विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मालिआ- मद्रास इलाख्यांत गंजम जिल्ह्याच्या पश्चिमार्धांत हा एक उंचवटयाचा भाग आहे. क्षेत्रफळ ३५५१ चौरस मैल. या भागांत पूर्व घाटावरील व पूर्वघाटालगतच्या मुलुखाचा समावेश होतो. या भागाचा राज्यकारभार चालविण्यासाठीं एक सिव्हिल सर्व्हंट मद्राससरकार नेमितें. त्या अधिकार्यास एजंट टु दि गव्हर्नरचे अधिकार असतात. येथील लोक फार रानटी स्थितींत आहेत. या लोकांस शेती चांगली कशी करावी हें ठाऊक नसल्यामुळें, दर तीन वर्षांनीं जंगल जाळून शेतीसाठीं नवीन पट्टया तयार करतात. बहुतेक जमीन लष्करी जाहागिरीच्या पद्धतीवर वांटली आहे. प्रत्येकास मालिआह असें म्हणतात. लोकसंख्या सुमारें तीन लाख असून या भागांत १९२६ खेडीं आहेत.