विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मॉरिशस- हिंदी महासागरांतील एक बेट. हें मादागास्करच्या पूर्वेस ५०० मैलांवर आहे. क्षेत्रफळ ७२० चौरस मैल व लोकसंख्या (१९२१) ३८५०७४; पैकीं हिंदी २६५८८४ आहेत. सोळाव्या शतकांत पोर्तुगीजांनीं याचा शोध लाविला पण डच लोकांनीं प्रथम येथें वसाहत केली. १७१० सालीं फ्रेंचानीं याचा ताबा घेतला. स. १८१४ च्या पॅरिसच्या तहानें हें ग्रेटब्रिटनकडे आलें. येथें एक गव्हर्नर असून तो कार्यकारी मंडळाच्या मदतीनें या वसाहतींचा कारभार पहातो. दुसरें एक २८ सभासदांचें कायदेमंडळ असतें. पोर्टलुई (लोकसंख्या ५००००) हीं राजधानी आहे. येथें प्राथमिक शिक्षण मोफत आहे, पण सक्तीचें नाहीं. मोठा व्यापार साखरेचा आहे, येथून खोबरें व खोबरेल तेलहि परदेशीं रवाना होतें. १९२३ सालीं ४६५६१२९ पाँडांची निर्गत होती. या वसाहतीचें १९२२-२३ सालचें उत्पन्न सुमारें २३॥ कोटींचें होतें.
१९१९ सालच्या शांततापरिषदेच्या काळांत मॉरिशसमधील केओल जातीच्या लोकांनीं मॉरिशस हें फ्रांन्सला देण्यांत यावें याबद्दल चळवळ सुरू केली, तथापि त्या चळवळीला बहुमत विरुद्ध होतें, व १९२१ सालीं झालेल्या निवडणुकींत ब्रिटिशांकडेच मॉरिशस असावें असें म्हणणारे लोकच बहुमतानें निवडून आले.