याला जास्त मनसब दिली. यामुळें तो लुखजीच्या तोलदारीचा झाला. हा सरंजाम म्हणजे राजे ही पदवी, पंचहजारी, पुणें चाकण, सुपें, इंदापूर हे परगणे व तेथील देशमुख्या आणि रहाण्यास शिवनेरीचा किल्ला इतका होता (१६०३). अर्थात बरोबरीचें घराणें मिळाल्यानें लुखजीनें जिजाई शहाजीस दिली. या लग्नानंतर १५।१६ वर्षांनीं मालोजी वारला. पण मागीलप्रमाणें या काळांतहि त्यानें काय केलें त्याची माहिती आढळत नाहीं. त्यानें दानधर्माचीं कृत्यें बरींच केली. शिंगणापूरचा महादेव हा भोसल्यांचा कुलदेव असून शिखरावर पाण्याची टंचाई असल्यानें तेथें त्यानें एक मोठा तलाव बांधला आणि वेरूळच्या (१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक) घृष्णेश्वराच्या देवालयाचा जीर्णोद्धार केला, या गोष्टी त्याच्या परोपकाराच्या कृत्यांपैकीं सांप्रत आढळून येतात. मालोजी इ. स. १६२० मध्यें वारला. (शेडगांवकर, चिटणवीस, शिवदिग्विजय बखरी; डफ; राजवाडे- खं. १५; खरे- मालोजी व शहाजी)