विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मानभूम- बिहार ओरिसा, छोटा नागपूर विभागांतील एक जिल्हा. क्षेत्रफळ ४१४७ चौरस मैल. छोटा नागपूरच्या पठारापासून दक्षिण बंगाल्यांतील नदीमुखाच्या प्रदेशापर्यंत जी मोठी उतरण आहे तिची, हा जिल्हा म्हणजे पहिली पायरी आहे असें म्हटलें असतां चालेल. यांत झाडांचा बहुतेक अभाव असल्यामुळें उन्हाळा कडक भासतो. या जिल्ह्यांतून कासाई, दामोदर व तिच्या शाखा बराकर, सुवर्णरेखा, ढालकिशोर व सिलाई ह्या नद्या वहातात. यांत चुनखडी, पाटीचा दगड, अभ्रक व गोंडवन नांवाचा खडक सांपडतो. बराकर व राणीगंज विभागांत कोळसा सांपडतो. येथें कोठे कोठें गरम पाण्याचे झरे आढळतात. त्यांस गंधकाचा वास येतो. येथील रानांत सालईचीं झाडें फार असून त्यांत चित्ते, जंगली कुत्रीं, अस्वल हे प्राणी आढळतात. येथील नद्यांच्या कांठचा प्रदेश मळईचा असून त्यांत भाताचें पीक उत्तम येतें. येथील मूळचे रहिवाशी भूमि टोळींतले लोक होत. याचें मुंडा लोकांशीं बरेंच साम्य आहे, व हे मुंडा लोक म्हणजे जैनांच्या ऐतिहासिक कथांत वर्णिलेले वज्रभूमी लोकच होत असें सिद्ध करण्यांत येतें. प्राचीन काळच्या जैनांचे अवशेष पुरुलियाजवळ, आणि दामोदर व कासाई नद्यांच्या तीरावर मोडकळीस आलेल्या देवळांच्या रूपानें असलेले दृष्टीस पडतात. परंतु या भागाचा त्या काळचा इतिहास उपलब्ध नाहीं. मुसुलमानांच्या वेळीं या भागाला झारकंड अथवा जंगली मुलुख असें म्हणत असत.
पुराणवस्तुसंशोधनाच्या दृष्टीनें या जिल्ह्यांत पुष्कळ महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पलम, व चरी येथें जैन लोकांचे अवशेष सांपडतात. ब्राह्मणांच्या वेळचें शिल्पकाम पार व कन्नास येथें सांपडतें. दुसरे महत्त्वाचे प्राचीन अवशेष दलमी, बोराम व पाणचेट येथें सांपडतात.
जिल्ह्याची लोकसंख्या सुमारें १३ लक्ष आहे. या लोकांत महारोग व डोळयाचे आजार फार दिसून येतात. हे लोक राढी बोली नांवाची भाषा बोलतात. ती बंगालीची पोटभाषा आहे. बंगालच्या ब्राह्मणांच्या एका पोटजातीचें नांव राढी असें आहे. कोठें कोठें हिंदी व संताळी ह्या भाषा बोलतात. येथील लोकसंख्येंत हिंदु, मुसुलमान व प्राणिपूजक यांचा विशेष भरणा आहे. तेथील मूळ रहिवाश्यांपैकीं सध्यां येथें संताळ, भुमजी, कोरा, वावरी, डोम, राजवार, भुइया हे लोक मुख्यत्वेंकरून आढळतात. येथील शेती फक्त तांदुळाची आहे. राणीगंज व बराकर टापूंत कोळसा मुबलक सांपडतो. कोठें कोठें लोखंडहि सांपडतें. येथील रघुनाथपूर ठाण्यांत 'टसर' रेशमी कापड तयार होतें. जाडेंभरडें सुती कापड या जिल्ह्यांत सर्वत्र तयार होतें. येथें १८६६, १८७४, १८९७ या सालीं दुष्काळ पडले. त्यांत १८६६ सालचा दुष्काळ सर्व जिल्हाभर जाणवला. येथील शेंकडा ४ लोक साक्षर आहेत.