विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मातृकन्यापरंपरा– समाजांत ज्या अनेक प्रकारच्या कुटुंबपद्धती आढळतात, त्यांपैकीं अतिशय प्राचीन अशी ही पद्धति होय. या पद्धतीचा मुख्य विशेष असा आहे कीं हींत पुरुषवंशगणना नसून स्त्रीवंशगणना असते; म्हणजे एखाद्या माणसाचें नातें बापाकडून न गणतां आईकडून गणण्यांत येतें. संमिश्र स्त्रीपुरुषव्यवहार व 'संघलग्न' पद्धति (ज्या पद्धतींत सर्व संघाच्या मिळून बायका असतात ती पद्धत; इंग्रजीमध्यें त्याला ग्रुपमॅरेज अशी संज्ञा आहे) ज्या वेळीं अस्तित्वात होती त्यावेळीं ही पद्धति आचारांत आली असली पाहिजे असें दिसून येतें. संमिश्र स्त्रीपुरुषव्यवहार जेव्हां प्रचारांत असतो, त्यावेळीं अनेक पुरुषांचे एकाच स्त्रीशीं व्यवहारसंबंध घडून येत असल्यानें त्या बाईपासून होणारी संतति कोणापासून झाली हें निश्चित सांगतां येत नाहीं. अर्थात जेव्हां बाप हा अज्ञात असतो तेव्हां आईकडूनच संतति ओळखण्यांत येते व हल्लीं ज्याप्रमाणें अमक्याचा मुलगा असें आपण म्हणतो त्याऐवजीं अमकीचा मुलगा म्हणून म्हणण्याची चाल पडते. समाजांतील शेतकीसारख्या धंद्यांतील स्त्रीच्या वर्चस्वामुळें कांहीं ठिकाणीं ही मातृपरंपरापद्धति अस्तित्वांत आली असावी असाहि कित्येकांचा तर्क आहे.जेव्हां नवरा हा बायकोच्या घरीं जाऊन तिच्याशीं व्यवहारसंबंध करतो व इतर वेळां तो दुसरीकडे रहातो, तेव्हां त्याच्यापासून झालेल्या संततीवर मुख्यतः आईचीच सत्ता असते व त्यामुळें अशा जातींत मातृसत्ताकपद्धति निर्माण होतें असेंहि कांहीचें म्हणणें आहे. अशा प्रकारची पद्धति प्राचीन काळीं सर्वत्र अस्तित्वांत होती व अद्यापिहि ती क्वचित आढळून येते. प्राचीन काळीं आफ्रिका, सर्केशिया, हिंदुस्थान, तार्तरी, चीन, यूरोप व अमेरिका या सर्व ठिकाणीं ही चाल होती असें आढळून येतें. उपनिषद् कालींहि ही पद्धत अस्तित्वांत होतीसें दिसतें; उदाहरणार्थ, जाबाल ज्ञानकोश विभाग २, पृष्ठ १६६ पहा. कांहीं विद्वानांनीं असा एक आक्षेप काढलेला आहे कीं ही चाल हीनसंस्कृतीच्या लोकांमध्येंच प्रात: आढळून येते, तथापि अमेरिकेमध्यें हल्लीं उच्च संस्कृतीचे जे इरोकुओइस व पुएब्लो इंडियन लोक आहेत, त्यांच्यामध्यें अद्यापिहि ही पद्धति आढळून येते व त्यावरून वरील आक्षेपांत फारसे तथ्य आहे असें आढळत नाहीं. तात्पर्य, प्राचीन काळीं सर्वत्र मातृकन्यापरंपरापद्धतीच मुळांत अस्तित्वांत असून तिचें तिच्यानंतर पितृशासनपद्धतींत रूपांतर झालें असें म्हणावयास हरकत नाहीं. मातृकन्यापरंपरापद्धतींमध्यें मुख्यतः सहा मूलभूत गोष्टींचा समावेश होतोः- (१) या पद्धतीमध्यें आईच्या जातीवरून मुलाची जात निश्चित केली जाते, (२) स्त्रीवंशाकडून गणना होते, (३) मुलाला अगर मुलीला आईपासून वारसा मिळतो, (४) आईच्या समाजांतील दर्जावरून मुलाचा दर्जा ओळखला जातो, (५) कुटुंबामध्यें बापापेक्षां आईची सत्ता अधिक असते व (६) बायको नवऱ्याच्या घरीं रहावयास न जातां नवरा बायकोच्या घरीं रहावयास जातो. या लक्षणांमधील पांचव्या लक्षणाचें मात्र सार्वत्रिक अस्तित्व दिसून येत नाहीं, कारण मातृकन्यापरंपरापद्धतीमध्यें सुद्धंबहुतेक बापाचीच सत्ता मुलावर असलेली आढळते. तथापि कांहीं थोडया जातींमध्यें ही सत्ता मामाच्या हातांत असलेली दिसते. अशा प्रकारची पद्धति विशेषतः आसामच्या खासी लोकांत, उत्तर अमेरिकेंतील सेरी इंडियन लोकांत व इकोकुओइस लोकांत आढळते. मातृकन्यापरंपरेचें खरें महत्त्व वारसापद्धतींत आढळतें. पितृशासनपद्धतींत वारसाचे हक्क बापाच्या घराण्यांतील वारसांनां ठराविक नियमाप्रमाणें मिळतात. पण मातृकन्यापरंपरापद्धतीमध्यें वारसाहक्क मातेकडच्या वंशजांनां मिळतात. उदाहरणार्थ, 'अ' हा मागें कांहीं इस्टेट ठेवून वारला तर ती त्याची इस्टेट, पितृशासन पद्धतीच्या कुटुंबांत मुलाकडे, नाहींतर नातवाकडे, अगर त्याच्या घराण्यांतील इतर पुरुषाकडे जाईल पण मातृकन्या परंपरापद्धतीमध्यें मात्र त्याची इस्टेट भाऊ, बहीण, बहिणीचा मुलगा अशा तऱ्हेनें मिळत जाईल. कारण 'अ' चा मुलगा हा 'अ' च्या भावापेक्षां अगर बहिणीपेक्षां 'अ' च्या आईला दूरचा असतो, तसें 'अ' चा मुलगा 'अ' च्या बहिणीचा मुलगा यांच्यामध्यें 'अ' च्या बहिणीच्या मुलाला प्रथमतः वारसाहक्क प्राप्त होईल. मातृकन्यापरंपरा याचा अर्थ मातेचें धन कन्येकडेच जावयाचें असाच घ्यावयाचा नाहीं. कित्येक समाजांत तशी पद्धत चालू असेल पण ती सार्वत्रिक आहे असें दिसत नाहीं.
मातृकन्यापरंपरापद्धति ही प्राचीन काळीं सर्वत्र अस्तित्वांत होती तथापि अद्यापिहि कांहीं भागांत ही रूढ असलेली आढळते. ओशियानामध्यें मेलॅनिशियन लोकांत ही विशेषेंकरून रूढ दिसते. मलाया द्वीपकल्पांतील कांहीं जातींमध्यें, सुमात्रा बेटांत, पूर्वआशियांतील ऐनू जातींत, तसेंच फिजी, सेनेगाल, लोआंगो, कांगो, गिनी, इत्यादि देशांत हिचें अस्तित्व आढळतें. हिंदुस्थानांत, आसाममधील खासी व सित्तांग लोकांत व मलबारांतील नायर, नियन इत्यादि लोकांतहि ही पद्धत असल्याचें आढळून येतें. पितृशासित समाजांमध्यें देखील अद्यापि मातृशासनपद्धतीच्या खुणा आढळून येतात आणि त्यावरून मातृशासनपद्धतीचें पितृशासनपद्धतीमध्यें रूपांतर झालें असावें या म्हणण्याला सबळ पुरावा सांपडतो. कारण अद्यापिहि कांहीं पितृशासित समाजांत मामाचें वर्चस्व आढळून येतें. तसेंच सावत्र भावाबहिणीमध्यें लग्नें होण्याचीं जी क्वचित चाल दृष्टीस पडते तीहि मातृशासनपद्धतीचाच अवशेष आहे असें विद्वानांचें म्हणणें आहे. देशस्थांमध्यें मामे-बहिणींशीं लग्न करण्याची जी वहिवाट आहे ती याच पद्धतीचा अवशेष असावा असें वाटतें.
(संदर्भग्रंथः- स्टार्के- दि प्रिमिटिव्ह फॅमिली; हार्टलंड - प्रिमिटिव्ह पॅटर्निटी; फ्रेझर- टोटेमिझम अँड एक्झोगमी; मॅकलेनन- पॅट्रिआर्कल थिअरी; वेस्टर्मार्क- हिस्टरी ऑफ ह्यूमन मॅरेज; मार्गन- सिस्टिम्स ऑफ कानसँग्विनिटी अँड ॲफिनिटी ऑफ ह्यूमन फॅमिली)