विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मायराणी (एक कुलधर्म)- हा शब्द माया ह्या शब्दापासून झालेला दिसतो. ह्या देवीचें देऊळ कोठेंहि आढळत नाहीं. परंतु, लोकांच्या देव्हार्यांत हिच्या नांवाचा एक टाक करून बसविलेला आढळतो. हा कुळधर्म म्हणजे वपन केलेल्या विधवेचें पूजन होय. अशी पूजन करून घेणारी विधवा क्वचित मिळते. अशी विधवा जेव्हां कधीं मिळेल तेव्हां हा कुळधर्म उरकून घेतात. विधवेस हळदकुंकू देतात तें ती आपल्या कपाळी लावते. गंधपुष्पादिकांनीं मस्तकावर तिचें पूजन करतात. लुगडें, खण व चांगली दक्षणा तिला देतात आणि जेवू घालून तिची रवानगी करतात. मायेचें जें स्वरूप वर्णन करतात त्यावरून कांहीं एक प्रकारच्या समजुतीनें ह्या 'मायराणी' ची उत्पत्ति झाली असावी.
तुकारामानें एके ठिकाणीं ''नव्हे जानाई जोखाई मायराणी म्हैसाबाई॥ माझा बळिया पंढरिराव जो ह्या देवांचाहि देव॥'' असा मायराणीचा उल्लेख केला आहे. ह्यावरून हा कुलाचार पुष्कळ जुना दिसतो. 'राजरा देवीची सवाष्ण' म्हणून एक असाच प्रकार जुन्नर, नगर, नाशीक वगैरे प्रांतीं आहे. (भा. इ. सं. मं. वार्षिक इतिवृत्त, १८३८)