विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मानवशास्त्र- मनुष्यप्राण्यासंबंधीं विवेचन करणारें शास्त्र. हें शास्त्र अत्यंत व्यापक असून त्यामध्यें अनेक पोटशास्त्रांचा अंतर्भाव होतो. मनुष्याची उत्पत्ति व विकास यांचें भौतिकदृष्टया विवरण करणार्या शास्त्राला भौतिक मानवशास्त्र असें म्हणतात. मनुष्यप्राण्याचे जे निरनिराळे वर्ग पडले आहेत त्यांसंबंधीं विचार करणार्या शास्त्राला मानववंशशास्त्र अशी संज्ञा आहे. या दोन्ही शास्त्रांचाहि मानवशास्त्र या व्यापक नांवांत समावेश होतो. त्याचप्रमाणें भाषाशास्त्र, प्राणिशास्त्र, शारीरशास्त्र, समाजशास्त्र याहि शास्त्रांचा मानवशास्त्रामध्यें अंतर्भाव होतो.
भौ ति क मा न व शा स्त्र.- भौतिक शोधांवरून शास्त्रज्ञांनीं बनविलेल्या प्राणिवर्गाच्या सोपानपरंपरेंत मनुष्यप्राण्याचें स्थान कोणतें, मर्कटादि मानवकल्प प्राण्याशीं मनुष्याचें कोणतें नातें आहे, मनुष्यप्राणि कसा उत्पन्न झाला, इत्यादि गोष्टींचें विवेचन हें भौतिक मानवशास्त्राचा विषय आहे. प्राणिशास्त्रवेत्त्यांनीं मनुष्य व इतर प्राणी याच्या शरीराचा सांगोपांग विचार करून मनुष्याला सस्तन प्राण्यांच्या कोटींत घातलें आहे. लिनियसनें आपल्या 'सिस्टिमा नाटयूरा' या ग्रंथामध्यें मनुष्य व माकड या दोघांनां 'प्रायमेट्स' मध्यें म्हणजे प्राण्यांच्या श्रेष्ठ वर्गामध्यें घातलें होतें, व त्याचाच अनुवाद, अर्वाचीन भौतिक मानवशास्त्राचे जनक डॉ. प्रिचर्ड यानीं आपल्या ग्रंथांत केला आहे. कूव्हिए नांवाच्या शास्त्रज्ञाच्या मतें 'प्रायमेट्स' चे द्विहस्त व चतुर्हस्त असे दोन भाग पडतात व त्यांपैकीं पहिल्या भागांत मनुष्यप्राणि व दुसर्या भागांत मर्कट येतात. मनुष्यप्राण्यामध्यें व मर्कटामध्यें शरीररचनेच्या बाबतींत पुष्कळच साम्य आहे हें सर्व शास्त्रज्ञांनां मान्य झालें आहे. त्यांतल्या त्यांत गोरिला माकडाचें व मनुष्याचें, शरीररचनेच्या बाबतींत निकट साम्य आहे हीहि गोष्ट सर्वमान्य झाली आहे. या सर्वमान्य गोष्टीच्या आधारावर भर देऊन, मर्कटापासून माणसाची उत्पत्ति झाली असावी असें मत डॉर्विननें प्रतिपादन केलें. माकडापासून मनुष्याची विकासतत्त्वानें कशी वाढ झाली असावी या संबंधीं हक्स्लेनें गिबन, ओरँग, चिंपाझी, गोरिला, व मनुष्य यांच्या आकृतीची तुलना करून विवेचन केलें आहे, त्यावरून मनुष्यामध्यें व मर्कटामध्यें पुष्कळच साम्य आहे असें स्पष्ट दिसून येतें (मानव व मर्कट यांच्या शरीररचनेच्या साम्याबद्दल (ज्ञा. को. वि. ३, पृ. १९ पहा.) आधुनिक प्राणिशास्त्रज्ञांनीं 'प्रायमेट्स'चे 'लेम्यूरायडिया' व 'अँथ्रोपायडिया' असे दोन भाग पाडले आहेत. अँथ्रोपायडिया अँथ्रोपायडिया वर्गांत मर्कटाचा अंतर्भाव होतो व त्याचें माणसांशीं बरेंच साम्य आढळतें असें त्यांनीं प्रतिपादन केलें आहे. तथापि एवढयावरून माकडापासून मनुष्याची उत्पत्ति झाली असावी असें निर्विवादरीतीनें मानतां येत नाहीं, असें अलीकडचे शास्त्रज्ञ म्हणूं लागले आहेत. अशा रीतीनें डार्विनच्या सिद्धांतावर अलीकडे आक्षेप घेण्यांत येऊं लागले असून, अँथ्रोपायडियांपासून मनुष्य झाला नसून या दोघांचाहि पूर्वज जो मूलभूत प्राणि त्याच्यापासून या दोन्हीहि जातीची उत्पत्ति स्वतंत्र रीतीनें झाली असें मत पुढें येऊं लागलें आहे. मनुष्याचें व माकडाचें अनेक शारीरिक बाबतींत जरी साम्य असलें तरी इतर पुष्कळ गोष्टींत व कांहीं शारीरिक बाबतींतहि मनुष्याचें माकडापासून भिन्नत्व दिसून येतें व त्यामुळें मनुष्याची माकडापासून उत्पत्ति झाली असावी या सिद्धांताचें वैय्यर्थ दर्शविण्यांत येतें. उदाहरणार्थ, मनुष्य हा विचारशक्ति व स्पष्ट शब्दोच्चारणश या दोन्ही बाबतींत माकडापेक्षां फारच श्रेष्ठ दर्जाचा आहे. हें विभिनत्त्व कसें झालें यासंबंधीं डार्विन, हक्सले इत्यादिकांनां नीट उपपत्ति लावतां आलेली नाहीं. केवळ मेंदूच्या लहानमोठेपणामुळें मनुष्य व मर्कट यांच्यामध्यें एवढा बौध्दिक फरक पडला असें म्हणणें बरोबर होणार नाहीं. तात्पर्य, मनुष्याच्या प्राणिवर्गांतील स्थानासंबंधीं कोणतेंच निश्चित मत झालेलें नाहीं.
मनुष्याचा उत्पत्तिकाल:- ज्ञानकोशविभाग ३, पृष्ठ १९ – २३ पहा.
मनुष्याची उत्पत्ति:- मनुष्याच्या उत्पत्तीसंबंधानें दोन पक्ष झाले असून एक पक्ष उत्पत्तिवाद्यांचा आणि दुसरा परिणामवाद्यांचा आहे. या दोन्ही पक्षांच्या मतें, भूस्तरशास्त्राच्या प्रत्यक्ष प्रमाणामुळें, पृथ्वीच्या आरंभीं सर्व जाती एकदम होत्या हें त्याज्य ठरलें असून पूर्वीच्या व आंताच्या प्राणिजातीमध्यें, अनंतयुगेंपर्यंत निरनिराळें फेरफार झाले आहेत, व अशाच रीतीनें निरनिराळे फेरफार होत होत शेवटची सांखळी ही मनुष्यप्राण्याची झालेली आहे. आगॉसीझच्या शब्दांत सांगावयाचें असल्यास या जगामध्यें प्राण्याच्या परंपरेमध्यें प्रत्यक्ष उत्कर्ष होत आहे आणि तो उत्कर्ष म्हणजे इतर जातींचा मनुष्यजातीशीं होणारा वाढता सारखेपणा होय. परंतु या उभयपक्षीं मान्य असलेल्या गोष्टींनंतर पुढें या पक्षांमध्यें भेद दृष्टीस पडतो. उत्पत्तिपक्षाच्या मताचा आगॉसीझ असें म्हणतो कीं हा जो सारखेपणा व संबंध आपल्याला दृष्टीस पडतो, तो जन्यजनकत्वाचा संबंध नव्हे. किंवा इतर जातींतील परस्पर संबंधसुद्धा जन्यजनकसंबंध नसतो. उदाहरणार्थ, पॅलेओझोयिकयुगीन मासे हे द्वितीय युगांतील किडयाचे पूर्वज नाहींत अगर तृतीय युगांतील सस्तन प्राणी हे हल्लीच्या मनुष्याचे पूर्वज नाहींत. हा जो परस्परामध्यें सारखेपणा दिसतो तो परमेश्वरानें घडवून आणलेला आहे व भूस्तरशास्त्राच्या प्रत्यक्ष पुराव्यांनीं सिध्द झालेला हा संबंध घडवून आणण्यांत व शिवाय निरनिराळे प्राणी निर्माण करण्यांत परमेश्वराचा हेतु या पृथ्वीवर मनुष्याला उत्पन्न करावा हा होय. परंतु याविरुध्द परिणामवादी असें म्हणतो कीं या निरनिराळया परंपरांनीं उत्पन्न झालेल्या जातींत जन्यजनकत्वाचा संबंध दृग्गोचर होतो.
डार्विनच्या मतें 'केटर्हार्इन व प्लेटीर्हार्इन माकडांमध्यें जें पुष्कळ बाबतींत साम्य दिसतें तें स्वतंत्र उत्पन्न झालेलें नसून या साम्यावरून वरील दोन्ही माकडें एकाच जातिसामान्याची दिसतात. यावरून हें साम्य आनुवंशिक आहे असें म्हणणें भाग पडतें, आणि ज्याअर्थी वंशावळीच्या दृष्टीनें मनुष्यप्राणि हा केटर्हार्इन जातींत पडतो त्याअर्थी निःपक्षपातीपणानें आपणांस हें कबूल करणें भाग पडतें कीं मनुष्याचे पूर्वजहि माकडाची जात आहे. पण यावरून सर्वांचा पहिला जनिता जो परमेश्वर तो देखील माकडासारखा होता असें मात्र समजावयाचें नाहीं.
या दोन्ही पक्षांमधील तिसरा पक्ष मिव्हर्ट यानें काढला व त्याच्या मतें शरीरदृष्टया मनुष्य हा माकडापासून जन्यजनकत्वसंबंधानें होतो व मानसिक व बौद्धिक दृष्टया मनुष्यामधील आत्मतत्त्व परमेश्वर उत्पन्न करतो. परंतु हा मधला पक्ष कोणालाच मान्य झाला नाहीं. डार्विननें प्रतिपादलेलें मत जिकडे तिकडे सर्व लोकांनां पसंत पडल्यामुळें, माकडामध्यें व मनुष्यामध्यें सांखळी जोडणारी आणखी एखादी प्राण्याची जात असावी असा तर्क सुरू झाला. या तर्काला यश आलें नाहीं, तथापि कांहीं प्रस्तरावशेष हाडावरून मनुष्याचे निरनिराळे प्रकार असावेत व त्यांपैकीं कांही माकडाला जवळचे असावेत असें सिध्द झालें आहे. उदारहणार्थ, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी म्युझियगमध्यें मनुष्याची वाढ कशी झाली हें दाखविण्यासाठी निरनिराळया कवटया ठेवल्या आहेत, त्यांमध्यें, निएंदर्थल येथील कवटी व बेल्जममधील सापडलेली कवटी आहे. या दोन्ही कवटयांकडे पाहातां त्यांच्यामध्यें अनुक्रमानें गोरिला व कांहीं माकडांच्या कवटींत साम्य दिसून येतें. त्याप्रमाणें ऑस्ट्रेलियन लोकांतील रानटी जातींतील मनुष्याच्या कवटीमध्यें व गोरिलाच्या कवटींत बरेंच साम्य असतें असें हक्झले यानें सिध्द केलेलें आहे. तसेंच जावा बेटांत ट्रिनिल या गांवामध्यें डॉ. डयूबाय यानें एक जंघेंतील हाड व एक कवटी शोधून काढली. जंघेंतील हाड हें मनुष्याचें आहे असें सिध्द झालें व कवटी मात्र मनुष्य व मर्कट यांमधील एका जातीच्या प्राण्याची आहे असें डयूबायनें प्रतिपादन केलें परंतु यासंबंधी बराच मतभेद आहे.
मनुष्यजातीचे प्रकारः- मनुष्यजातीची विभागणी अनेक प्रकारांनीं करतात. त्या प्रकारांपैकीं कातडीच्या रंगावरून, डोळयावरून, केंसावरून, आणि डोळयाचा आणि केसांच्या रचनेवरून विभागणी करणें हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. उंचीवरून देखील मनुष्यजातीचे प्रकार कांहीजण ठरवितात; कांहीं अवयवांच्या आकारावरून ठरवतात. तरी पण कातडयाच्या रंगावरून, केंसावरून अगर कातडयावरून ठरविण्याचा जो प्रकार त्याच्या खालोखाल, कवटीची परीक्षा करून तीवरून विभागणी करणें हा महत्त्वाचा प्रकार आहे. कांही जबडयावरून वर्गीकरण करतात तर कांहीं मेंदूवरून ठरवतात, तथापि कातडीचा वर्ण, केसांची रचना व कवटीचा आकार या तीन गुणांस सर्वांनीं प्राधान्य दिलें आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. पण मनुष्याचें वैशिष्टय ज्यामुळें आहे त्या मानसिक गुणधर्मांच्या दृष्टीनें मात्र कोणीहि विचार केला नाहीं. तसें केल्यास मनुष्याचें आहे त्यापेक्षां अधिक सोपपत्तिक वर्गीकरण होईल असें वाटतें.
शिवाय मनुष्यांतील भेद दाखवण्याचे हे जे विशेष प्रकार ते देखील नेहमी बदलत असतात. एका नीग्रो जातीमध्येंच रंगामध्यें निरनिराळी मिश्रणें आढळून येतात, आणि अमेरिकन जातीकडे पाहिलें तर त्यांत देखील बांध्यामध्यें, चेहर्यामध्यें व कवटीमध्यें पुष्कळ भिन्नत्व दिसून येतें.
वर सांगितलेल्या शारीरिक गुणधर्मांच्या आधारें पुष्कळ शास्त्रज्ञांनीं मनुष्यप्राण्याचें वर्गीकरण केलें आहे. तरी पण निश्चित व समाधानकारक असें एकाचेंहि वर्गीकरण नाहीं. ब्लुमेनबाकच्या वर्गीकरणाप्रमाणें मनुष्यजातीचे, कॉकेशियन, मंगोलियन, एथिओपियन, अमेरिकन आणि मलायी असे पांच वर्ग पडतात. परंतु यामध्यें ऑस्ट्रेलियन आणि बुश्मेन या जाती पाहिजे होत्या त्या दिसत नाहींत. क्यूव्हिएनें पांढर्या
पिंवळया व काळया रंगावरून, कॉकेशियन, मंगोलियन व नीग्रो असे तीन वर्ग केले. परंतु हें अगर सेमिटिक, हॅमिटिक आणि जाफेटिक असें दुसर्या एकानें केलेलें वर्गीकरणहि बरोबर नाहीं. पिकरिंगनें मनुष्यजातीचे अकरा भाग पाडले आहेत. बोरी डी सेंटव्हिन्सेंटनें पंधरा व डेसमोलिनसनें सोळा भाग पाडले आहेत. सर्वांत समाधानकारक असें हक्सेलेनें मनुष्यजातीचे मुख्यतः ऑस्ट्रेलाईड, नीग्रोईड, मंगोलॉईड व ऍथोक्रॉईक असे चार वर्ग केले आहेत व त्याशिवाय मेलॉक्रोईक असा एक वर्ग केला आहे.
मनुष्याचें वर्गीकरण करीत असतां हे निरनिराळे वर्ग एकाच जातीचे निराळे वर्ग आहेत किंवा नाहींत हें ठरवण्याकरितां, दोन वर्गांचें मिश्रण होऊन त्यांपासून पुष्कळ प्रजा निर्माण होते किंवा नाहीं हा प्रश्न सोडवला पाहिजे. अनुभवान्तीं असें सिद्ध झालें आहे कीं यूरोपीयन आणि नीग्रो यांच्या मिश्रणापासून झालेला मुलॅटो हा वर्ग; यूरोपीयन आणि मूळचे अमेरिकन यांच्यापासून झालेला मेस्टिझॉम हा वर्ग आणि मूळचे अमेरिकन व नीग्रो यांच्यापासून झालेला झांबोज हा वर्ग- हे सर्व वर्ग नेहमीं उत्तम प्रजा निर्माण करतात. हे वर्ग म्हणजे जवळ जवळ पोटवर्गच असल्यानें, त्यांच्यामध्यें ज्या दोन मुख्य वर्गांचें मिश्रण असतें त्या प्रत्येक वर्गाचे कांहीं गुणधर्म यांच्यामध्यें दिसून येतात. काहींच्या मतें या सर्वच पोटवर्गामध्यें, पुष्कळ प्रजा निर्माण करण्याची शक्ति नसते. परंतु हें खरें नाहीं. या दोन वर्गांपासून होणारे पोटवर्ग, अशा दोन पोटवर्गांच्या मिश्रणानें होणारे दुसरे पोटवर्ग अशा रीतीनें अनेक पोटवर्ग निर्माण झालेले आहेत.
मनुष्यजातीचे अगदीं मूळचे असे जे थोडे वर्ग आहेत ते निरनिराळे कसे झाले हें ठरविणें फार अवघड आहे आणि या विषयाबद्दल दोन तट निर्माण झालेले आहेत. एका पक्षाच्या मतें हे निरनिराळे वर्ग एकाच मुख्य वर्गापासून झालेले आहेत व दुसर्या पक्षाच्या मतें, पूर्वीपासूनच या निरनिराळया जाती आहेत. पहिल्या पक्षाच्या मतें, एकाच मुख्य वर्गापासून परिस्थितीमुळें व हवामानामुळें निरनिराळे वर्ग झाले आहेत. परंतु हें मत फारसें संयुक्तिक नाहीं. कारण एकाच हवामानाखालीं नांदणारे बुश्मन आणि नीग्रो यांच्यामध्यें मुळींच साम्य दिसून येत नाहीं, उलटपक्षी एकमेकांपासून फार दूर रहाणारे ब्राझील व टेराडेलफ्यूगो यांतील लोकांत बरेंच साम्य आहे आणि तीन चार हजार वर्षे ईजिप्शियन, फोनेशियन, एथिओपियन या जातींमध्यें कांहींहि फेरबदल झालेला नाहीं. डाविर्न असें म्हणतो कीं, हल्लींच्या मनुष्यांतील निरनिराळया वर्गामध्यें पुष्कळ भिन्नता असली तरी सामुदायिक दृष्टीनें विचार केला असतां त्यांच्यांत शारीरदृष्टया व मानसिक दृष्टया बरेंच साम्य आहे असें दिसून येतें. अशा रीतीनें क्षुल्लक बाबतींत का असेना, ज्यावेळेस साम्य दिसून येतें त्यावेळेस या निरनिराळया वर्गांची एका मूळवर्गापासून उत्पत्ति झाली आहे असें म्हणणें भाग पडतें.
या पक्षावर एक महत्त्वाचा आक्षेप येतो व तो हा कीं आज तीन चार हजार वर्षें ज्यांच्यामध्यें फारसा फेरबदल झाला नाहीं अशा नीग्रो लोकांमध्यें किंवा दुसर्या वर्गामध्यें फार पूर्वी तरी हे दोनहि वर्ग एकाच मुख्य वर्गापासून झाले असें मानल्यास कसें अंतर पडलें? या आक्षेपाला वॅलेस यानें उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणतो कीं फार पूर्वी, मुख्य वर्गापासून हे निरनिराळे वर्ग उत्पन्न होण्याचें कारण, त्यावेळचे लोक मानसिक दृष्टया, अतिशय कोते असल्याकारणाने, परिस्थिति व हवामान यांविरुध्द त्यांनां टक्कर देतां आली नाही, तरी पण एकंदरींत मनुष्यजातीच्या वर्गाच्या उत्पत्तीबद्दल निश्चित असें कांहींच ठरवितां येत नाहीं. मानववंशाच्या वर्गीकरणसंबंधीचें अधिक विवेचन ज्ञानकोश विभाग ३ यांत (पान १९-२३) पहा.
भाषाशास्त्रः- भाषाशास्त्राचा मानवशास्त्राशीं काय संबंध आहे याचा विचार करूं लागल्यास असें आढळून येतें कीं मानवशास्त्रास तुलनात्मक भाषाशास्त्राचा उपयोग बराच होतो. मनुष्यजातीच्या सर्व वर्गांमध्यें एक प्रकारचें मानसिक साम्य असतें व हें मानसिक साम्य वागिंद्रियसाधारण्यामुळें व्यक्त होतें. ऐतिहासिक भिन्नत्व, वंशभिन्नत्व हें नंतर झालेल्या भाषेमधील फेरफारावरून व वाक्यरचनेवरून कळून येतें. एका भाषेंतील शब्द दुसर्या भाषेमध्यें संसर्गामुळें येतात आणि अशा रीतीनें सुधारणेच्या इतिहासावर प्रकाश पाडण्याला या शब्दांचा फार उपयोग होतो. दोन भिन्न जातींच्या लोकांचा परस्पराशीं संबंध आला असतां ते खुणामुळें परस्परांच्या मनांतील भाव व्यक्त करतात असें दिसून येतें. उदाहरणार्थ, एखाद्या मुक्या व बहि र्या मनुष्याला जेवण कर म्हणून सांगावयाचे असल्यास सर्व जातींच्या लोकांची समान खूणच दिसून येते, व विशेषतः रानटी जातींतील लोकांशीं बोलतांना ही पध्दत पुष्कळदां अंमलांत आणावी लागते. यावरून मनुष्यजातीमध्यें मानसिक साम्य किती आहे हें दिसून येईल.
आतांपर्यंत प्रचारांत असलेल्या भाषांचा विचार करता या सर्व निरनिराळया भाषांच्या मूळाशीं एकच भाषा असून नंतर त्या भाषेपासून निघालेल्या इतर भाषांमध्यें अनंत कालामुळें अतिशय अंतर पडलें असावें अगर प्रथमारंभींच भाषा निरनिराळया प्रकारच्याच असल्यानें त्यामुळें हल्लींच्या चिनी, संस्कृत, वगैरे भाषांमध्यें जें विलक्षण अंतर आहे तें पडलें असावें असे दोन पक्ष संभवतात. तथापि या भाषाशास्त्रावरून दोन जातींमधील वैधर्म्य सिद्ध करणें हें बरोबर होणार नाहीं; कारण ज्यू लोक त्यांची स्वतःची भाषा न वापरतां दुसर्यांची भाषा आपली मातृभाषा म्हणून वापरतात. तसेंच ज्यूइश-जर्मन भाषेमध्यें देखीलहि हिब्रू शब्दांचाच भरणा आढळून आला, तरी तुलनात्मक भाषाशास्त्राच्या आधारें ती जर्मन आहे असें दाखवितां येतें. तात्पर्य, भाषा हें एकच प्रमाण जातीचें निदर्शक म्हणून मानतां येत नाहीं. हेंच विधान आणखी कित्येक जातींच्या उदाहरणावरून सिद्ध करून देतां येईल. वेस्ट इंडीज बेटामध्यें रहाणार्या नीग्रो लोकांच्या भाषांमध्यें आफ्रिकन भाषेंतील शब्द फारच थोडे असून फ्रेंच व इंग्लिश शब्दच फार आहेत. हल्लीं मेक्सिकोमधील बहुसंख्याक लोक, त्यांची मूळची भाषा स्पॅनिश असून सुद्धां मेक्सिकन शब्दांनीं प्रचुर अशी भाषा वापरतात. शिवाय साधारणतः असा एक नियम आपल्याला आढळून येतो तो हा कीं एका राष्ट्रानें दुसर्या राष्ट्राला जिंकल्यावर, विजयी राष्ट्राच्या भाषेचें वर्चस्व बसून जित राष्ट्राची भाषा लुप्तप्राय होण्याच्या मार्गाला लागते. उदाहरणार्थ, इंग्लिश भाषेनें व जर्मन भाषेनें अनुक्रमें केल्टिक भाषेचें व जुन्या प्रशियन भाषेचें हळू हळू उच्चाटण केलेलें आढळतें. तात्पर्य, भाषा हेंच केवळ मनुष्यजातीचें वर्गीकरण करण्याचें साधन मानतां येत नाहीं.
सुधारणेची वाढः- सुधारणेच्या वरच्या टोंकाला असलेल्या व खालच्या टोंकाला असलेल्या लोकांमध्यें विस्तृत अंतर आहे तरी पण ह्या विस्तृत अंतरांतील सर्व अवस्थांची माहिती उपलब्ध असल्यामुळें आपणांला रानटी लोकांपासून तों सुधारलेल्या लोकांपर्यंत झालेल्या सुधारणांची संगतवार माहिती देतां येते.
रानटी लोकांमधील चरित्रक्रम जर आपण पाहिला तर आपणांला असंस्कृत अडाणी मनुष्यामध्यें व या रानटी लोकांमध्यें किती भयंकर अंतर आहे हें दिसून येतें. परंतु हाच रानटी मनुष्य त्याच्या पूर्वीच्या अत्यंत निकृष्ट स्थितींत असलेल्या मनुष्याहून किती सुधारला आहे हेंहि आपणांला थोडया विचारान्तीं दिसून येतें. ऑस्ट्रेलियन रानटी मनुष्य व ब्राझीलमधील रानटी इंडियन हा गोर्या लोकांच्या संसर्गानें थोडाफार आपोआप सुधारलेला होता. त्यांची निरनिराळया अविर्भावांनीं व्यक्त केलेली भाषा तात्त्विकदृष्टया आपल्या भाषेसारखीच आहे; फरक इतकाच कीं आपली भाषा शब्दप्रचुर व स्पष्टार्थनिदर्शक आहे. त्यांचीं हत्यारें, यंत्रें, झोंपडया, शिकारीचे प्रकार, गृहकृत्यें व समाजकृत्यें करण्याचे प्रकार, पूर्वपरंपरेबद्दल व गुरुजनांबद्दल आदर इत्यादि गोष्टी हि तात्त्विक दृष्टया आमच्यासारख्याच असून फक्त खालच्या दर्जाच्या आहेत. त्यांच्यामध्येंहि निरनिराळया कला, उद्योगधंदे असलेले दृष्टीस पडतात. अशा रीतीनें अत्यंत रानटी लोकांपेक्षां या रानटी लोकांची अधिक प्रगति आहे असें दिसून येईल. अशा रीतीनेंच सुधारणेची आस्ते आस्ते प्रगति झाली असें दाखवितां येईल.
ज्यामानानें ज्ञानाची अधिक व्याप्ति होईल व ज्ञानाचा, ठामपणा वाढेल, तसेंच ज्यामानानें कलाकौशल्याची सुधारणा, शेध व लोककल्याणाविषयीं कळकळ बाळगणार्या राजकीय संस्था व सामाजिक संस्था अधिक वाढत जातील, त्यामानानें सुधारणेचा प्रसार झपाटयानें होतो असा आजपर्यंतच्या इतिहासाचा बोध आहे. अशाच प्रकारानें पूर्वींच्या रानटी स्थितींतील लोकांची उन्नति होत गेली हें आपणांस उघड दिसतें. हें दोन गोष्टींवरून सिद्ध करून देतां येईल. प्रथम, या अडाणी लोकांमध्यें आपल्याला अशा काहीं गोष्टी आढळून येतात कीं त्याचा निकाल विकासाच्या तत्त्वानेंच लावतां येईल. उदाहरणार्थ, एखादी अवघड कला ही कालान्तरानें नामशेष होईल परंतु नेहमींच्या व्यवहारांतल्या गोष्टी नामशेष होण्याची भीति नाहीं. ऑस्ट्रेलियन अगर न्यूझीलंडच्या लोकांनां जर मातीचीं भांडीं तयार करण्याची विद्या अवगत असती तर त्यांच्यामध्यें ती दिसून आली असती. परंतु ज्याअर्थी ती त्यांच्यामध्यें ती दिसून येत नाहीं त्याअर्थी ज्यावेळेस ही विद्या अवगत झाली त्यापूर्वी हे तेथें रहात होते हें सहज दिसून येईल. तसेंच हातानें पीळ देऊन सूत काढण्याचे श्रम त्यांनीं, जर त्यांनां चाती ठाऊक असती तर, घेतले नसते. अशा रीतीनें या रानटी लोकांमध्यें देखील स्वतंत्र रीतीनें हळू हळू सुधारणा होत गेली हें सहज दिसून येईल. दुसरी गोष्ट ही कीं, 'योग्यतमातिजीवना' च्या तत्त्वानें प्रत्येक समाजामध्यें कांही जुन्या गोष्टी परंपरेच्या सामर्थ्यानें चालत आलेल्या आहेत. उदाहरणार्थ, इंग्लिश पाद्र्याच्या कोटावर जो एक मुकुटदर्शक आकार असतो तो पूर्वीं अशा प्रकारें प्रत्यक्ष मुकुट पाद्री वापरीत असत, त्याचा अवशेष आहे, व चिलखतें, सरदाराचीं सर्व आयुधें देखील आपण पूर्वी कोणत्या स्थितींत होतों याची निदर्शक म्हणून राहिलेली आहेत. अशा प्रकारच्या प्राचीन रानटी संस्कृतीपासून आतांपर्यंतच्या सुधारणेपर्यंत चालत आलेल्या कित्येक गोष्टीं दाखवितां येतील. हल्ली लोकांमध्यें धार्मिक बाबतींत कां होईना लांकडांच्या घर्षणानें पूर्वींच्या पध्दतीप्रमाणें अग्नि उत्पन्न करतात. तीच पध्दत यूरोपीय लोकांत देखील दिसून येते.
अशा रीतीनें सुधारणेचें तुलनात्मक अध्ययन केल्यानें आपणाला इतिहासाचें व्यापक ज्ञान होतें इतकेंच नव्हे तर सुधारणा कोणत्या तत्त्वावर होते, तीं तत्त्वें देखील आपल्याला कळून येतात. त्यांपैकीं सुधारणेच्या मुख्य दिशा म्हणजे पाषाणयुग, कांस्युग, लोहयुग यांमध्यें घडून येणार्या सुधारणा होत. पाषाणयुगामध्यें मनुष्य अगदीं रानटी अवस्थेंत होता असें दिसून येतें. आशिया व यूरोपमध्येंच मुख्यतः कांस्ययुग अस्तित्वांत होतें व नंतर पुष्कळ शतकांनीं लोहयुग अस्तित्वांत आलें. परंतु कांहीं ठिकाणीं म्हणजे पॅलिनिशियामध्यें, दक्षिण व मध्यआफ्रिकेमध्यें आणि अमेरिकेमध्यें कांस्ययुग न येतां एकदम लोहयुगालाच प्रारंभ झाला. ठोकळमानानें असें म्हणतां येईल कीं हीं तीन युगें अनुक्रमें, मनुष्याच्या अत्यंत रानटी स्थितीपासून तों सुधारलेल्या स्थितीचीं चिन्हें होत. दुसरी एक महत्त्वाची दिशा म्हणजे पूर्वीच्या लोकांनीं शिकारीचा अगर कोळयाचा धंदा सोडून शेतकीचा धंदा करण्यास सुरवात केली ही होय. या शेतकीच्या धंद्यामुळें अनेक उद्योगधंदे अस्तित्वांत आले आणि सामाजिक आणि राजकीय संस्था अस्तित्वांत आल्या. तसेंच पूर्वी एखाद्यानें गुन्हा केला असतां तो वैयक्तिक गुन्हा असा मानला जात असे, तो पुढें बदलून सामाजिक गुन्हा मानलां जाऊं लागला ही कायद्यामधील सुधारणा झाली. कौटुंबिक पध्दतीची वाढ होऊन, मोठया समाजाचा एक नियन्ता असणें आवश्यक झालें व त्यामुळें राजपद्धति अमलांत आली. या सुधारणेच्या बाबतींत, मुद्रणकलेचा इतका उपयोग झाला कीं मुद्रणकलेच्या अस्तित्वानेंच रानटी आणि सुधारलेली स्थिति यांमधील फरक बरोबर ओळखतां येऊं लागला असें म्हटलें तरी चालेल.
चतुर्थ युगांतील मनुष्याची स्थिति त्यानें केलेल्या दगडी हत्यारांवरून व दुसर्या कांहीं कलाकौशल्याच्या कामावरून आढळून येते. हाडावरचीं कोरीव कामें पाहिलीं असतां त्यावेळीं देखील कलाकौशल्याची वाढ बरीच झली होती असें दिसून येतें. दुसरीं कांहीं हत्यारें व त्यांच्यावर काढलेलीं हरणाचीं चित्रें देखील हेंच सिध्द करतात. तसेंच त्या युगांतील लोकांनां, घर्षणानें अग्नि उत्पन्न करण्याची कला अवगत होती व हाडाच्या सुया सांपडल्यानें त्यावेळीं कातडयाचीं वस्त्रें तयार केलीं जात होतीं असें दिसतें. विशेषतः चतुर्थ युगांतील दगडी हत्यारांचें या दृष्टीनें फार महत्त्व आहे, कारण या हत्यारांवरील कारागिरीवरूनच शास्त्रज्ञांनीं या युगाचे एक जुनें पाषाणयुग व एक नवें पाषाणयुग असे दोन भाग पाडले आहेत. या जुन्या पाषाणयुगांतील आऊतें अगदीं ओबडधोबड अशीं असत परंतु नवीन पाषाणयुगांतील हत्यारें हीं चांगलीं गुळगुळींत अशीं बनविलेलीं दिसतात, त्यावरून जुन्या पाषाणयुगांतील लोक जास्त रानटी होते असें दिसून येतें. हीच स्थिति टास्मानियामध्यें सांपडलेल्या हत्यारांवरून दृष्टीस पडते. तेथील लोक लांकडाचीं हत्यारें वगैरे बनवीत असत. त्यांनां धनुष्यबाण ठाऊक नव्हते. भांडयामध्यें भाजी शिजवण्याची पध्दत त्यांनां माहीत नव्हती. त्यांच्यामधील चित्रकला अगदींच हलक्या दर्जाची होती. सारांश, जरी पाषाणयुगासंबंधीं पूर्ण माहिती उपलब्ध नसली तरी पण जी कांहीं माहिती उपलब्ध आहे तीवरून त्यावेळचे लोक रानटी स्थितींत होते असें निश्चयानें म्हणतां येतें.
सारांश मानवशास्त्रामध्यें इतके अनेक विलक्षण शोध लागले आहेत कीं त्या सर्व शोधांनां पद्धतशीर रीतीनें संकलित करण्याची फार जरूरी आहे. नवीन शोधहि थोडेफार लागले आहेत, तथापि मनुष्याच्या प्राचीनत्वाबद्दलच्या, व उत्पतीबद्दलच्या पूर्वींच्याच कल्पना सध्याहि रूढ आहेत. या शास्त्रीय शोधांनीं असें सिद्ध केलें कीं, पाली व रूढी यांच्या साम्यावरून अगर कलाकौल्याच्या साम्यावरून दोन जातींत दूरचा कां होईल संबंध दाखवितां येतों असा जो पुरातन सिद्धांत तो चुकीचा आहे. प्रत्येक मनुष्याच्या अंगीं अशी उपजतच प्रवृत्ति आहे कीं ज्यायोगानें मनुष्य आपली सुधारणा करून घेतोच. अमेरिकन मनुष्यांमध्यें व यूरोपीय अगर आशियांतील मनुष्यामध्यें चालींचें साम्य असलें तरी त्यावरून असें मुळींच म्हणतां यावयाचें नाहीं कीं अमेरिकन लोकांनीं त्या चाली यूरोपीय अगर आशियांतील मनुष्यापासून घेतल्या. प्रत्येक मनुष्यामध्यें जें एक प्रकारचें मानसिक साम्य आहे त्यामुळें या निराळया कला स्वतंत्र रीतीनें उद्भवूं शकतात.
हिंदुस्थानांतील मानववंश:- हिंदुस्थानामध्यें मुख्यतः चार वंशांचे लोक आढळून येतात; (१) अनार्य अगर मूळचे रहिवाशी- गोंड, भिल्ल, द्राविडी वगैरे; (२) आर्यन; (३) आर्य व अनार्य यांच्या मिश्रणामुळें झालेले लोक व (४) मुसुलमान. १९०१ च्या हिंदुस्थानच्या खानेसुमारीपत्रकांत हिंदुस्थानांतील लोकांचे सात वर्ग करण्यांत आले आहेत ते म्हणजे (१) तुर्को-इराणियनवंशी लोक-बलुची, ब्रहुइ इत्यादि; (२) इंडो-आर्यनवंशी लोक; (३) शकद्राविडी वंशाचे लोक-कुणबी, मराठे वगैरे; (४) आर्य-द्राविडी वंशाचे लोक- चांभार, महार वगैरे; (५) मंगोल-द्राविडवंशी लोक- बंगाली, ब्राह्मण, कायस्थ वगैरे; (६) मंगोलाइडवंशी लोक- हिमालयवासी, नेपाळी, आसामी, वर्मी वगैरे व (७) द्राविडवंशी लोक. या वर्गांतील जातींची माहिती स्वतंत्र त्या त्या नांवाखालीं देण्यांत आलेलीच आहे. प्राचीन भारतीय लोकांच्या संस्कृतीचें सविस्तर विवेचन 'वेदविद्या' (ज्ञा. को. वि. २) व 'बुद्ध पूर्वजग' (ज्ञा. को. वि. ३) या विभागांत आढळेल.
[संदर्भग्रंथ;- प्रिवर्ड- नॅचरल हिस्ट्री ऑफ मॅन; हक्सलेमॅन्स प्लेस इन नेचर; टायलर- अर्ली हिस्ट्री ऑफ अँथ्रपॉलजी; कीन- एथ्नॉलजी; रॅट्झेल- हिस्ट्री ऑफ मनकांइड; डेनीकर-रेसेस ऑफ मॅन; डार्विन-डिसेंट ऑफ मॅन; रिपले-दि-रेसेस ऑफ यूरोप.]