विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माया- सर्व बाह्य जग असत् असून या जगाच्या बुडाशीं असणारें ब्रह्मतत्त्व तेवढेंच सत् अगर खरें आहे असें प्रतिपादन करणारें मत. ब्रह्मरूपी एका पदार्थालाच तेवढें खरें अस्तित्व आहे; दुसर्या कोणत्याहि पदार्थाला खरें अस्तित्वच नाहीं. या सर्व जगाचा ब्रह्मावरच भास होत आहे असें मायावाद्याचें म्हणणें आहे. पण जग हें मुळींच खोटें आहे असें जरी शांकरादि मायावाद्यांचें म्हणणें आहे तरी केवळ व्यावहारिकदृष्टया, जगांतील सर्व वस्तु खर्या आहेत असें त्यांचें मत नाहीं असें नाहीं. तथापि व्यावहारिकदृष्टया, या वस्तु जरी खर्या असल्या, उपाधिवेष्टित आत्म्याला सर्व वस्तु जरी खर्या वाटत असल्या तरी परमार्थाच्या दृष्टीनें त्या केवळ भासात्मक आहेत. उपाधीचें अनृतत्त्व पटून ज्ञान झाल्यावर त्या ज्ञानी पुरुषाला देखील त्यांचें असत्यत्व पटून येतें. त्रिगुणात्मक अविद्येच्या प्रभावानें या सर्व वास्तविक मिथ्या असलेल्या वस्तूं खर्या आहेत असें या मायावाद्यांचें थोडक्यांत म्हणणें आहे. हाच सिद्धांत त्यांनीं 'ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या जीबोब्रह्मैवनापरः' या सूत्रांत सांगितला आहे.
या मायावादाचा पुरस्कार मुख्यतः अद्वेतमतवाद्यांनीं केलेला आहे. पण तेवढयावरून तो अद्वैतमतवाद्यांनीच अगर श्रीशंकराचार्यांनींच नवीन काढला असें जें मानण्यांत येतें तें मात्र खरें नाहीं. मायावादाचें स्वरूप पद्धतशीर रीतीनें गौडपाद व शंकराचार्य यांनीं शास्त्रीय पद्धतीनें पुढें मांडलें हें मात्र नाकबूल करतां यावयाचें नाहीं. मायावादाची कल्पना खुद्द ॠग्वेदांत देखील अप्रत्यक्ष रीतीनें दृष्टीस पडते. 'एकंसप्रिद्वा बहुधा वदन्ति' या चरणावरून एकच तेवढें सत्य आहे व बाकीचें तेवढें असत्य होय असें ॠग्वेदांत म्हटलेलें आढळतें. माया हा शब्द ॠग्वेद, अथर्ववेद इत्यादि ग्रंथांत पुष्कळ वेळां आलेला आहे. पण हल्ली माया शब्दाचा वेदान्ती जो अर्थ करतात त्या दृष्टीनें मात्र त्याचा पूर्वी अर्थ करीत नव्हते. ॠग्वेदांत माया शब्दाचा कपट, दैवी शक्ति, प्रभाव असा चांगला व वाईट या दोन्ही दृष्टींनीं उपयोग केला जात असे. इंद्राला, मरुतांनां अगर मित्राला मायावी हें विशेषण ॠग्वेदांत लावण्यांत आलेलें आहे, त्याचप्रमाणें वृत्रादि असुरांच्या मागेंहि हें विशेषण जोडण्यांत आलेलें दिसतें. अथर्ववेदांत विराज्पासून माया उत्पन्न झाली व असुर लोक त्या मायेच्या कर्तृत्वावर अवलंबून रहातात असें म्हटलें आहे.
उपनिषद्वाङ्मयामध्यें श्वेताश्वतरोपनिषदामध्यें हा माया शब्द वापरण्यांत आला आहे. 'मायां तु प्रकृति विद्यान्मायिनं तु महेश्वरं। तस्यावयवभूतैस्तु व्याप्तं सर्वमिदं जगत्' या श्वेताश्वतरोपनिषदांतील श्लोकांत जग हें मायेचें कार्य आहे; तीच प्रकृति होय अशी कल्पना आढळते. पण तत्पूर्वीच्या उपनिषदांत माया हा शब्द जरी उपयोगांत आलेला नाहीं तरी ब्रह्म या जादुगाराचा माया हा नजरबंदी खेळ आहे ही कल्पना दृष्टीस पडते. गीतेंतहि मायावादाचें अस्तित्व दृग्गोचर होतें. पण या मायावादाला शास्त्रीय स्वरूप प्रथमतः गौडपादाचार्यांनीं आपल्या कारिकांत दिलेलें आढळतें, व त्या कारिकांच्या आधारें शंकराचार्यांनीं हा मायेचा सिद्धांत पूर्णावस्थेला नेऊन पोंचविला. या मायावादाचें खंडण करण्याचा शंकराचार्यांच्या मागून झालेल्या निरनिराळया धर्मपंथांच्या आचार्यांनीं प्रयत्न केला आहे, तथापि शेंकडा ७५ लोकांनां हें शंकराचार्यांचें मायामत अद्यापि ग्राह्य आहे असें आढळतें. मायावादाचें हें तत्त्व पाश्चात्य प्राचीन तत्त्वज्ञानापैकीं कांही तत्त्वज्ञानाच्या ग्रंथांमध्यें अपरिपक्व तर्हेनें कां होईना पण दृष्टीस पडतें. उदाहरणार्थ, प्लेटोनें आपल्या अनुभवाला येणार्या वस्तू खर्या नसून त्या खर्या वस्तूंच्या छाया असतात असें एके ठिकाणीं म्हटलेलें आहे, त्यांत मायावादाचेंच प्रतिबिंब दृष्टीस पडतें.