विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माध्यमिक- बौद्धधर्मांतील महायानपंथाच्या एका पोटपंथाचे अनुयायी. या पंथाला मध्यमक असें नांव आहे. या पंथाचा संस्थापक नागार्जुन होय. यानें या पंथाच्या तत्त्वज्ञानाची विवरणात्मक असा मूलमध्यमककारिका, अगर मध्यमिककारिका अगर मध्यमिक- सूत्रें नांवाचा ग्रंथ लिहिला व त्याच्यावर स्वतःच अकुतोभय नांवाची टीका लिहिली. याशिवाय बुद्धपलित व भवविवेक यांच्याहि या कारिकांवर टीका आहेत. चंद्रकीर्तीची मध्यमकावतार नांवाचीहि एक प्रसिद्ध टीका आहे. या पंथाचें मुख्य तत्त्व शून्यवाद होय. सर्व कांहीं शून्य आहे असें या पंथाचें म्हणणें आहे. सत्, असत्, सदसत्, व नसत्, नासत् या चार कोटींनीं रहित असें शून्य हेंच अंतिम तत्त्व आहे असें माध्यमिक म्हणतात. योगाचारपंथी बौद्ध बुद्धि अगर ज्ञान आहे असें तरी मानतात पण माध्यमिक हे बुद्धि देखील नाहीं असें मानतात. जें असत्स्वभावी आहे तें कोणत्याहि कारणानें उत्पन्न व्हावयाचें नाहीं कारण सशाला शिंगें कधींच उत्पन्न होणार नाहींत. बरें जे सत् आहे त्याची उत्पत्ति मानली तर उत्पत्तिकारणानें उत्पन्न झालेली वस्तूच उत्पन्न केली असें म्हणावें लागतें. तसेंच एकच वस्तु सत् व असत् आहे असें म्हणतां यावयाचें नाहीं. तात्पर्य, बुद्धीच्या साहाय्यानें पदार्थांचें निश्चित अनुमान करतांच येत नाहीं व करण्याचा प्रयत्न केला तर हे पदार्थच नाहींसे होण्याचा संभव आहे. तात्पर्य, सर्वच ज्ञेयाभावात्मक असल्याकारणानें विज्ञानाचा भाव देखील उरत नाहीं; म्हणून सर्व शून्य आहे असें माध्यमिकांचें म्हणणें आहे. या शून्यभावनेनेंच शून्यतारूप परनिर्वाण प्राप्त होतें असें यांचें मत आहे.