विभाग आठरावा : बडोदें ते मूर
माँटेनीग्रो- यूरोपमधील एक राष्ट्र. हें बाल्कनद्वीपकल्पाच्या पश्चिमेस आहे. दक्षिणेस आड्रियाटिक समुद्र; पश्चिमेस डालमेशिया; उत्तरेस बोस्रिया व हर्झेगोविना हे ऑस्ट्रियाचे प्रांत व पूर्वेस तुर्की साम्राज्य. क्षेत्रफळ ३७३३ चौरस मैल. सर्व प्रदेश साधारणतः डोंगराळ आहे. उत्तरेस अल्मेशियन, बोस्नियन व अल्बेनियन पर्वतांच्या रांगा आहेत. झेंटा व मोराचा था मुख्य नद्या व स्कुटारी हें सरोवर आहे. हल्लीं हें सर्व्ह-क्रोट व स्लोवेन संस्थानसमूहांत मोडतें. माँटेनीग्रो राष्ट्राची लोकसंख्या १९२० सालीं १९९८५७ होती. माँटेनीग्रोंत मुख्यतः सर्व्हो-क्रोशियन शाखेच्या लोकांचीं वस्ती आहे. येथील लोक फार उंच व धिप्पाड असतात. लोक अद्यापि बरेच मागासलेले आहेत. वैयक्तिक शौर्याला अद्यापि फार मान देण्यांत येतो. लोकांनां नावाची फार आवड आहे. यांच्यांत अद्यापि बालविवाह रूढ आहे.
स्वतंत्र संस्थान म्हणून मॉन्टेनीग्रोचा इतिहास कास्सोव्हो येथील युद्धनंतर (१३८९) सुरू होतो. त्यापूर्वी कांही काल हा प्रदेश रोमच्या सत्तेखालीं व नंतर बायझान्टाईन सत्तेखालीं होता. इ. स. च्या ७ या शतकाच्या मध्यंतरीं या प्रदेशांत ''सर्व्ह'' लोकांनीं वस्ती केली. या लोकांनीं लहान लहान संस्थानें वसविलीं. हल्लींचा मॉन्टेनीग्रो झेटा नांवाच्या संस्थानांत मोडत असे. स. ११५९ व १३५६ याच्या दरम्यान हें संस्थान सर्व्हियाच्या राज्याला जोडलें गेलें. कास्सोव्हो येथील युद्धनंतर सर्व्हियाचें स्वातंत्र्य गेलें, तेव्हां झेटा संस्थानचा अधिकारी आपल्या डोंगरी मुलुखाचा आश्रय घेऊन राहिला, व त्या ठिकाणीं इतर सर्व्हियन सरदार त्याला येऊन मिळाले. या वेळेपासून सर्व्ह लोकांचें तुर्कांशी युद्ध सुरू झालें. हळू हळू बराच मुलुख तुर्कांच्या ताब्यांत गेला. झेटा संस्थानांत राज्य करीत असलेल्या बाल्शवंशाचा इ. स. १४११ मध्यें लय झाला व झेर्नोविच घराणें अस्तित्वांत आलें. इ. स. १५१६ मध्यें झेर्नोविच घराणें संपुष्टांत आलें व तेव्हांपासून इ. स. १६९६ पर्यंत या संस्थानचा कारभार सेटिग्नेचा धर्माधिकारी पहात असे, व तो सरदार व लोकसभा यांच्याकडून निवडला जात असे. त्याला व्ह्लाडिका म्हणत. ईश्वरसत्ताक राज्यपद्धती बरोबरच आनुवंशिक पद्धति सुरू करावी असें इ. स. १६९६ मध्यें ठरलें व निगशचा डॅनिलो पेट्रोविच याला व्ह्लाडिका नेमण्यांत आलें. व आपल्या नातलगांतून आपल्यानंतरचा अधिकारी निवडण्याचा त्याला अधिकार देण्यांत आला. याला जन्मभर ब्रह्मचारी रहावें लागत असे, म्हणून गादी चुलत्याकडून पुतण्याकडे जात आली आहे. पहिला डॅनिलो याच्या कारकीर्दीत मुसुलमानांची कत्तल व स्वारी करणाऱ्या तुर्कांचा पराभव (१७१२) या महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. याच्याच कारकीर्दीत इ. सन १७१४ मध्यें तुर्कांनीं सेटिग्ने घेतलें, पुढें रशियाच्या स्नेहानें यानें आपल्या राज्याचें झालेलें नुकसान भरून काढिलें. डॅनिलोनंतर सॅव्ह यानें स. १७३७ ते १७८२ पर्यंत राज्य केलें. याच्या कारकीर्दीत तुर्कांनां परत घालविण्यांत आलें. यानें बरेच दिवस चांगल्या तऱ्हेनें राज्य केलें. याचा एका ग्रीक मनुष्यानें खून केला. सॅव्हनंतर पहिला पिटर यानें इ. स. १७८२ ते १८३० पर्यंत राज्य केलें. यानें क्रुसा (१७९६) येथें तुर्कांचा पूर्ण पराजय केलें; व इ. स. १७९९ मध्यें सुलतानपासून मॉन्टेनीग्रो स्वतंत्र झाला. यानें पहिल्यानें कायदेसंग्रह केला. दुसरा पिटर यानें स. १८३० ते १८५१ पर्यंत राज्य केला. यानें आपल्या लोकांची बरीच सुधारणा केली व सिनेटची स्थापना केली. दुसरा डॅनिलो (१८५१-६०) यानें धार्मिक पदवी सोडून दिली व आपल्या मुलाला गादीचा वारस नेमिलें. ओस्ट्रोगजवळ त्यानें तुर्क लोकांचा पराभव केला. हा शांतताप्रिय असल्यामुळें त्याच्या युद्धप्रिय प्रजेला तो अप्रिय झाला. मॉन्टेनीग्रोचें स्वातंत्र्य कबूल करणें वगैरे मागण्या डॅनिलोनें पॅरिसच्या सभेपुढें मांडल्या, परंतु त्या दिल्या गेल्या नाहींत. १८५८ सालीं ग्रहोव्हो येथें तुर्क लोकांची बरीच कत्तल होऊन त्यांचा पूर्ण पराजय झाला. सन १८६० मध्यें एका हद्दपार केलेल्या मॉन्टेनीग्रोंतील मनुष्यानें डॅनिलोचा खून केला. दुसऱ्या डॅनिलोला मूल नसल्यामुळें त्याचा पुतण्या निकोलस हा गादीवर बसला. इ. स. १८६२ मध्यें तुर्कस्तानशीं बेबनाव होऊन युद्ध झालें, परंतु त्यांत मान्टेनीग्रोचा पराभव होऊन त्याला अपमानकारक अटी कबूल कराव्या लागल्या. यानंतरचीं १४ वर्षें शांततेंत गेलीं; व त्या अवधींत निकोलस राजानें आपल्या राज्यांत बऱ्याच सुधारणा केल्या. इ. स. १८७६ मध्यें सर्व्हियाशीं मैत्री होऊन तुर्क लोकांशीं युद्ध झालें. पुढें रशिया मॉन्टेनीग्रोला मिळाला. या युध्दंत बरेच वेळां तहाची वाटाघाट होऊन हल्लीं मॉन्टेनीग्रोची जी मर्यादा आहे ती नक्की करण्यांत आली. निकोलस राजाच्या अनियंत्रित सत्तेमुळें या देशाची बरची भरभराट झाली. इ. स. १९०६ मध्यें मॉन्टेनीग्रोची पहिली पार्लमेंट-सभा भरली.
१९१० सालीं निकोलस यानें आपण मॉन्टेनीग्रोचा राजा झाल्याचें जाहीर केलें. त्यामुळें सर्व्हियाशीं एकी होण्याच्या चिन्हांत हा एक अडथळा उत्पन्न झाल्यासारखें झालें. १९१२ सालीं मॉन्टेनीग्रोच्या सरहद्दीवर तुर्की सैन्यानें आततायीपणाचीं कृत्यें केल्यामुळें मॉटेनीग्रो, ग्रीस, सर्व्हिया, व बल्गेरिया यांनीं आपापसांत दोस्ती करून तुर्कांविरुद्ध युद्ध पुकारलें. या युध्दंत मॉन्टेनीग्रो पडलें होतें, ते स्कुटारीचा मुलूख आपल्या ताब्यांत यावा यासाठीं पडलें होतें. पण या युद्धनंतर १९१२ सालं जो तह झाला. त्या तहांत मॉन्टेनीग्रोला स्कुटारीचा मुलूख मिळाला नाहीं. पुढें थोडक्याच दिवसांनीं दुसऱ्या बाल्कन युद्धला सुरवात झाली. पण याहि युध्दांत मॉन्टेनीग्रोची आशा सफळ झाली नाहीं महायुद्धमध्यें मॉन्टेनीग्रोनें दोस्तराष्ट्रांच्या वतीनें युध्दंत सामील झाल्याचें जाहीर केलें. तथापि, निकोलसनें आंतून ऑस्ट्रियाशीं संधान बांधलेंच होतें. स. १९१५ च्या आक्टोबरमध्यें ऑस्ट्रिया, जर्मनी व बल्गेरिया यांच्या सैन्यानें सर्व्हियावर हल्ला केला व त्यांत सर्व्हियाच्या सैन्याचा पराभव होऊन त्याला आड्रियाटिकच्या प्रदेशांत हटावें लागलें. मॉन्टेनीग्रोच्या सैन्यानेंहि हाच मार्ग अवलंबावयास पाहिजे होता. तथापि तसें न करतां निकोलसनें ऑस्ट्रियन बादशहाशीं, आपल्या सल्लागारांच्या सल्ल्याला न जुमानतां तहाचें बोलणें सुरू केलें. पण शेवटीं त्यांतून कांहीच निष्पन्न झालें नाहीं. त्यामुळें तहाच्या आशेनें सर्व्हियाप्रमाणें पिछेहाट न केल्यामुळें मॉन्टेनीग्रोचें सैन्य आयतेंच ऑस्ट्रियन सैन्याच्या जाळयांत सांपडलें. पुढें ऑस्ट्रियाच्या अमलाखालीं सर्व्हिया व मॉन्टेनीग्रो यांचे एकत्रीकरण होण्याबद्दलची खटपट सुरू झाली पण त्यांत यश आलें नाहीं. १९१६ सालीं अँड्रयू राडोविच हा मॉन्टेनीग्रोचा प्रधान झाला व त्याच्या सल्ल्यानें, मॉन्टेनीग्रो व इतर दक्षिण स्लाव्ह राष्ट्रांचें संघटण व्हावें अशा प्रकारचें मत प्रतिपादणारा एक मसुदा निकोलसकडे पाठविण्यांत आला. प्रथमतः निकोलस हा याला अनुकूल होता पण इटलीमध्यें जाऊन आल्यानंतर व इटलीला हें ऐक्य पसंत नाहीं असें त्याला आढळून आल्यामुळें त्याचा बेत बदलला त्यामुळें निकोलस विरुद्ध लोकमत प्रक्षुब्ध झालें, प्रधानमंडळानें राजीनामे दिले. मॉटिनोव्हिश याला राजानें प्रधान नेमलें. तथापि थोडक्यांच दिवसांत मॉटिनोव्हिशच्या प्रधानमंडळालाहि राजीनामा द्यावा लागला. राजामध्यें व प्रजेमध्यें वारंवार खटके उडूं लागले. शेवटीं स्वित्झर्लंड येथें मॉटिनीग्रो येथील प्रमुख लोकांनीं राष्ट्रीय ऐक्याबद्दल एक कमिटी स्थापन केली. या कमिटीमध्यें सर्व्ह, क्रोट, स्लोवेन इत्यादि लोकांचे प्रतिनीधी निवडण्यांत आले होते. या कमिटीनें १९१७ सालच्या जुलैच्या २० व्या तारखेस, कोरफ्यू येथें एक जाहीरनामा काढून कारागे ऑर्गेविचच्या आधिपत्याखालीं सर्व स्लाव राष्ट्राचें एकीकरण करण्याचें ठरविलें. याच सुमारास, दोस्तराष्ट्रांचें सैन्य ऑस्ट्रियन व बल्गर सैन्याचा पराजय करून मॉटेनिग्रोमध्यें घुसल्यामुळें हा कोर्फ्यूचा जाहीरनामा अमलात आणणें सोपें गेलें. १९१८ सालीं एक राष्ट्रीय महामंडळ निवडण्यांत आलें व या महामंडळानें निकोलस राजाला पदच्युत केल्याचें व सर्व्हिया व मॉटेनिग्रोचें ऐक्य झाल्याचें जाहीर केलें. १९२० सालीं सर्व क्रोटस्लोव्हेन कॉन्टिटयुअंट असेंब्लीची निवडणूक झाली व तींत मॉटेनिग्रोतर्फे ऐक्याला अनुकूल असलेलेच सभासद निवडून आले. निकोलस हा १९२१ च्या मार्च महिन्यांत मरण पावला. त्याच्यानंतर मायलेक हा गादीवर आला. अशा रीतीनें पांव शतकाच्या चळवळीनंतर माँटेनिग्रो व सर्व्हियाचें ऐक्य घडून आलें. (फोर्ब्स-दि बाल्कन्स; आर डब्ल्यू खेटनवॅटसन-दि सर्दन स्लाव्ह क्क्श्र्चन; राडेविच अँड अदर्स- दि कश्र्चन ऑफ माँटेविग्रो).