विभाग आठरावा : बडोदें ते मूर
मांजर- वारयुक्त प्राण्यांमध्यें पादांगुलचारी प्राण्यांची जी जात आहे त्या जातींत मांजराचा समावेश होतो. या जातींतील प्राणी पायाच्या टांचा उचलून चवडयांवर चालतात. मांजराचें घ्राणेंद्रिय फार तीव्र असतें. मांजराच्या जबडयांतील सुळेदांत चार असतात व ते मोठे व अणकुचीदार असतात. मांजराची जीभ फार खरखरीत असते. पायाचे तळवे मऊ असतात. पुढच्या पायास पांच व मागील पायास चार बोटें असतात. व त्यांनां तीक्ष्ण नखें असतात. मांजराचे डोळे वाटोळे असून डोळयांतील बाहुली रात्रीं मोठी होते. मांजराला मिशा असतात. मांजराच्या अंगावरील केंस मऊ व उबदार असतात. शेंपटावर पुष्कळ केंस असतात. मांजराचीं पिलें जन्मल्यावर कांहीं दिवस आंधळी असतात. हा प्राणी एकाच जागेचा फार शोकी आहे व तो सहसा स्थलांतर करीत नाहीं. मांजर हें कुत्र्याप्रमाणें स्वामिनिष्ठ नसतं. आपल्या पिलांवर मात्र त्याची फार भक्ति असते. मांजराच्या रानमांजर व घरमांजर (माणसाळलेलें मांजर) अशा दोन मुख्य जाती आहेत. रानमांजर जर्मनी, रशिया, हंगेरी किंबहुना यूरोपमधील सर्व जंगली प्रदेशांत आढळतें. आशियाच्या उत्तर भागांत व नेपाळमध्येंहि रानमांजरें आढळतात. प्राचीन काळीं ग्रेटब्रिटनमध्येंहि यांचा भरणा होता, व राजे लोक याची शिकार करीत असत. हल्लीं आयर्लंडमध्यें यांची बरीच वस्ती आहे. यूरोपमधील रानमांजर हें ईजिप्तमधून आलें असें प्राणिशास्त्रज्ञांचें म्हणणें आहे. यूरोपमधील घरमांजर हेंहि ईजिप्तमधूनच यूरोपमध्यें आलें असें त्यांचें मत आहे. कांहीं विद्वानांच्या मतें यूरोपमधील घरमांजर हें चिनी व ईजिप्शियन मांजरांच्या संयोगापासून झालें आहे. यूरोपमधील घरमांजरांचे दाट केंसाचें व पातळ केंसाचें मांजर असे दोन प्रकार आहेत. दाट केंसाचीं मांजरें इराणमध्यं पुष्कळ आढळतात, व यांच्या अंगावर फारसे पट्टे नसतात. कांहीं मांजरें बिनशेंपटींचीं असतात व त्यांनां 'मॅक्स' असें नांव आहे. हीं मांजरें मूळ जपान, चीन, सयाम या देशांतनू यूरोपमध्यें व विशेषतः रशियांत आली असें म्हणतात. हिंदुस्थानांतील मांजरावर अगदीं जवळ जवळ ठिपके असतात. संयामी मांजर हें इतर मांजरांपेक्षां भिन्न आहे. या मांजराचें ओरडणें विवित्र आहे. या मांजराचें डोकें लांब व शरीराचा भागहि किरकोळ व बराच लांब असतो. या मांजराचीं पिलें श्वेतवर्णी असतात पण पुढें त्यांचा रंग बदलतो. याशिवाय मोंबासा मांजर, पॅराग्वे मांजर इत्यादि मांजराच्या अनेक जाती आहेत.