विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माधवराव, सर टी. (तंजावर, १८२८--१८९१)- देशस्थ ब्राह्मण; जन्म कुम्भकोणम् येथें; शिक्षण मद्रास; १८४५ सालीं पदवी घेतलीं; कांहीं दिवस किरकोळ जागांवर नोकरी केल्यावर १८४९ त त्रावणकोरच्या महाराजांचे बंधु रामवर्मा यांच्या शिक्षकाच्या जागीं यांची योजना झाली; क्रमाक्रमानें १५५८ सालीं हे त्रावणकोरचे दिवाण झाले; त्रावणकोरांत यानीं बर्याच सुधारणा केल्या; १८६५ सालीं के. सी. आय. ई. किताब मिळाला; पुढें महाराजांचें व यांचें कांहीं बाबतींत न जुळल्यामुळें १८७२ सालीं यांनीं दिवाणगिरीचा राजीनामा देऊन पेन्शन घेतली. व्हाइसरायांच्या कायदे कौन्सिलांत यानां सभासद नेमलें, पण तो मान यानीं नाकारला; १८७३ त इंदूर येथील दिवाणाची जागा पत्करली; तेथें दोन वर्षे उत्तम प्रकारें काम केल्यावर स. १८७५ त हे बडोद्याचे दिवाण व रीजंट झाले; बडोदें राज्यांत यानीं पुष्कळच सुधारणा केल्या; सयाजीरावास यानीं आस्थापूर्वक शिक्षण देऊन त्यानां चांगले सुशिक्षित व कर्तबगार बनविलें. १८७७ सालीं दिल्लीदरबारांत यानां 'राजा' हा किताब मिळाला; १८८२ सालीं यानीं बडोद्याच्या दिवाणगिरीचीं वस्त्रें खालीं ठेविलीं; माधवराव लेखकहि होते. यानीं कांहीं कविताहि केल्या आहेत; सामाजिक बाबतींतहि हे मन घालीत असत.