विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मानससरोवर- हें अष्टकोनी आहे. याचे कोन आश्चर्य वाटण्याजोगे आहेत. याच्या वायव्येस कैलासपर्वत आहे. सर्वांत अधिक उंचीवर असलेल्या गोडया पाण्याचें हें आगर आहे. बौद्ध संस्कृत ग्रंथांत ज्यास अनवतप्त असें म्हणतात तेंच हें असावें असें कावागुचि म्हणतो. अनवतप्त हें ''आर्य बुद्ध- अवतंसकनाम महावैपुल्य सूत्र'' या संस्कृत व जपानी ग्रंथांत वर्णिलें आहे.
अनवतप्त या सरोवराच्या मध्यभागीं सर्व रोगपरिहारक वृक्ष आहे.चार नद्या या सरोवरांतून निघतात. याच्या दक्षिणेस ''दक्षिण झेनबू'' नांवाचें द्वीप आहे. स्वर्गांतील पक्षी येथें येऊन गाणीं म्हणतात. पांचशें ॠषी कैलासावर असतात. येथें बुद्ध आमिताभाच्या स्वर्गांतील कमळासारखीं कमळें आहेत. असें वर्णन आहे. कावागुचि म्हणतो कीं ''झेनबू'' हें जंबुद्वीप असावें, आणि ''अनवतप्त'' हें मानस असावें. अनवतप्तांतून निघणार्या चार नद्या त्या सतलज, सिंधु, ब्रह्मपुत्रा, गंगा इत्यादि हिंदुस्थानांतील नद्या असाव्यात.
सरोवराचा परीघ २०० मैल असावा असें कावागुची म्हणतो आणि नकाशावर दिलेली मानससरोवराची आकृति चुकीची आहे असें त्याचें मत आहे. येथें नेपाळांतील हिंदु आणि विशेषेंकरून ब्राह्मण स्नान करतांना कावागुचीनें पाहिले. या सरोवरावर ''त्से को लो'' नांवाचें एक बौद्ध देवालय आहे.