विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मादागास्कर- हिंदी महासागरांतील एक बेट. हें आफ्रिकेच्या आग्नेय किनाऱ्यापासून २४० मैलांच्या अंतरावर आहे. १८९६ सालापासून मादागास्कर ही फ्रेंच वसाहत आहे. हिची दक्षिणोत्तर लांबी ९८० मैल आहे व साधारण रुंदी ३६० मैल आहे. क्षेत्रफळ सुमारें २२४७२१ चौरस मैल आहे. मादागास्कर हा बहुतेक डोंगराळ प्रदेश आहे. बेटाच्या पूर्व बाजूस विस्तृत मैदानें आहेत. येथें पुष्कळ निवालेले ज्वालामुखी दृष्टीस पडतात. दरवर्षी भूकंपाचे थोडे धक्के बसतात. पुष्कळ ठिकाणीं उष्ण पाण्याचे झरे आहेत. मादागास्कर हें खनिज संपत्तीचें आगर आहे. सोनें हें बहुतेक सर्वत्र सांपडतें. कित्येक भागांत चांदी व प्लॉतिनम धातू सांपडली आहे. तांबे, झिंक, जस्त, निकल, मँगॅनीज इत्यादि धातूहि पुष्कळ ठिकाणीं सांपडतात. लाल, पुष्पराग, वैड्र्यमणी व दुसरीं पुष्कळ मौल्यवान रत्नेंहि सांपडतात. अगदीं आंतील भागाची हवा समशीतोष्ण आहे. पण किनाऱ्याची हवा मात्र अतिशय उष्ण आहे.
१९२१ सालीं या बेटाची लोकसंख्या ३३८२१६१ होती. एतद्देशीय लोकांनां 'मालागासी' असें म्हणतात. मादागास्कर जरी आफ्रिकन बेट असलें तरी त्यांतील गौरवर्णीय लोक मलायो-पोलिनेशियन वंशाचे असून कृष्णवर्णाचे लोक मेलानेशियन वंशापासून निघाले आहेत. मालागासी जातींत होवा, बेतसिलेओ, बेतसिमिसारक, तबल, सकलव व वरा या प्रमुख उपजाती आहेत. होवा ही प्रख्यात जात, सर्व जातीहून जास्त सुधारलेली व बुद्धिमान आहे. सबंध बेटभर या लोकांचीच भाषा बोलण्यांत येते. मालागासी लोकांची भाषा मृदु, मधुर, स्वरपूर्ण व कठोर कंठयवर्णांपासून मुक्त आहे. १८७७ सालीं गुलामांचा व्यापार नांवाचा बंद करण्यांत आला होता तथापि १८९६ सालीं मात्र तो कायद्यानें पुरा बंद करण्यांत आला.
मालागासी लोक मुख्यतः शेतकीचा धंदा करणारे आहेत. भाताची लागवड ते फार कुशलतेनें करतात. बायका विणकामांत फार हुशार आहेत. धातूंचीं कामें करण्यांतहि या लोकांची कुशलता दिसून येते. यांच्यांत कल्पक बुद्धि फार आहे. हे लोक, अनीतिमान, असत्य, भाषाणी, निर्दय अंतःकरणाचे व लढाईंत पाषाणवृत्तीचे आहेत. अगदीं अलीकडेपर्यंत यांच्यांत अनेकपत्नीत्वाची चाल होती आणि वाटेल तेव्हां वाटेल त्या रीतीनें काडी मोडून देण्यांत येई. तथापि या लोकांत बायकांचा दर्जा मोठा आहे. बेटाच्या कित्येक भागांत अजून बालहत्त्या होत असते. मदिरापानाचें व्यसन तर सर्वत्र आहे. या लोकांत सुसंघटित अशी धार्मिक संस्था अथवा संप्रदाय नाहीं. तथापि दैवी शक्ति म्हणून कांहीं तरी आहे असें ते मानतात. त्या शक्तीला ते झनाहारी अथवा विश्वकर्ता असें म्हणतात. या लोकांत सुंता करण्याची चाल असे. गुरें पाळणें, कातडे कमावणें, आणि रबर गोळा करणें हे येथील मुख्य उद्योगधंदे होत. रबर, कातडें व सोनें ह्या वस्तू बाहेरदेशीं व्यापाराकरितां पाठविल्या जातात. तांदूळ, दारू, धातूचीं कामें, व कापड हीं बाहेरदेशांतून या ठिकाणीं येतात. १९२२ सालीं मादागास्करमधून ५२९८८९९ पौंडांच्या मालाची निर्गत व ६९५३२६४ पौंडांच्या मालाची आयात झाली. १९२२ सालीं मादागास्करचें उत्पन्न ९६४०३९०६ फ्रॅक व खर्च ९०२५९४५६ फ्रॅक होता.
मादागास्कर हीं फ्रेंच वसाहत आहे. मादागास्करचा राज्यकारभार पहाण्यासाठीं एक कारभारी मंडळ असतें. वसाहतीला फ्रेंच पार्लमेंटमध्यें आपले प्रतिनिधी पाठवण्याचा अधिकार नाहीं. सन १९१८ च्या जाहीरनाम्यानें या वसाहतीचे २४ प्रांत व ७५ जिल्हे पाडण्यांत आले आहेत. या प्रांतांवर व जिल्ह्यांवर कारभारीमंडळांतील एक एक माणूस नेमला जातो. एतद्देशीयांनां अधिकाराच्या जागा बऱ्याच देण्यांत येतात. स्थानिक कारभारांत होतां होईतों एतद्देशीयांनां स्वातंत्र्य दिलें आहे. प्रांतावर एतद्देशीयांनीं स्वतःचा निवडलेला गव्हर्नर असतो.
१७ व्या शतकाच्या मध्यच्या सुमारास सकलवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या युद्धविशारद लोकांनीं मादागास्करच्या पश्चिमेकडील अर्धभागांत रहाणाऱ्या रहिवाश्यांनां व उत्तरेकडील मध्यभागांतील जातींनां जिंकून, दोन राज्यें स्थापिलीं. त्यांचें वर्चस्व अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत टिकलें. यावेळीं होवा लोक पुढें येऊन त्यांनीं सकलवा लोकांनां बाजूस सारलें व आपण मादागास्करचे राजे होऊन बसले. फार पुरातन काळीं अरबानीं या ठिकाणीं वायव्य व आग्नेय किनाऱ्यावर आपल्या वखारी घातल्या. बेटाच्या वायव्य व पश्चिम भागांत यांच्या पुष्कळ वसाहती आहेत. या भागांत हिंदु लोकहि आहेत, कारण पूर्वीपासून मादागास्कर व हिंदुस्थान यांमध्यें बरेंच दळणवळण आहे. मादागास्कर येथें जाणारा पहिला यूरोपीय जलप्रवासी डायोगोडिआझ हा पोर्तुगीज गृहस्थ होय. त्यानें स. १५०० च्या आगष्टच्या १० व्या तारखेस बेटाच्या पूर्व किनाऱ्याचें निरीक्षण केलें. पोर्तुगीजांनीं येथें वसाहती करण्याचा फारसा प्रयत्न केला नाहीं. १७ व १८ व्या शतकांत बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर लष्करी ठाणी घालण्याचा फ्रेंचांनी प्रयत्न केला; पण अंमलदारांच्या जुलमी स्वभावामुळें फ्रेंचांनां त्रास सहन करावा लागून त्यांनां १९ व्या शतकांत बहुतेक ठाणीं सोडावीं लागलीं. मादागास्करचा खरा राजकीय इतिहास पहिल्या रादमच्या (१८१०-१८२८) अमदानीपासून सुरू होतो. हा मोठा धोरणी व शूर असा पुरुष होता. याच्या मरणानंतर याची बायको राना व्हॅलोना ही गादीवर आली. राज्यांत चाललेल्या मिशनरी चळवळींतला मिशनरी कावा तिच्या ध्यानांत येऊन स. १८३५ त तिनें ख्रिस्तोपसना कायद्यानें रद्द करविली व मिशनऱ्यांनां तसेंच सर्व यूरोपीयनांनां देशांतून हांकून लावलें. स. १८६१ त ही राणी मरण पावली व तिचा मुलगा दुसरा रादम गादीवर आला. यानें आपल्या घरांत मिशनऱ्यांनां व यूरोपियनांना फिरून वाट करून दिली. स. १८६३ त हा मारला गेला व याची बायको राज्यावर बसली. ती स. १८६८ त मेली व तिची चुलत बहीण दुसरी राना व्हॉलोना ही गादीवर आली. हिनें उघड रीतीनें ख्रिस्ती धर्मास मान्यता दिली व स्वतः आपल्या पतीसह ख्रिस्ती धर्म स्वीकारला. स. १८६५ च्या तहान्वयें ग्रेटब्रिटनच्या वकिलांनां बेटांतील ब्रिटिश प्रजाजनांवर राजकीय ताबा मिळाला.
इंग्रजांप्रमाणें फ्रेंचांचेंहि मादागास्करवर वर्चस्व स्थापण्याचे प्रयत्न चालले होते. स. १८४० त नॉझी-बे या बेटाच्या सकलबा राजाला त्यांनीं आपल्या ताब्यांत घेतला व त्या राज्यालगतच्या सर्व प्रदेशांवर ते आपला ताबा सांगूं लागले. तेव्हां फ्रेंच सरकार व एतद्देशीय मालागासी सरकार यांच्यांत युद्ध उपस्थित झालें. १८८५ सालीं तह होऊन मादागास्करचें सर्व परकीय राजकारण फ्रान्सच्या नेतृत्वाखालीं चालावें असें ठरलें. फ्रान्सचा रेसिडेंट राजधानींत ठेवण्याचेंहि या तहानें ठरलें. रेसिडेंटामागून रेसिडेंट दरबारांत येऊं लागले पण त्यांनां तेथें पाहिजे तसें वर्चस्व स्थापतां येईना. मालागासी राज्याचा प्रधानमंत्री फ्रान्सशीं फटकून वागे व ब्रिटिश अंमलदारांच्या साहाय्यानें तो आपल्या प्रजेस लष्करी शिक्षण देई. फ्रान्सला हें सहन न होऊन त्यानें मालागासी सरकारला एक निर्वाणीचा खलिता पाठविला व त्याचें उत्तर नाहीसें पाहून लढाईचें शिंग फुंकलें. स. १८१५ त त्यांनीं ॲन्टानानरीव्होवर तोफा डागल्या व तें शहर घेतलें. स. १८९६ मध्यें जिन लोकांनीं बंड केल्यामुळें ग्यालीएनी या सेनापतीला त्याचा बीमोड करण्यास पाठविण्यांत आलें. ग्यालीएनीनें संबंध बेटभर लष्करी कायदा पुकारून तेथील राजसत्तेचा व होवा लोकांच्या वर्चस्वाचा नाश केला व मादागास्कर फ्रेंच वसाहत आहे असें जाहीर केलें.
या ठिकाणीं 'लंडन मिशनरी सोसायटी,' 'दि फ्रेंडस मिशन,' 'दि नॉर्वेजियन ल्यूथरीन मिशन' व 'फ्रेंच मिशन' इत्यादी मिशनरी संस्था आहेत व त्यांनीं लोकांनां वाटण्याचें काम चालविलें आहे. होवा जातींत अर्ध्याहून अधिक लोक व इतर जातींतीलहि बरेचसे लोक खिस्ताळलेले आहेत. ८ ते १४ वर्षांपर्यंत सक्तीचें शिक्षण देण्यांत येतें. १९१८ सालीं येथें सरकारी शाळा ७४५ व खासगी ४३२ होत्या. फ्रेंच भाषा ही आवश्यक भाषा आहे. ॲटानानरिव्हो येथें वैद्यक, शेतकी, व व्यापार या विषयांच्या शाळा आहेत.