विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मार्सेलिस- फ्रांन्स, दक्षिण भागांतील एक शहर व भूमध्यसागरावरील मुख्य बंदर लोकसंख्या (१९२१) ५८६३४१ येथें प्राणिसंग्रहालय व पदार्थसंग्रहालय आहे. येथील कांहीं मंदिरें फ्रान्स देशांत सर्वोत्कृष्ट गणलेलीं आहेत. येथें पहिल्या प्रतीच्या न्यायकचेर्या व व्यापारी न्यायकचेर्या, वणिकसभा, दलालमंडळ व फ्रान्सच्या पेढीची शाखा ह्या संस्था आहेत. येथील विद्याखात्यांतील शास्त्रशाखा, औषधी व वैद्यकशाळा व कायदेशाखा मिळून एक्स-मार्सेलिसच्या विश्वविद्यालयाचा एक हिस्सा होतो. याशिवाय गायनशाळा वगैरे इतर शाळाहि आहेत. येथें साबू यार करण्याचे ५० वर कारखाने असून त्यांस लागणार्या तेलाचे कारखानेहि आहेत. येथें मेणबत्त्याहि तयार करतात व लोखंड गाळण्याची भट्टी, बाष्पयंत्र व आगबोटी बांधण्याचे कारखाने असून आगपेटया सारखे लहान सहान धंदेहि चालतात.