विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माधवाचार्य- हा प्रसिध्द ग्रंथकार यजुःशाखेंतील भारद्वाज गोत्रोत्पन्न बौद्धायनसूत्रीं ब्राह्मण होता. त्याच्या बापाचें नांव मायण व आईचें नांव श्रीमति असें होतें. सायण व भोगनाथ असे त्याचे दोन भाऊ होते. दारिद्र्याने वैतागून गेल्यामुळें त्यानें सन्यासाश्रम घेतला. संन्यासाश्रमीचें याचें नांव विद्यारण्यस्वामी होतें. हा विजयानगरच्या हरिहर व बुक्क या राजांचा प्रधान होता. विजयानगरचें राज्य स्थापण्यासाठीं त्यानें फार मदत केली त्यानें तसेंच, वैदिक धर्माचें व वैदिक ग्रंथाचें पुनरुज्जीवन केलें. आपला भाऊ सायणाचार्य याच्या हातून स्वतःच्या देखरेखीखालीं, संहिता, ब्राह्मणें, उपनिषदें, स्मृति, वेदागें इत्यादि ग्रंथांवर भाष्यें प्रसिद्ध केली. माधवाचार्यांचा हंपी येथें मठ असून तो शृंगेरीपीठाला जोडलेला आहे. माधवाचार्यांचा काल १४ व्या शतकांत असावा असें म्हणण्यास हरकत नाहीं.