विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मांडक्योपनिषद- दशोपनिषदांतील एक उपनिषद्. हें अथर्वण वेदाचें उपनिषद् असून त्याचीं चार प्रकरणें आहेत. दशोपनिषदांत हें सर्वांत लाहन उपनिषद् आहे. तथापि श्रीशंकराचार्यांचे परात्पर गुरु श्रीगौंडपादाचार्यांनीं या उपनिषदाच्या विवरणपर २१५ महत्त्वाच्या कारिका लिहिल्यामुळें व त्या अद्वैतसिध्दंतप्रतिपादक असल्यानें या उपनिषदाला विशेष महत्त्व प्राप्त झालें आहे. यांत ॐ हेंच ब्रह्म आहे, आत्मा हाच ब्रह्म आहे असें सांगून आत्म्याच्या चतुष्पादांचें समग्र वर्णन केलें आहे. ॐकाराच्या अकार, उकार व मकार या मात्रा म्हणजे ब्रह्माचे विश्व, तैज्स व प्राज्ञ असे पाद सांगून त्या प्रत्येक पादाच्या उपासनेनें अनुक्रमानें कामप्राप्ति, ज्ञानसंतति, व जगत्कारणात्मकरूप होणें हीं तीन फलें प्राप्त होतात असें म्हटलें आहे व या ॐकाराची समष्टिरूप उपासना केल्यानें मुक्ति मिळतें असें स्पष्ट सांगितले आहे. या उपनिषदाच्या चार प्रकरणांप्रमाणेंच गौडपादांनीं आपल्या कारिकांची आगम, वैतभ्य, अद्वैताख्य, व अलातशांति अशीं चार प्रकरणें रचिलीं आहेत. पहिल्या प्रकरणांत ब्रह्म ही सत्यवस्तु आहे, दुसऱ्या प्रकरणांत ब्रह्माशिवाय दुसरी कोणतीहि वस्तु सत्य नाही, तिस-या प्रकरणांत ब्रह्म व आत्मा एकच होय व चौथ्या प्रकरणांत आत्मवस्तूचें नित्यव्य व इतर सर्वांचें अनित्यस्व प्रतिपादन केलें आहे.