विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मालवण- मुंबई. रत्नागिरी जिल्ह्यांतील एक तालुका. क्षेत्रफळ २३८ चौरस मैल. यांत खेडीं ५८ आहेत. लोकसंख्या एक लाखावर आहे. देवगड, आचरा व मालवण ही बंदरें तालुक्यांत आहेत. मालवण हे तालुक्याचें मुख्य गांव असून तें समुद्रकिनार्यावर आहे. त्याजवळ पद्मगड नांवाचें एक बेट असून त्यावर शिवाजीनें सिंधुदुर्ग नांवाचा किल्ला बांधिला होता. येथें शिवाजीची एक प्रतिमा आहे तिची लोक पूजा करतात मालवण हें चांचेगिरीचें आगर होते. १८१२ सालीं कोल्हापूरकराकडून मालवण इंग्रजांस मिळालें. त्यावेळीं चांचेपणास कायमचा आळा पडला. येथें चाकू, कात्र्या होतात.